

कोलंबो: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नसून ती दोन्ही देशांतील चाहत्यांसाठी भावनांची लढाई असते. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. मात्र, या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी चाहत्यांच्या संतापाचे आणि विचित्र वर्तनाचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये एका पाकिस्तानी युट्यूबरने संताप व्यक्त करण्यासाठी चक्क एका तरुणीच्या चेहऱ्यावर केक फासल्याचा प्रकार समोर आला आहे.
भारताने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ११४ धावांवर गडगडला. या मोठ्या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रियांचा पूर आला. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी युट्यूबर आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह बसलेला दिसतो. पाकिस्तानच्या पराभवामुळे तो प्रचंड संतापलेला असताना, तिथे उपस्थित असलेल्या एका मुलीने त्याला केकबद्दल काहीतरी विचारले. त्या क्षणी रागाच्या भरात या युट्यूबरने तो केक त्या मुलीच्या चेहऱ्यावर जोरात फासला.
हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच युजर्सनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी याला केवळ एक मनोरंजनाचा भाग म्हटले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात लोकांनी यावर टीका केली असून, अशा प्रकारे महिलांचा अनादर करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. क्रिकेटमधील हार-जीत पचवता न आल्याने अशा प्रकारे वागणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
केवळ केक फासण्याचेच नव्हे, तर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा टीव्ही फोडल्याचे प्रकारही पाहायला मिळाले. कोलंबोतील मैदानात पाकिस्तानची फलंदाजी कोसळत असताना, एका चाहत्याने रागाच्या भरात स्वतःचा टीव्ही सेट बॅटने फोडून टाकला. "भारताने पुन्हा एकदा आम्हाला हरवले, आता हा टीव्ही बघण्यात काहीच अर्थ नाही," असे म्हणत या चाहत्याने आपला संताप व्यक्त केला.
या सामन्यात भारताचा सलामीवीर ईशान किशन याने ४० चेंडूत ७७ धावांची झंझावाती खेळी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी अचूक मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. या विजयामुळे भारताने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचे आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.