Suryakumar Yadav: भारतीय फलंदाजीसाठी 2022 हे वर्ष तसं संमिश्र स्वरुपाचं राहिलं. एकिकडे सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यरसारखे फलंदाज संपूर्ण वर्षात चमकले, तर केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या फलंदाजांचे फॉर्म वर-खाली राहिले. त्यातही मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये हे संपूर्ण वर्ष सूर्यकुमारच्या नावावर राहिलं, असे म्हणता येऊ शकते.
सूर्यकुमारने अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. मात्र त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. त्याने 2022 वर्षात ज्याप्रकारे खेळ केला आहे, त्यात त्याने भल्याभल्या क्रिकेटपटूंना मागे टाकलंय.
सूर्यकुमारने यावर्षात 44 सामने भारतीय संघाकडून खेळले आहेत. या 44 सामन्यांत त्याने 2 शतके 10 अर्धशतकांसह 40.68 च्या सरासरीने 1424 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा 157 चा स्ट्राईक रेट होता. तो यावर्षी भारताकडून श्रेयस अय्यरनंतर (1609) सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमारचे वर्चस्व
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2022 वर्षात सूर्यकुमारने 31 सामन्यांत 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या आहेत. त्याने याच वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2 शतके केली. तसेच 9 अर्धशतके केली.
त्याने या वर्षात तब्बल 68 षटकारही मारले. तो यंदा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाराही खेळाडू आहे. इतकंच नाही, तर तो एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा करणारा मोहम्मद रिझवान नंतरचा केवळ दुसरा खेळाडू आहे. रिझवानने 2021 साली 29 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 1326 धावा केल्या होत्या.
स्ट्राईक रेटच्या बाबतीतही सूर्यकुमार वरचढ
सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1164 धावा 187.43 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. त्याला केवळ श्रीलंका आणि पाकिस्कानविरुद्ध 150 पेक्षा कमीच्या स्ट्राईकरेटने धावा करता आल्या आहेत. बाकी त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध 190 पेक्षा अधिकच्या स्ट्राईकरेटने धावा केल्यात.
सूर्यकुमारने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला चेंडूही षटकारासाठी मारला होता. त्याने त्याच्या खेळण्याच्या स्टाईलने भारताचा 'मिस्टर 360' खेळाडू हा नावलौकिकही मिळवला आहे. त्याचे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनीही कौतुक केले आहे.
विशेष म्हणजे वयाच्या तिशीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेल्या सूर्यकुमारने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचे इतके चांगले सातत्य ठेवले आहे की तो क्रमवारीतही सातत्याने प्रगती करत आहे. तो आयसीसी क्रमवारीत टी20 प्रकारात फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावरही विराजमान आहे.
एकूणच सूर्यकुमारची ही प्रगती पाहाता तो भविष्यात भारतीय संघातील प्रमुख फलंदाज बनून महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारताला आगामी काळात 2023 वनडे वर्ल्डकप आणि 2024 टी20 वर्ल्डकप खेळायचा आहे. या स्पर्धेत सूर्यकुमारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.