

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी कठोर पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही फेसबुक पेजेस आणि स्पोर्ट्स वेबसाइट्सविरोधात गांगुली यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे. कोलकाता येथील ठाकूरपुकुर पोलिस ठाण्यात त्यांनी रितसर लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
गांगुली यांनी केलेल्या तक्रारीनुसार, 'सौरव गांगुली फॅन्स' (Sourav Ganguly Fans) नावाचे एक फेसबुक पेज सक्रिय आहे. या पेजला तब्बल ३६ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, हे पेज गांगुलींचे अधिकृत पेज असल्याचा दावा केला जात आहे.
मात्र, याच पेजवरून गांगुली यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. या पोस्टमुळे सार्वजनिक जीवनात आपली प्रतिमा डागाळली जात असल्याचा गंभीर आरोप गांगुली यांनी केला आहे.
केवळ फेसबुक पेजच नव्हे, तर एका क्रीडाविषयक वेबसाइटनेही गांगुलींच्या व्यावसायिक आयुष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे मजकूर प्रसिद्ध केले आहेत. या सर्व बाबींचे स्क्रीनशॉट्स गांगुली यांनी पुराव्यादाखल पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.
या प्रकरणी बोलताना गांगुली म्हणाले की, "मी एक सार्वजनिक व्यक्ती आहे, त्यामुळे लोकांचे मत आणि टीका मी समजू शकतो, ते माझ्या आयुष्याचा भाग आहेत. मात्र, केवळ माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पसरवला जाणारा खोटा आणि बदनामीकारक मजकूर मी कदापि सहन करणार नाही."
सध्याच्या राजकीय चर्चांवरही गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहरामपूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून युसूफ पठाण यांना राजीनामा देण्याचा निरोप गांगुलींमार्फत पाठवला होता, अशी चर्चा माध्यमांमध्ये होती. मात्र, गांगुली यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.
"अशा प्रकारचा कोणताही निरोप मला ममता बॅनर्जी यांनी दिला नाही आणि मी युसूफ पठाण यांच्याशी या संदर्भात कोणताही संवाद साधलेला नाही," असे सांगत गांगुली यांनी हे आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्ट केले. युसूफ पठाण यांनीही या चर्चेला पूर्णविराम देत अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.