Uric Acid levels: नको भीती युरिक ॲसिडची..

रक्तातील युरिक ॲसिडची पातळी वाढण्याला आधुनिक शास्त्रात ‘गाउट’ तर आयुर्वेदात ‘वातरक्त’ म्हणतात
Uric Acid levels
Uric Acid levelsDainik Gomantak

Uric Acid levels: पायाच्या बोटांवर सूज येते आहे, सूज आलेल्या ठिकाणी लालसरपणा दिसतो आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वेदना होत आहेत, अशी लक्षणे घेऊन कोणी व्यक्ती आल्यावर मनात येते रक्ताच्या तपासणीमध्ये युरिक ॲसिड वाढलेले तर नाही ना?

सध्या या तक्रारीचे प्रमाण तरुणांमध्येही वाढलेले दिसते. रक्तातील युरिक ॲसिडची पातळी वाढण्याला आधुनिक शास्त्रात जसे ‘गाउट’ म्हणतात, तसेच आयुर्वेदात ही लक्षणे ‘वातरक्त’ या व्याधीअंतर्गत दिलेली सापडतात. अर्थात प्रत्येक वातरक्तात युरिक ॲसिड वाढलेले असतेच, असे नाही.

सहसा आयुर्वेदातील रोगाचे नाव बरेच काही सांगणारे असते. ‘वातरक्त’ या नावावरूनच यात वातदोष व रक्तधातू या दोघांचाही संबंध असल्याचे लक्षात येते.

साध्या शब्दात सांगायचे, तर रक्ताला जेव्हा प्रकुपित वाताची जोड मिळते तेव्हा या रोगाची संप्राप्ती पूर्ण होते आणि सुरुवातीला छोटे सांधे पण नंतर मोठ्या सांध्यांच्याही ठिकाणी सूज, आरक्तता व वेदना या लक्षणांच्या रूपाने रोग व्यक्त होत असतो. इतर कोणत्याही रोगाप्रमाणे संहितेमध्ये वातरक्त होण्याची कारणे काय हे सांगितलेले आहे.

वातरक्ताची कारणे:-

फार खारट, आंबट, तिखट पदार्थांचे सेवन करणे, तेलकट व वीर्याने उष्ण गोष्टींचे अतिप्रमाणात सेवन करणे, अपचन झालेले असतानाही आहार घेणे. कंदमुळे उदा. गाजर, मुळा, बीट रूट वगैरे तसेच कुळीथ,

उडीद, पावटा, ऊस, दही, कांजी, शिरका वगैरे आंबवून केलेल्या पदार्थांचा आहारात नियमित समावेश असणे, मद्यपान, मांसाहार करणे, विशेषतः पाण्यातील प्राण्यांचे मांस सेवन करणे, परस्पर विरुद्ध गुणांनी युक्त पदार्थ एकत्र मिसळून सेवन करणे, उदा. दूध व फळे, दूध व मीठ, गरम पाणी व मध वगैरे,

अगोदर खाल्लेला आहार पूर्ण पचण्यापूर्वी म्हणजे 3-4 तास होण्यापूर्वीच पुन्हा जेवणे, सतत चिडचिड, रात्री जागरण करणे व दिवसा झोपणे, सतत प्रवास, उपवास, अति मैथुन,

नैसर्गिक वेगांना बळेच आवरून धरणे वगैरे कारणांनी वातदोष व रक्तधातू दूषित झाले की त्यातून वातरक्ताची संप्राप्ती सुरू होते. रक्तशुद्धीसाठी अधूनमधून विरेचन, बस्ती, विशेष औषधी योग न घेणे हे सुद्धा वातरक्ताचे एक कारण असू शकते.

वातरक्तामध्ये वातदोषाचा सहभाग असल्यामुळे यात ‘अटॅक’ येण्याची प्रवृत्ती असते. सहसा अटॅक आला, की काही तासांतच एखाद्या सांध्यावर, विशेषतः पायाच्या बोटांच्या सांध्यावर सूज येते. ती जागा लालसर होते आणि तीव्र वेदना सुरू होतात.

कधी कधी या वेदना इतक्या तीव्र असतात, की त्या ठिकाणी हलका स्पर्श सुद्धा सहन होईनासा होतो. हा अटॅक उपचारांच्या अभावी सात ते दहा दिवस टिकू शकतो. वारंवार या प्रकारे त्रास झाल्यास त्यामुळे हळूहळू सांध्यांमध्ये कायमस्वरूपी बिघाडही होऊ शकतो.

वातरक्ताचे प्रकार

आयुर्वेदात वातरक्ताचे मुख्य दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे त्वचा व मांसधातूच्या आश्रयाने होणारे वातरक्त. यात संप्राप्ती खूप खोलवर पोचलेली नसल्याने यातील लक्षणे खूप तीव्र नसतात.

म्हणजे त्वचा काळवंडणे, त्वचेवर खाज येणे, दाह होणे, सुईने टोचल्याप्रमाणे दुखत राहणे, त्वचेच्या आत पापणी लवते त्याप्रमाणे संवेदना होणे अशी वरवरची लक्षणे असतात. मात्र, दुसऱ्या प्रकारात रोग मेद, अस्थी, मज्जाधातूच्या आश्रयाने होत असल्याने यातील लक्षणे अधिक तीव्र व कष्टदायक असतात.

यात हाडे व सांध्यांमध्ये तोडल्याप्रमाणे सदाह वेदना होतात, वेदना कमी झाल्या तरी ती जागा बधिर होते, कालांतराने सांधे वाकडे होणे, सांध्यांच्या हालचालीवर मर्यादा येणे असेही घडू शकते.

Uric Acid levels
Subhash Phaldesai : आदिवासी आणि इतर समाजातील दरी भरून काढा

वातरक्ताची संप्राप्ती अधिक बळावण्यापूर्वी जर त्यावर योग्य उपचार करता आले तर वातरक्त पूर्णपणे बरे होऊ शकतो असे दिसते. त्यामुळे लवकरात लवकर नेमके निदान आणि त्यावर योग्य उपचार हे याही रोगाच्या बाबतीत महत्त्वाचे होय. उपचारात महत्त्वाचा असतो तो आहार-आचरणामध्ये योग्य बदल.

ज्या कारणामुळे वात प्रकुपित होत असेल आणि रक्तदोष तयार होत असेल ते कारण बंद करणे ही उपचाराची पहिली व अत्यावश्‍यक पायरी होय. यानंतर लेप, अभ्यंग, परिषेक (औषधी काढ्याची धार धरणे), अवगाहन (दुखणारा भाग औषधी काढ्यात बुडवून ठेवणे), स्नेहपान करून शरीरशुद्धी वगैरे उपचारांची योजना करता येते. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नेमके उपचार करणे कधीही श्रेयस्कर..

Uric Acid levels
SCO Meeting: मोठी बातमी! गोव्यात होणाऱ्या SCO बैठकीला उपस्थित राहण्यास पाकिस्तानचा नकार

वातरक्तावरील उपाय

1) गुळवेल ही वातरक्तावर अतिशय गुणकारी असते, कारण ती वातशामक असते, तसेच रक्तदोषही दूर करणारी असते. गुळवेलीच्या काढ्यात थोडा शुद्ध गुग्गुळ टाकून पिण्याचा उपयोग होतो.

2) फार दाह, आरक्तता असणाऱ्या वातरक्तामध्ये शतधौत घृताचा लेप लावण्याचा उपयोग होतो.

3) एरंडाच्या बियांवरचे साल काढून त्या दुधाबरोबर घोटून तयार केलेला लेप लावण्याने वातरक्तामुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.

4) इसबगोल पाण्यात भिजत घालून वाटून तयार केलेला लगदा लावण्याने वातरक्तामुळे आलेली सूज कमी होते.

5) वातरक्ताचा अटॅक आल्यावर त्या ठिकाणी फार दाह होतो, अशा वेळी वरून मेंदीच्या पानांचा जाडसर लेप लावण्याने बरे वाटते.

Uric Acid levels
Singnificance of Holi: संगम परंपरा आणि आरोग्याचा

याप्रकारे औषधोपचार करता येत असले तरी वातरक्तावर पंचकर्मातील विरेचन, बस्ती हे उपाय सर्वोत्तम होत. यामुळे वातदोष संतुलित होतो, तसेच रक्तधातूचीही शुद्धी होते. बस्ती उपचाराची पुढील शब्दात प्रशंसा केलेली आहे,

न हि बस्तिसमं किंचित्‌ वातरक्ते प्रशस्यते ।

...योगरत्नाकर

बस्तीसारखा दुसरा प्रशस्त उपचार वातरक्तामध्ये नसतो. म्हणूनच औषधी सिद्ध तेल व तुपाची बस्ती किंवा रक्तशुद्धिकर व वातशामक द्रव्यांच्या काढ्याची बस्ती हा वातरक्तावरचा उत्कृष्ट उपाय होय.

वातरक्ताचा एकदा त्रास झाला, की तो पुनःपुन्हा होत राहण्याची प्रवृत्ती असू शकते. यामुळे नंतरही काही काळ उपचार घेत राहणे, विशेषतः औषधी सिद्ध घृत घेणे, रक्तशुद्धीकडे लक्ष ठेवणे, अधून मधून बस्ती घेणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पथ्य पाळणे हितावह होय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com