पणजी : सलग चौथ्या सामन्यात डावाचा पराभव उभा ठाकलेला असताना आयुष वेर्लेकर व उदित यादव यांनी झुंजार फलंदाजी केली, त्यांचे प्रयत्न तोकडे ठरले. पण प्रतिस्पर्ध्यांना दुसऱ्या डावात पुन्हा फलंदाजी करण्यास भाग पाडणे याचेच गोव्याला समाधान लाभले. छत्तीसगडने सामना जिंकला, तरीही 21 धावांच्या आव्हानासमोर एक विकेट गमावल्यामुळे बोनस गुणास मुकावे लागले याची सल त्यांना राहिली.
सूरत येथील लालभाई कॉन्ट्रेक्टर स्टेडियमवर कुचबिहार करंडक क्रिकेट (cricket) स्पर्धेच्या एलिट क गटात छत्तीसगडने बुधवारी गोव्याला (goa) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नऊ विकेट राखून हरविले. आयुष व उदित यांनी सहाव्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. उदितसह गोव्याने शेवटच्या पाच विकेट 38 धावांत गमावल्यामुळे छत्तीसगडला विजयासाठी मोठे आव्हान मिळाले नाही. त्यांनी 4.3 षटकांत एक विकेट गमावून विजयी औपचारिकता पूर्ण केली. 10 विकेट राखून सामना जिंकला असता, तर छत्तीसगडला बोनस गुण मिळाले असते. त्यांचा हा सलग दुसरा विजय ठरला, त्यातून सहा गुण मिळाले. चार लढतीनंतर त्यांचे आता 15 गुण झाले आहेत. गोव्याचा अजूनही शून्य गुणावरच तळात आहे. छत्तीसगडने (Chhattisgarh) पहिल्या डावात 197 धावांची आघाडी घेत गोव्यावर फॉलोऑन लादला होता.
आयुषला तळातील फलंदाजांकडून साथ मिळाली नाही, त्यामुळे तो 89 धावांवर नाबाद राहिला. त्याने 172 चेंडूंतील खेळीत नऊ चौकार व एक षटकार मारला. उदितने फलंदाजीतील सातत्य कायम राखताना 56 धावा केल्या. त्याने 77 चेंडूंचा सामना करताना सहा चौकार व एक षटकार मारला. या दोघांचा अपवाद वगळता गोव्याच्या बाकी फलंदाजांनी साफ निराशा केली. त्यांचा गटातील शेवटचा सामना 27 डिसेंबरपासून मध्य प्रदेशविरुद्ध सूरत येथे खेळला जाईल.
संक्षिप्त धावफलक
छत्तीसगड, पहिला डाव ः 369 व दुसरा डाव ः 4.3 षटकांत 1 बाद 22 (आशिषकुमार दहारिया नाबाद 21, फरदीन खान 2.3-0-14-1, श्रेयस उसगावकर 2-0-8-0) वि. वि. गोवा, पहिला डाव ः 172 व दुसरा डाव (2बाद 10वरून) ः 71.1 षटकांत सर्वबाद 217 (इझान शेख 14, जुनेद सय्यद 2, कौशल हट्टंगडी 26, आयुष वेर्लेकर नाबाद 89, उदित यादव 56, दीप कसवणकर 0, सुजय नाईक 6, श्रेयस उसगावकर 0, फरदीन खान 1, मयांक यादव 16-2, दीपक सिंग 63-2, देव आदित्य सिंग 28-1, दीपक यादव 67-3).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.