

Sunetra Pawar Deputy CM: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एक अत्यंत ऐतिहासिक आणि भावनिक वळण पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरुन काढण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्या पत्नी आणि माजी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. शनिवारी (31 जानेवारी) राज्यपाल महोदयांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीसह सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवला असून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली.
अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मोठ्या संकटात सापडला होता. पक्षाचे अस्तित्व आणि भविष्य टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी शुक्रवारी सुनेत्रा पवार यांच्यासमोर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एका बाजूला पतीच्या निधनाचे अतीव दुःख आणि दुसऱ्या बाजूला पक्षाला सावरण्याचे कर्तव्य, अशा कठीण परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रस्ताव मान्य केला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला असून पक्षाच्या सर्व आमदारांनी त्यांची नेतेपदी एकमताने निवड केली.
या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर पोस्ट करुन सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले असून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आता राजकारणाची धुरा कशी सांभाळतात आणि अजित पवारांचा वारसा कसा पुढे नेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.