Boxing Day Test नक्की आहे तरी काय अन् टीम इंडियाचा याच्याशी कसा संबंध?

बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय?
India Test Team
India Test Team Dainik Gomantak
Published on
Updated on

Boxing Day Test: सोमवारपासून म्हणजेच 26 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दोन्ही कसोटींना 'बॉक्सिंग डे टेस्ट' असे संबोधले जात आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल, 'बॉक्सिंग डे टेस्ट' म्हणजे नक्की काय? तर याबाबतच थोडक्यात जाणून घेऊया.

India Test Team
Team India: नववर्षाची सुरुवात व्यस्त! 3 महिन्यांत 3 संघांविरुद्ध 6 मालिका, पाहा संपूर्ण वेळापत्रक

बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय?

नाताळ हा दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. त्याचा दुसरा दिवस म्हणजेच 26 डिसेंबर बॉक्सिंग डे म्हणून ओळखला जातो. बॉक्सिंग डे बद्दल अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. असे म्हटले जाते की नोकरदार वर्गाला या दिवशी बॉक्समधून भेटवस्तू दिल्या जातात, तसेच अनेकजण आपल्या मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांनाही भेट देतात. म्हणून या दिवसाला बॉक्सिंग डे असे म्हटले जातात.

तसेच अशीही कथा आहे की चर्चमधील दान पेटी 26 डिसेंबर रोजी उघडली जाते आणि त्यातून गरजूंना मदत केली जाते. त्यामुळेही या दिवसाला बॉक्सिंग डे असे म्हटले जाते.

तर, याचमुळे 26 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यांना 'बॉक्सिंग डे टेस्ट' म्हणून ओळखले जाते. यादिवशी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे देश बऱ्याचदा कसोटी सामना खेळताना दिसतात. त्यातही ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बॉक्सिंग डे कसोटी खेळवण्याची परंपरा गेली चार दशके नियमितपणे सुरू आहे.

कशी सुरू झाली बॉक्सिंग डे टेस्ट?

अनेक रिपोर्ट्सनुसार 1892 साली ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत स्पर्धा शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत मेलबर्न येथे व्हिक्टोरिया विरुद्ध न्यू साऊथ वेल्स या संघांमध्ये नाताळाच्या सुट्यांदरम्यान सामना झाला होता. तेव्हापासून या दोन संघांत नाताळादरम्यान सामना खेळवण्याची परंपरा सुरू झाली.

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1913 साली जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात 26 डिसेंबर रोजी कसोटी सामना सुरू झाला होता. सध्या माहित असलेल्या क्रिकेट इतिहासानुसार हा पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हणून ओळखला जातो. या सामन्यात इंग्लंडने 1 डाव आणि 12 धावांनी विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाने 1950 साली इंग्लंडविरुद्ध मेलबर्नला पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला असल्याचे सांगितले जाते. त्यावर्षी 22 ते 27 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात हा कसोटी सामना झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

India Test Team
T20 World Cup for Blind: टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वविजेते; मोदींसह राष्ट्रपतींकडूनही कौतुकाचा वर्षाव

त्यानंतर 1980 पर्यंत केवळ चार बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्नला झाल्या. तसेच तीन कसोटी ऍडलेडला खेळवण्यात आले होते. मेलबर्नला झालेल्या चार कसोटी 1952, 1968, 1974 आणि 1975 साली झाले होते.

यातील 1952 मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला होता, ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला. तसेच 1968 आणि 1975 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सामना झाला होता, हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. 1974 साली झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना अनिर्णित राहिलेला.

तसेच ऍडलेडला 1967, 1972 आणि 1976 साली सामने झालेले. यातील 1967 साली भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. तर 1972 आणि 1976 साली पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना झालेला. 1972 साली ऑस्ट्रेलियाने सामना जिंकलेला, तर 1976 साली पाकिस्तानने विजय मिळवलेला.

त्यानंतर 1980 पासून दरवर्षी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवला जातोच. केवळ 1989 हे एकमेव वर्ष होते, ज्यावर्षी बॉक्सिंग डे कसोटी न होता वनडे सामना झाला होता. त्यावर्षी 26 डिसेंबर रोजी मेलबर्नवरच ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात वनडे सामना झालेला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाप्रमाणेच दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघही देखील बॉक्सिंग डे कसोटी नियमित खेळताना दिसतात. मात्र, जशी परंपरा ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानात कसोटी सामना खेळवण्याची जोपासली गेली आहे, तशी परंपरा दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये नाही.

India Test Team
Team India: निवृत्तीनंतरही मैदानात परतणार टीम इंडियाचे 'हे' दोन धाकड खेळाडू

भारतीय संघाचे सामने

भारताने 1980 नंतर मेलबर्नमध्ये 9 बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत. हे सामने भारतीय संघाने 1985, 1991, 1999, 2003, 2007, 2011, 2014, 2018 आणि 2020 साली खेळले आहेत.

याशिवाय भारताने बॉक्सिंग डेच्या दरम्यान विविध स्टेडियमवर 1980 नंतर 20 कसोटी सामने खेळले आहेत. मेलबर्नवरील सामने वगळता भारताने बॉक्सिंग डे दरम्यान 1981, 1982, 1983, 1987, 1992,1996, 1998, 2006, 2010, 2013, 2021 या वर्षी कसोटी सामने खेळलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com