U19 Team India च्या पोरींचा संघर्षही मोठाच! कोणाचे वडील शिपाई, कोणाच्या आईने सोसले घाव

19 वर्षांखालील टी२० वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघात स्थान मिळवलेल्या खेळाडूंचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
U19 India Women Team
U19 India Women Team Dainik Gomantak
Published on
Updated on

U19 India Women Team: भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने रविवारी आयसीसीच्या पहिल्या 19 वर्षांखालील महिला टी२० वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. युवा भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील इंग्लंडच्या महिला संघाला 7 विकेट्सने पराभूत करत विश्वविजेतेपद आपल्या नावे केले.

भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील हे पहिलेच आयसीसी विजेतेपद ठरले. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकणाऱ्या 19 वर्षांखालील भारतीय संघाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.

दरम्यान, या संघाचा भाग असलेल्या 16 खेळाडूंसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. यातील अनेक जणींना इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. याच १५ विश्वविजेत्या खेळाडूंबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

U19 India Women Team
U19 World Cup Final: विश्वविजयाचा आनंदच न्यारा! वर्ल्डकप जिंकताच U19 Team India चा भन्नाट डान्स

1. शफाली वर्मा (कर्णधार)

शफाली वर्मा हे नाव तसं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या ओळखीचे आहे. वयाच्या 15 व्या वर्षी वरिष्ठ भारतीय महिला संघाकडून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले होते. इतकेच नाही तर तिने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे.

हरियाणातील असलेल्या शफालीने लहानपणीच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. तिला मोठे फटके खेळण्याबद्दल तिच्या वडिलांकडून बक्षीसही मिळायचे. यातूनच तिच्यातील आक्रमक फलंदाजी शैली तयार झाली. तिची प्रतिभा पाहाता तिला लहान वयातच वरिष्ठ राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधीही मिळाली आणि आता ती विश्वविजेती कर्णधारही बनली आहे.

2. श्वेता सेहरावत

भारताच्या विश्वविजयात मोठा वाटा असलेल्या खेळाडूंमध्ये श्वेताचाही समावेश आहे. तिने या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 297 धावाही फटकावल्या. दिल्लीची असलेली श्वेता वरच्या फळीत फलंदाजी करते. तिची मोठी बहिणही काही काळ क्रिकेट खेळली, पण मोठ्या बहिणीने शिक्षण घेण्यासाठी क्रिकेट कारकिर्द सोडण्याचा विचार केला.

मात्र श्वेताने क्रिकेटमध्येच कारकिर्द घडवायची असा निर्धार करत चांगला खेळ करत राहिली. त्याचेच बक्षीस म्हणून तिला 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. तिला तिच्या कारकिर्दीत तिच्या कुटुंबाचाही मोठा पाठिंबा मिळाला. तिने सुरुवातीला मुलांबरोबर क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.

U19 India Women Team
U19 Women's T20 WC: भारताच्या पोरी, जगात भारी! शफालीची टीम इंडिया विश्वविजेती, इंग्लंड फायनलमध्ये पराभूत

3. रिचा घोष

शफालीप्रमाणे रिचा घोष हे नावही भारतीय क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिचादेखील वरिष्ठ भारतीय संघाकडून यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली आहे. तिच्याकडे आक्रमक खेळण्याची शैली आहे.

बंगालची असलेल्या रिचाच्या नावावर महिला वनडेत भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही आहे. रिचाचे वडील क्रिकेट खेळायचे त्यामुळे तिलाही क्रिकेटचा लळा लागला आणि तिने वडिलांसह क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केले. तिच्या वडिलांनीही तिला या प्रवासात मोठा पाठिंबा दिला.

4. गोंगाडी त्रिशा

अंतिम सामन्यात सौम्या तिवारीसह महत्त्वपूर्ण भागीदारी करणारी गोंगाडी त्रिशा लहानपणापासूनच प्रतिभाशाली क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला येत होती. तिने 12 व्या वर्षीच देशांतर्गत स्तरावर 19 वर्षांखालील क्रिकेट खेळले होते.

तिच्या फटक्यांमध्ये चांगली ताकद आहे. तिच्यासाठी तिच्या वडिलांनी नोकरीही सोडली होती आणि तिच्यासह ते हैदराबादला स्थायिक झाले होते. तिनेही मेहनत घेत वडिलांची मेहनत वाया जाणार नाही याची काळजी घेतली.

U19 India Women Team
U19 World Cup Final: विश्वविजेती U19 टीम इंडिया होणार मालामाल, BCCI सचिव जय शहांची मोठी घोषणा

5. सौम्या तिवारी

19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये भारताला गरज असेल, तेव्हा महत्त्वपूर्ण खेळी सौम्याने केल्या. वर्ल्डकप विजेतेपदासाठी विजयी धाव घेण्याचा मानही सौम्याला मिळाला. तिने वर्ल्डकपपूर्वी युवा न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिके संघांविरुद्धही चांगली कामगिरी केली होती. मध्य प्रदेशची असलेली सौम्या चांगली क्षेत्ररक्षकही आहे. तसेच ती विराट कोहलीची मोठी चाहती आहे.

तिला लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये रुची होती. ती कपडे धूण्याच्या धोपटणीने देखील खेळायची . हे पाहून तिच्या वडिलांनी आणि मोठ्या बहिणीने तिला क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले. पण तिथे मुली ट्रेनिंग घेत नसल्याने तिने तीन वर्षे मुलांबरोबर ट्रेनिंग घेतले. पण नंतर तिची मध्यप्रदेशच्या 23 वर्षांखालील संघात स्थान मिळाले. तिथून तिने मागे वळून पाहिले नाही.

6. सोनिया मेंधिया

सोनिया ही हरियाणाची अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. ती ऑफ स्पिन गोलंदाजी करते, तर उजव्या हाताने फलंदाजी करते. तिच्याकडे तळातील फलंदाजीत चांगले योगदान देण्याची क्षमता आहे. ऋषभ पंतची चाहती असलेल्या सोनियाने तिच्या वडिलांना लवकर गमावले होते. पण त्यानंतरही तिच्या कुटुंबाने तिला क्रिकेट खेळण्यासाठी पाठिंबा दिला.

विशेषत: तिच्या भावाने तिला क्रिकेटसाठी अधिक प्रोत्साहन दिले. अखेर तिने हरियाणा संघात स्थान मिळवले आणि आता ती विश्वविजेत्या भारतीय संघाचाही भाग बनली.

7. हर्ली गाला

16 वर्षांची हर्ली गाला ही अष्टपैलू खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतील योगदान देण्याची तिची क्षमता तिची मोठी ताकद आहे. तिने 15 व्या वर्षीच मुंबईसाठी वरिष्ठ स्तरावर खेळली होती. विशेष म्हणजे हर्लीला सुरुवातीपासून क्रिकेटमध्ये रस नव्हता. ती लहानपणापासून स्केटिंग करत होती. तिने विविध स्तरावर स्केटिंगही केले.

मात्र ११ व्या वर्षी तिला घोट्याची दुखापत झाली. त्यामुळे तिला बराच काळ स्केटिंगपासून लांब राहावे लागले. यादरम्यान, तिच्या वडिलांनी ती खेळापासून दूर राहायला नको म्हणून क्रिकेटची गोडी लावली. त्यांनी तिच्यासाठी प्रशिक्षकही नियुक्त केला. तिचीही हळुहळू क्रिकेटमधील गोडी वाढली. त्यानंतर आज युवा भारतीय संघाचा भागही बनली आहे.

U19 India Women Team
U19 India Women: पंतप्रधान अन् राष्ट्रपतींकडूनही U19 WC विजेत्या टीम इंडियाचं कौतुक, पाहा ट्वीट्स

8. ह्रिषिता बासू

बंगालची यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या ह्रिषितासाठी एमएस धोनी आदर्श आहे. ती १९ वर्षांखालील वर्ल्डकपसाठी भारताची यष्टीरक्षणासाठी दुसरा पर्याय होती. पण असे असले तरी तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये रिचासह संधी मिळत होती.

तिचे यष्टीरक्षणातील तंत्र चांगले आहे. तसेच खालच्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमताही तिच्याकडे आहे. स्कूप शॉट तिचा आवडता फटका असून ती लहानपणापासून माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्लाच्या अकादमीमध्ये सराव करते. तिथेच तिने क्रिकेटचे धडे गिरवले होते. इथे केलेल्या मेहनतीमुळे आज ती वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भागही बनू शकली.

9. सोनम यादव

उत्तर प्रदेशची असलेली सोनम डावखुरी फिरकीपटू आहे. ती वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळलेल्या भारतीय संघाचाही भाग होती. ती चेंडूला चांगली फ्लाईट देऊ शकते. विशेष म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सोनमचे वडील काच कारखान्यात काम करतात. पण ती जेव्हा 13 वर्षांची होती तेव्हा तिचा क्रिकेट खेळण्याचा रस आणखी वाढला.

ती घराशेजारील मैदानात मुलांबरोबर क्रिकेट खेळायची आणि तिच्या वयापेक्षा मोठ्या मुलांनाही बाद करायची. तिच्या या प्रतिभेला तिच्या घरच्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर तिने फिरोजशाहमधील क्रिकेट कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. तिथे मेहनत घेत तिने 19 वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळवले. ती यादरम्यान गोवा, विशाखापट्टणम अशा ठिकाणी ट्रेनिंगसाठीही गेली होती.

U19 India Women Team
U19 India Women: अन् वर्ल्ड चॅम्पियन शफालीच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू, शब्दही फुटेना, पाहा इमोशनल Video

10. मन्नत कश्यप

सोनमप्रमाणेच मन्नतही डावखुरी फिरकीपटू आहे. पण मन्नतचा वेग थोडा अधिक असून तिच्या गोलंदाजी शैलीत एक वेगळी लय आहे. तिने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडची एक महत्त्वपूर्ण विकेटही घेतली होती.

तिच्या वडिलांचा आईसस्क्रिमचा व्यावसाय आहे. त्यांनीच तिला वयाच्या 9 व्या वर्षापासून खेळाची गोडी लावली. पण लहानपणी पटियालामध्ये मुलींना क्रिकेट प्रशिक्षण देणारे कोचिंग सेंटर त्यांना मिळेना म्हणून तिने मुलांबरोबरच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिची चुलत बहीण नुपूर कश्यपदेखील क्रिकेटपटू असल्याने तिच्याकडून तिने क्रिकेट खेळण्याची प्रेरणा घेतली.

11. अर्चना देवी

भारतीय संघासाठी प्रमुख फिरकीपटू ठरलेल्या अर्चना देवीने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या सुरुवातीच्याच दोन विकेट्स घेण्याबरोबरच एक सुंदर झेलही घेतला होता. त्यामुळे तिचे वर्ल्डकप विजयात योगदानही महत्त्वपूर्ण राहिले.

मात्र तिचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तिच्या वडिलांचे 2008 मध्येच कर्करोगाने निधन झाले. त्याचबरोबर एका भावाचे साप चावल्याने निधन झाले. अशा परिस्थितीत तिच्या आईने संघर्ष करत तिला क्रिकेटसाठी पाठिंबा दिला.

तिच्या आईने लोकांच्या रोजच्या बोलण्याला कंटाळून तिला लांब मुराबादमध्ये बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले. अर्चेनानेही मेहनत करत क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली. त्यामुळे तिच्या आईला बोल लावणारे लोकच आज तिचे कौतुकही करत आहेत.

U19 India Women Team
U19 Women's T20 WC: कॅप्टन शफालीचा बड्डे अन् 'गोल्डन बॉय'ची उपस्थिती; सेलिब्रेशनचा Video Viral

12. पार्शवी चोप्रा

भारतासाठी पार्शवी चोप्रा महत्त्वाची गोलंदाज ठरली. तिने 6 सामन्यात 11 विकेट्स घेत वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. फिरकी गोलंदाज असलेल्या पार्शवीने तिच्या या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

हर्लीप्रमाणे पार्शवी देखील लहानपणापासून स्केटिंग करायची. पण तिचे वडिल आणि काका क्रिकेटपटू होते. तिच्या वडिलांची इच्छा होती की पार्शवीनेही क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवावी. त्यामुळे त्यांची तिचा प्रवेश क्रिकेट अकादमीमध्ये करून घेतला. वडिलांच्या आज्ञेनुसार तिने क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तिने वयाच्या 13 व्या वर्षीच उत्तर प्रदेशसाठी पहिला सामनाही खेळला होता.

14. तितास साधू

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली तितास वेगवान गोलंदाज आहे. नवीन चेंडूने फलंदाजांना अडचणीत आणण्याची तिच्याकडे चांगली श्रमता आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर ती घातक ठरते.

बंगालची असलेली तितासने वडिलांप्रमाणेच खेळात कारकिर्द घडवली. पण तिने पहिल्यांदा ऍथलेटिक्स खेळली, नंतर तिने स्विंमिग स्पर्धेतही सहभाग नोंदवला आणि टेबल टेनिसही खेळली.

पण एकदा तिच्या क्लबमध्ये एका नेट गोलंदाजाची गरज होती. त्यावेळी तिने तिथे गोलंदाजी केली आणि तिला क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला. त्यानंतर तिने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे आभ्यासातही हुशार असतानाही तिने खेळासाठी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता.

U19 India Women Team
U19 Women's T20 WC: 'सेलिब्रेटी बनल्यावर लक्षात ठेवा...', नीरज चोप्राचा टीम इंडियाला बहुमोल सल्ला

15. फलक नाझ

प्रयागराजमधील एका गरिब कुटुंबातून आलेल्या फलकनेही भारतीय संघात 19 वर्षांखालील वर्ल्डकपसाठी निवड होण्यापर्यंतचा मोठा प्रवास केला. तिचे वडील एका खाजगी शाळेत शिपाईची नोकरी करतात. तर तिचा भाऊ सायकल रिपेरिंगचे दुकान चालवतो.

अशा परिस्थितीत तिच्या क्रिकेट कोचिंगसाठी फार खर्च करण्याची तिच्या कुटुंबाची स्थिती नव्हती. पण तरी त्यांनी तिला पाठिंबा दिला. त्यातच त्यांना मदत मिळाली ती तिचे प्रशिक्षक अजय यादव यांची. त्यांनी तिला त्यांच्या अकादमीमध्ये मोफत ट्रेनिंग देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ती क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवू शकली. तिने तिच्या प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार अष्टपैलू क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला होता.

16. शबनम

आंध्रप्रदेशची वेगवान गोलंदाज शबनमने वर्ल्डकपपूर्वी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या युवा संघाविरुद्ध तिच्यातील प्रतिभा दाखवली होती. त्यामुळे अवघ्या 15 व्या वर्षी तिने वर्ल्डकपसाठी युवा भारतीय संघात स्थान मिळवले.

तिचे पालक नौदलाच नोकरी करतात. तसेच तिचे वडीलही क्लब स्तरावर वेगवान गोलंदाजी करत असल्याने तिच्यात क्रिकेटची गोडी निर्माण झाली. ते तिला त्यांच्या सामन्यांवेळी मैदानातही घेऊन जायचे. तिथे तिच्यात क्रिकेटबद्दलचे प्रेम निर्माण झाले. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला क्रिकेट अकादमीत ऍडमिशन करून दिले.

ती एनएडी आणि विशाखापट्टणम डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सराव करू लागली. तिने तिच्या प्रतिभेच्या जोरावर आंध्रप्रदेशच्या युवा संघातही स्थान मिळवले. तिची लहान बहिणही तिच्यासह क्रिकेट खेळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com