U19 India Women Team: रविवारचा दिवस म्हणजेच 29 जानेवारी भारतीय महिला क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. रविवारी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकपला गवसणी घातली. यानंतर युवा भारतीय महिला संघाने जोरदार जल्लोष केला.
युवा भारतीय महिला संघाने रविवारी झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील इंग्लंड महिला संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारतीय महिलांनी पहिल्या 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकपवर नाव कोरले.
विशेष गोष्ट अशी की भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील हे पहिलेच आयसीसी विजेतेपद आहे. त्यामुळे हे विजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय खेळाडू खूपच आनंदी दिसत होते. त्यांनी विजेतेपद जिंकल्यानंतर मैदानात काला चश्मा गाण्यावर ठेकाही धरला.
यावेळी खेळाडूंच्या गळ्यात वर्ल्डकप विजयाचे मेडलही दिसत आहे. तसेच ते वेगवेगळ्या डान्स मुव्ह्ज करत त्यांचा आनंद साजरा करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर युजर्सकडून मोठी पसंतीही मिळाली असून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
विश्वविजेत्या संघाला 5 कोटींचे बक्षीस
युवा भारतीय महिला संघाने टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांच्यासाठी 5 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. त्यांनी हे बक्षीस जाहीर करताना म्हटले आहे की भारतात महिला क्रिकेटमध्ये प्रगती होत आहे आणि वर्ल्डकप विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा उंचावला गेला आहे.
अंतिम सामन्यात भारताचा विजय
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला 68 धावांवरच रोखले होते. भारतीय गोलंदाजांमध्ये तितास साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच शफाली वर्मा, मन्नत कश्यप आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तसेच नंतर 69 धावांचे आव्हान भारतीय संघाने केवळ 14 षटकातच पूर्ण केले. भारताकडून गोंगाडी त्रिशा आणि सौम्य तिवारी यांनी प्रत्येकी 24 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून हनाह बेकर, ग्रेस स्क्रिव्हन्स आणि ऍलेक्सा स्टोनहाऊसने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.