U19 Women's T20I World Cup: रविवारी १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने पहिल्या १९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्डकपवर सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. या विश्वविजेतेपदानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी जगज्जेत्या युवा भारतीय महिला संघासाठी मोठे बक्षीस जाहीर केले आहे.
जय शाह यांनी ट्विटरवरून १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी घोषणा केली की या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंना आणि सपोर्ट्स स्टाफला ५ कोटी रुपयांच बक्षीस जाहीर केले आहे.
त्यांनी ट्वीट करत लिहिले की 'भारतात महिला क्रिकेटमध्ये प्रगती होत आहे आणि वर्ल्डकप विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा उंचावला गेला आहे. संपूर्ण संघाला आणि सपोर्ट स्टाफला ५ कोटी रुपयांचे बक्षीस घोषित करताना मला आनंद होत आहे. हे नक्कीच क्रांती घडवणारे वर्ष आहे.'
याशिवाय जय शाह यांनी 1 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड पुरुष क्रिकेट संघात अहमदाबादला होणाऱ्या अखेरच्या टी२० साठी विश्वविजेत्या १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाला आमंत्रितही केले आहे.
(Jay Shah Announced U19 India Women Team Will receive INR 5 Crore after wining U19 Women T20 World Cup 2023)
भारतीय महिलांचा पहिलेच विजेतेपद
आयसीसी स्पर्धामधील भारतीय महिला क्रिकेटसाठी हे पहिलेच विजेतेपद ठरले आहे. यापूर्वी भारतीय महिला संघ अनेकदा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचले होते. मात्र विजेतेपद मिळवता आले नव्हते. अखेर रविवारी भारतीय महिला क्रिकेटला आयसीसीचे पहिले विजेतेपद मिळाले आहे.
भारताचा इंग्लंडवर विजय
रविवारी १९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना १९ वर्षांखालील इंग्लंड महिला संघाविरुद्ध झाला होता. या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर ६९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने १४ षटकात पूर्ण केले. भारताकडून सौम्या तिवारी आणि गौंगाडी त्रिशा यांनी प्रत्येकी २४ धावा करत भारताचा विजय सोपा केला.
तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडची कोणतीही फलंदाज २० धावांचा आकडा पार करणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे इंग्लंडचा संघ १७.१ षटकातच ६८ धावांवर सर्वबाद झाला होता.
भारताकडून तितास साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच शफाली वर्मा, मन्नत कश्यप आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.