Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील बंडाळीमुळे चांगलंच गाजत आहे. यातच आज एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने आपल्या पक्षाचे नाव 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असे निश्चित केले आहे. आज संध्याकाळी यासंबंधीची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय संकट पाहता बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना कोणाची? पक्षाचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला आधिच उधान आले आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि पक्षाचे ‘सुप्रिमो’ उद्धव ठाकरे या बंडखोरीमुळे आमनेसामने आले आहेत.
तसेच, बंडखोर आमदारांच्या गटातील आमदार भरत गोगावले यांची नवे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य व्हीपची नियुक्ती करुन शिंदे कॅम्पला पक्षाच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा असून खरी शिवसेना (Shiv Sena) आपल्याच पाठिशी असल्याचे एकनाथ शिंदे यांना दाखवून द्यायचे आहे.
आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद महागात पडला?
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. नवीन सरकार स्थापनेवेळी शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असे मानले जात होते. त्यामुळेच युतीबाबत मतभेद होऊनही शिंदे यांच्या बंडखोर गटाने विरोध केला नाही. दुसरीकडे, अखेरच्या क्षणी शरद पवारांनी (Sharad Pawar) शिंदे यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. तेव्हापासून शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सुरु झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊन आदित्य ठाकरे सतत पक्षातले निर्णय घेत असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होती. आणि या सगळ्यात त्यांना संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांची साथ मिळत होती. याचा बराच काळ शिंदे यांना त्रास होत होता. एमएलसी निवडणुकीदरम्यानही काँग्रेस (Congress) उमेदवाराला मतदान करण्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.