
Security Manager Held for Allegedly Stealing 261 IPL Jerseys
मुंबई: वानखेडे स्टेडियममधील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकृत मर्चेंडाईज स्टोअरमधून तब्बल ६.५२ लाख रुपये किमतीच्या २६१ आयपीएल जर्सी चोरल्याचा आरोप सुरक्षा व्यवस्थापकावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव फारुख अस्लम खान (४६) असे असून तो मीरा रोड पूर्वेकडील रहिवासी आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, १३ जून रोजी खानने स्टोअरमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात जर्सी बॉक्समध्ये भरून घेऊन गेला.
बीसीसीआयच्या अलीकडील ऑडिटमध्ये जर्सीच्या साठ्याचा अभाव आढळून आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये आरोपी कार्डबोर्ड बॉक्स घेऊन जाताना दिसल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकारानंतर १७ जुलै रोजी बीसीसीआयचे कर्मचारी हेमांग भरत कुमार अमीन (४४) यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अमीन हे वानखेडे स्टेडियम परिसरातील बीसीसीआयच्या कार्यालयात कार्यरत आहेत.
तक्रारीनुसार, आरोपी खानने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि इतर आयपीएल संघांच्या अधिकृत जर्सी चोरल्या.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, स्टोअर रेकॉर्ड व इतर पुरावे तपासले जात असून चोरी गेलेल्या वस्तूंचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आयपीएलच्या नाममात्र वस्तू चोरीला गेल्यामुळे हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे, आणि सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.