

पणजी: ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. भारताच्या पर्यावरण विषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. गोव्यातील पर्यावरण चळवळींशीही त्यांचा जवळचा संबंध होता.
माधव गाडगीळ यांनी पुण्यातल्या फग्र्युसन महाविद्यालयात जीवशास्त्र या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून प्राणिशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि १९६९ साली हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. हार्वर्डमध्ये त्यांनी गणितीय पर्यावरणशास्त्र आणि प्राण्यांच्या वर्तनावर काम केले. भारतात परतल्यावर ते बंगळुरू इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत रुजू झाले.
संस्थेच्या पर्यावरण विज्ञान केंद्राचे ते संस्थापक होते. निवृत्तीनंतर ते पुण्यातली आघारकर संशोधन संस्था आणि गोवा विद्यापीठातल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले. गाडगीळ यांनी पंतप्रधानांची वैज्ञानिक सल्लागार परिषद, राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासह अनेक उच्चस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले,
'गाडगीळ अहवाल'
पश्चिम घाटातली जैवविधता जपण्यासाठी आणि त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालच्या तज्ज्ञ समितीने तयार केलेला 'गाडगीळ अहवाल' महत्वाचा ठरला. जागतिक जैवविविधतेचं आकर्षण केंद्र असलेल्या पश्चिम घाटावरच्या त्यांच्या मोलाच्या कामगिरीबद्दल, २०२४ मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी गाडगीळ यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने सन्मानित केले होते. संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा हा सर्वोच्च सन्मान आहे.
माधव गाडगीळ हे पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले थोर व्यक्तिमत्त्व होते. ते आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांनी मला प्रभावित केले. त्यांनी पश्चिमघाट संवर्धनासाठी अतुलनीय योगदान आहे. मला सदोदित त्यांचे मार्गदर्शन लाभले असून एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे निधन झाले. मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो.
प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी
विविध मान सन्मान
डॉ. माधव गाडगीळ यांना भारत सरकारने १९८१ मध्ये पद्मश्री आणि २००६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, व्होल्वो पर्यावरण पुरस्कार आणि पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी टायलर पुरस्कार यासारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
लेखन कार्य
गाडगीळ यांनी 'धिस फिशर्ड लैंड' आणि 'इकोलॉजी अँड इक्विटी यासारख्या प्रभावी पुस्तकांचे लेखन आणि सह-लेखन केले. त्यांचे २५० पेक्षा जास्त शोध-निबंध प्रकाशित झाले आहेत, तसेच विविध वृत्तपत्रातही पर्यावरणविषयक लेखन करत असत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.