

महिला क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महिला प्रीमियर लीग अर्थात WPL 2027 च्या पाचव्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी स्पर्धेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, 14 जानेवारी 2027 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच क्रिकेट चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे.
WPL च्या पाचव्या हंगामातील सामने दोन शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. यामध्ये वडोदरा आणि मुंबईचा समावेश आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा 14 ते 24 जानेवारीदरम्यान वडोदरा येथे पार पडेल. त्यानंतर 26 जानेवारीपासून स्पर्धेचा दुसरा टप्पा मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.
यंदाच्या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होणार असून लीग टप्प्यात 20 सामने आणि त्यानंतर एलिमिनेटर व अंतिम सामना असे मिळून एकूण 22 सामने होतील. विशेष म्हणजे, प्रत्येक मैदानावर 11 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होतील.
14 जानेवारीला स्पर्धेचा सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. वडोदरा येथे हा सामना खेळवला जाईल. गतविजेता RCB आपल्या विजेतेपदाच्या बचावासाठी मैदानात उतरेल, तर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने खेळेल.
दोन्ही संघांमध्ये यापूर्वीही अनेक रंगतदार सामने झाले आहेत. त्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असेल. 15 जानेवारीला गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होईल, तर 16 जानेवारीला दिल्ली कॅपिटल्स आणि RCB आमनेसामने येतील.
लीग टप्प्यातील सामने 3 फेब्रुवारीला संपणार आहेत. त्यानंतर 5 फेब्रुवारीला एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांमध्ये ही लढत होईल. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.
WPL 2027 चा अंतिम सामना 7 फेब्रुवारीला मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.
भारतात WPL 2027 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर मोबाईल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण JioHotstar वर उपलब्ध असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.