

Weird Food Combinations Video: आजच्या काळात सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म बनले आहे, जिथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर दररोज हजारो अतरंगी व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ मनोरंजक असतात, तर काही इतके विचित्र असतात की ते पाहून नेटकरी चक्रावून जातात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने मुंबई लोकलमध्ये बसून खाण्याचे असे काही अजब प्रयोग केले की, ते पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की हे खरंच शक्य आहे का?
तुम्ही जर सोशल मीडियावर नियमित सक्रिय असाल, तर तुमच्या फीडवर दररोज अनेक व्हायरल व्हिडिओ येत असतील. आजकाल डिजिटल क्रिएटरमध्ये 'व्हायरल' होण्याची एक वेगळीच शर्यत लागली आहे. नियम असा झाला आहे की, तुमचा व्हिडिओ जितका अजब आणि अतरंगी असेल, तितकी त्याच्या व्हायरल होण्याची शक्यता जास्त असते. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन एका तरुणाने मुंबईच्या लाइफलाइनमध्ये म्हणजेच लोकल ट्रेनमध्ये असे काही कृत्य केले, ज्याची चर्चा आता संपूर्ण इंटरनेटवर रंगली आहे.
या जगात खाण्यासाठी अनेक उत्तम पदार्थ आणि त्यांचे योग्य कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत. मात्र, विचार करा की तुमच्या समोर बसून कोणी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने पदार्थ खाऊ लागली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या गर्दीत बसलेला दिसतो. तो आधी चक्क कच्च्या आल्यावर टोमॅटो सॉस टाकतो आणि ते शांतपणे खातो. आल्याचा तिखटपणा आणि सॉसची चव हे ऐकूनच कोणाचेही डोके चक्रावेल.
परंतु, हा तरुण इथेच थांबला नाही. त्याने पुढे जे केले ते अधिक धक्कादायक होते. त्याने चहामध्ये केळं बुडवून ते खाल्ले. साधारणपणे आपण चहामध्ये बिस्किटे किंवा खारी बुडवून खातो, पण चहा आणि केळं हे कॉम्बिनेशन पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला. एवढ्यावरच न थांबता, हा तरुण भर ट्रेनमध्ये कच्ची कोबी आणि चक्क कच्चं वांगं खातानाही दिसतो. हे सर्व तो वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रवाशांच्या मध्ये बसून अत्यंत आत्मविश्वासाने करताना दिसतो.
हा अतरंगी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'prannayjoshi' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी मिळेपर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये मात्र नेटकऱ्यांनी या तरुणाला प्रश्नांनी भंडावून सोडले आहे. एका युजरने आश्चर्याने विचारले की, "तू खरंच हे सगळं खाल्लंस का? हे तुला जमलं कसं?" दुसऱ्या एका युजरने लिहिले, "भावा, हे सगळं तू पचवलंस कसं?" तर काहींनी "चहा आणि केळं? हे तर अशक्य आहे!" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक यूजर्संनी हसण्याचे इमोजी टाकत याला 'निव्वळ वेडेपणा' म्हटले.
अशा प्रकारे केवळ व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी आरोग्याशी खेळ करणारे हे प्रयोग कितपत योग्य आहेत, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. पण सध्या तरी हा 'मुंबई लोकलचा अजब खवय्या' सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.