India Visa Rules Simplification Foreign Tourists 2026: भारत फिरण्याचे आणि येथील निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जगभरातील पर्यटकांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. भारतातील व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान आणि युजर-फ्रेंडली बनवण्यासाठी सरकारने व्हिसा नियमावली 2019 चे पुनरावलोकन केले असून, नियमांमध्ये व्यापक बदल करण्याचा निर्णय घेतला.
नव्या बदलांनुसार, आता व्हिसा अर्ज भरताना पर्यटकांना तासनतास वेळ घालवावा लागणार नाही. व्हिसा अर्जामध्ये विचारल्या जाणाऱ्या अनावश्यक, पुनरावृत्ती होणाऱ्या आणि किचकट अशा जवळपास 70 टक्के माहितीच्या चौकटी हटवल्या जाणार आहेत. याशिवाय, अर्जदारांचा गोंधळ टाळण्यासाठी व्हिसाच्या मुख्य कॅटेगरी 13 वरुन थेट 9 करण्यात आल्या असून उप-कॅटेगरी 49 वरुन 23 पर्यंत कमी करण्यात आल्या.
कोरोना काळाच्या तुलनेत भारतात (India) येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने झालेली घट हे या मोठ्या धोरणात्मक निर्णयामागचे मुख्य कारण मानले जात आहे. आकडेवारीनुसार, 2019 मध्ये तब्बल 1.09 कोटी परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली होती, मात्र 2024 मध्ये हा आकडा घसरुन 99.5 लाखांवर आला आणि 2025 मध्ये ही संख्या आणखी कमी होऊन सुमारे 91.5 लाखांपर्यंत खाली आली. ही घसरण रोखण्यासाठी आणि परदेशी पर्यटकांसाठी भारताचे दरवाजे सहज खुले करण्यासाठी व्हिसा नियमांत शिथिलता आणण्याची मागणी पर्यटन उद्योगाकडून केली जात होती.
गृह मंत्रालयाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे पर्यटन क्षेत्राकडून स्वागत केले जात आहे. यासोबतच, सर्व देशांतील नागरिकांना प्रवासाच्या 120 दिवस आधीच ई-व्हिसा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, हा अर्ज स्पॅनिश, जर्मन, इटालियन यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध करावा आणि चीनी नागरिकांसाठी ई-व्हिसा पुन्हा सुरु करावा, अशा अतिरिक्त शिफारसीही उद्योगाकडून मांडण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील पर्यटनाला मोठा दिलासा मिळून अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.