

आयपीएल २०२६ मध्ये महेंद्रसिंह धोनीला पुन्हा एकदा मैदानात फटकेबाजी करताना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ५ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी धोनी संघासोबत दिल्लीला रवाना झालेला नाही. तो अद्याप पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही, ज्यामुळे तो सध्या चेन्नईतच राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे.
सीजनच्या सुरुवातीपासूनच दुखापतीमुळे त्रस्त असलेला धोनी पुनरागमनाच्या अगदी जवळ होता. मात्र, सरावादरम्यान पुन्हा एकदा त्याच्या स्नायूंवर ताण आल्याने ही दुखापत गंभीर बनली आहे.
मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, "पिंडरीची दुखापत अत्यंत गुंतागुंतीची असते. जर धोनीने घाईत धावण्याचा प्रयत्न केला आणि स्नायू पुन्हा दुखावले गेले, तर तो संपूर्ण हंगामातून बाहेर होऊ शकतो. सराव सामन्यादरम्यान त्याला पुन्हा झटका बसला, त्यामुळे त्याच्या रिकव्हरीला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे."
धोनीच्या वाढत्या वयाचा आणि भविष्याचा विचार करता, चेन्नईचे व्यवस्थापन कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. अर्धवट तंदुरुस्त असताना त्याला मैदानात उतरवणे संघासाठी आणि त्याच्या करिअरसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे टूर्नामेंटच्या शेवटच्या टप्प्यात धोनी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्याला सध्या पूर्ण विश्रांती आणि रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जावे लागत आहे.
धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सीएसकेसाठी आपल्या पहिल्याच हंगामात संजूने ९ सामन्यांत ३१५ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये दोन जबरदस्त शतकांचा समावेश असून, त्याच्या या कामगिरीमुळे चेन्नईचा डाव सावरण्यास मोठी मदत झाली आहे. धोनी नसला तरी संजूने आपल्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.
यंदाचा हंगाम चेन्नईसाठी संमिश्र राहिला आहे. सुरुवातीच्या काही पराभवानंतर संघाने लय पकडली असून, मागील पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. सध्या ९ सामन्यांनंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. प्ले-ऑफची शर्यत जिवंत ठेवण्यासाठी चेन्नईला आगामी सामन्यांत विजय मिळवणे अनिवार्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.