8th Pay Commission latest news
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नव्या वेतन आयोगाकडून पगारवाढ, महागाई भत्ता, पेन्शन आणि इतर सुविधांमध्ये मोठे बदल होण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. त्यातच विविध कर्मचारी संघटनांकडून आयोगासमोर वेगवेगळ्या मागण्या मांडल्या जात आहेत. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) तर एक-दोन नव्हे, तर तब्बल 73 प्रस्ताव आयोगासमोर सादर केले आहेत. यामध्ये वार्षिक पगारवाढ 3 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यापासून ते कर्मचाऱ्यांना 15 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि संपूर्ण सेवाकाळात पाच पदोन्नती देण्यापर्यंतच्या मागण्यांचा समावेश आहे. मात्र, या प्रस्तावांपैकी कोणत्या मागण्यांना मान्यता द्यायची, याचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या वेतनरचनेनुसार वार्षिक वेतनवाढ 3 टक्के आहे. मात्र, वाढती महागाई आणि दैनंदिन खर्चाचा विचार करता ही वाढ अपुरी असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने वार्षिक इन्क्रिमेंट दुप्पट करून 6 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
ही मागणी मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात दरवर्षी होणारी वाढ अधिक असेल. परिणामी, दीर्घकाळ नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये या प्रस्तावाला किती महत्त्व मिळते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महागाई भत्त्याबाबतही कर्मचारी संघटनेने महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. सध्या कर्मचाऱ्यांना महागाईच्या परिणामापासून काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी DA दिला जातो. मात्र, या भत्त्याचा 50 टक्के हिस्सा मूळ वेतनात म्हणजेच बेसिक सॅलरीमध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रस्तावानुसार केवळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचेच नव्हे, तर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही त्याचा विचार करण्याची मागणी आहे. यामुळे बेसिक पे आणि पेन्शनची रक्कम वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र, DA मर्जरबाबत सरकार कोणती भूमिका घेते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी, यासाठी पेन्शनचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) आणि युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) ऐवजी जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे.
जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभांचा विचार करता अनेक कर्मचारी संघटना ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेत पेन्शनचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
पगारवाढ आणि पेन्शनव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या इतर सुविधांमध्येही सुधारणा करण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. सेंट्रल एम्प्लॉईज ग्रुप इन्शुरन्स स्कीमअंतर्गत मिळणारे विमा संरक्षण वाढवून 15 लाख रुपये करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याशिवाय कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण 30 वर्षांच्या सेवाकाळात किमान पाच पदोन्नती मिळाव्यात, असा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. सध्या अनेक कर्मचाऱ्यांना अपेक्षित कालावधीत पदोन्नती मिळत नसल्याने त्यांच्या वेतनवाढीवर परिणाम होतो. ही समस्या दूर करण्यासाठी पदोन्नतीच्या संधी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विचार करून रजेच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष कर्मचाऱ्यांसाठी पितृत्व रजा 45 दिवस करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांना मिळणारी चाइल्ड केअर लीव्ह मुलाच्या वयाच्या 12 वर्षांपर्यंत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रस्तावांमुळे कर्मचाऱ्यांना कामासोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अधिक वेळ मिळू शकतो. मात्र, या सर्व मागण्या सध्या कर्मचारी संघटनांनी आयोगासमोर मांडलेल्या सूचना आहेत. त्यांना अद्याप सरकारी मंजुरी मिळालेली नाही.
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. सातव्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपये निश्चित करण्यात आले होते.
आता आठव्या वेतन आयोगासाठी विविध कर्मचारी संघटनांकडून फिटमेंट फॅक्टर 2.75 ते 3.83 करण्याची मागणी केली जात आहे. जर सरकारने 2.75 फिटमेंट फॅक्टर स्वीकारला, तर सध्याच्या 18 हजार रुपयांच्या किमान मूळ वेतनाचे गणित 49,500 रुपयांपर्यंत पोहोचेल. तर 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किमान मूळ वेतन 68,940 रुपये होऊ शकते. मात्र, हे केवळ मागणीवर आधारित गणित आहे. प्रत्यक्षात किती पगारवाढ मिळणार, हे सरकारच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.
आठव्या वेतन आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. कर्मचारी संघटना, विविध विभाग आणि संबंधित घटकांकडून मिळणाऱ्या सूचना व प्रस्तावांचा अभ्यास करून आयोग आपला अहवाल तयार करणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, मे 2027 मध्ये आयोगाकडून सरकारला अहवाल सादर केला जाण्याची अपेक्षा आहे.
त्यानंतर आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करून त्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल. त्यामुळे 6 टक्के वार्षिक वेतनवाढ, 50 टक्के DA मर्जर, पाच प्रमोशन आणि फिटमेंट फॅक्टरमधील वाढ यापैकी कोणत्या मागण्या प्रत्यक्षात मान्य होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.