Singnificance of Holi: संगम परंपरा आणि आरोग्याचा

ऋतुबदलाचा त्रास होऊ नये करण्यासाठी आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती यांनी एकत्रित विचार केलाय
Singnificance of Holi
Singnificance of HoliDainik Gomantak

Singnificance of Holi उन्हाळ्याची चाहूल लागली की बघता बघता येते होळी, धूलिवंदन आणि त्यानंतर रंगपंचमी. हिवाळ्यात साठलेला कफदोष उन्हाळ्यातील उष्णतेमुळे पातळ होऊ लागला की त्याचे रूपांतर सर्दी-खोकल्यात सहजतेने होते.

अनेकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीला असा त्रास होताना दिसतो. याला प्रतिबंध होण्यासाठी किंवा यावर उपचार करण्यासाठी आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती यांनी एकत्रित विचार केला तो म्हणजे होळीचा उत्सव.

होळी करताना त्यात शेकोटी पेटवून अग्नीचे पूजन करण्याची जी व्यवस्था केलेली असते ती आयुर्वेदातील स्वेदन उपचारातील जेंताक-स्वेदनाशी इतकी मिळती-जुळती आहे की त्यावरून भारतीय ऋषिमुनींची संस्कृतीतून आरोग्य टिकविण्याची कल्पकता ध्यानात आल्याशिवाय राहत नाही.

पारंपरिक पद्धतीने होळी पेटवताना जमिनीत एक खड्डा खोदून त्यात मध्यभागी पानाफळांसकटची एक एरंडाची फांदी ठेवली जाते, भोवताली सुकलेली लाकडे, गवऱ्या आणि वाळलेले गवत वगैरे रचून ती तिन्हीसांजेच्या वेळ पेटवली जाते.

आसपास राहणारी बरीचशी मंडळी एकत्र येऊन ही होळी पेटवतात आणि होळीत श्रीफळ, पुरणपोळी वगैरे सुग्रास अन्नाचा नैवेद्य अर्पण करतात आणि त्यानिमित्ताने होळीच्या संपर्कात राहतात. त्याचप्रकारे जेतांक स्वेदनामध्ये जमिनीवर मातीपासून गोलाकार कुटी बनवली जाते. हवा आत-बाहेर जायला-यायला अनेक कवडसे असतात.

कुटीच्या आतल्या बाजूला भिंतीलगत लोकांना बसण्यासाठी चौथरा बनवलेला असतो. कुटीच्या मध्यभागी एरंड, खैर, अश्र्वकर्ण वगैरे वातघ्न लाकडे ठेवून अग्नी पेटवला जातो आणि लाकडे व्यवस्थित पेटली, धूर येणे बंद झाले की कुटीतील चौथऱ्यावर बसून घाम येईपर्यंत व शरीर हलके वाटेपर्यंत शेक घ्यायचा असतो.

अशा या जेतांक स्वेदनामुळे कफ-वातशमन होते, शरीरात कुठेही वेदना होत असल्या, जखडलेपण असेल तर ते दूर होते, शेक घेतल्याने थोडा घाम आला की शरीर हलके व मोकळे वाटते. हिवाळ्यात साठलेल्या कफदोषाचा त्रास होऊ नये, उन्हाळा सुरू होताना ऋतुबदलाचा त्रास होऊ नये हा मुख्य हेतू यात आहे हे लक्षात येते.

होलिका नावाच्या राक्षसीच्याभोवती होळीची कथा गुंफलेली दिसते. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका. तिला वर मिळालेला असतो की तुला अग्नीपासून भय नाही. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त असल्याने हिरण्यकश्यपू त्याला मृत्युदंड देतो.

‘जानकीनाथ सहाय करे जब कौन बिगाड करे नर तेरो’नुसार प्रल्हादाला कड्यावरून लोटले, विषारी सर्पाकडून दंश करवला, पाण्यात बुडवले आणि असे अनेक प्रयत्न केले तरी प्रल्हादाचा नाश होता होईना. शेवटी हिरण्यकश्यपूने होलिकाची मदत घ्यायचे ठरवले.

होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन तू बस, राक्षससैनिक तुला पेटवतील परंतु अग्नी तुला जाळण्यास समर्थ नसल्याने तू जिवंत राहशील मात्र प्रल्हाद भस्मसात होईल. प्रत्यक्षात झाले भलतेच.

मूर्तिमंत सात्त्विकतेचे प्रतीक असणारा भक्त प्रल्हाद अग्नीतून अजूनच तेजःपुंज होऊन सुखरूप बाहेर आला आणि होलिका मात्र जळून खाक झाली. नेहमीच सात्त्विकता शिल्लक राहते आणि पाप नष्ट होते.

त्याचप्रकारे स्वेदनाच्या उपचाराद्वारा शरीरातील आवश्‍यक यंत्रणा शिल्लक राहते व दोष जळून जातात. स्वेदन हे एक पंचकर्मापूर्वीचे आवश्‍यक असलेले पूर्वकर्म आहे. परंतु विरेचन, वमनसहित पंचकर्म करायचे नसेल तरी अधून मधून बाष्पस्वेदन व अभ्यंग करण्याने तारुण्य राखण्यास किंवा आरोग्य राखण्यास खूप मदत होते.

हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, परंतु होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही.

हिवाळ्यात झालेला कफसंचय, उन्हाळ्याच्या चाहुलीसरशी होणारा कफप्रकोप, उन्हाळा वाढला की साठायला सुरुवात होणारा वातदोष यासाठी तसेच ऋतुसंधीच्या नाजूक काळात वातावरणात झालेले बदल या सर्वांचा होऊ शकणारा त्रास टाळण्यासाठी येते होळी.

Singnificance of Holi
Wildfires in Mhadai Sanctuary: बिनबुडाचे वनखाते

होळीचा शेक घेतला की दुसऱ्या दिवशी होळीची राख अंगाला लावण्याची प्रथा आहे. राखेमध्ये त्वचा अधिक शुद्ध करण्याची क्षमता असते. त्वचेवर असलेली किटं, बारीत सारीक कळमटं निघून जातात.

होळीनंतर येते रंगपंचमीची पिचकारी. पिचकारीच्या थंड पाण्याने शरीर एकदा धुऊन निघाले की वसंतागमनाच्या बरोबरीने सृजन व्हावे, नवीन कल्पना सुचाव्या, नवीन शिकता यावे, व्यवसाय-धंदा सुरू करता यावा यासाठी प्रेरणा मिळते. केवळ शरीर हेच माणसाचे अस्तित्व नाही. माणसाच्या मनालाही तितकेच महत्त्व आहे.

Singnificance of Holi
Water Dispute: डोंगुर्लीत पाण्यासाठी वणवण

तेव्हा मनाला प्रसन्नता वाटावी म्हणून निसर्गाने जणू ही योजना केलेली असते. या काळात वृक्षांना बारीक बारीक पाने फुटायला लागलेली असतात. पानांचा हिरवा रंग मनाला उत्साह देतो. शिशिरात झाडांच्या अंगावर थंडीमुळे केवळ काटे दिसतात त्याऐवजी आता हिरवी पाने व फुले दिसू लागतात.

पळस, पांगारा, शाल्मली वगैरे वृक्ष केशरी, लाल, गुलाबी फुलांनी सजतात आणि निसर्गातील ही रंगांची उधळण शरीराला व मनाला प्रेरणा देणारी असते. रंगपंचमीच्या दिवशी पिचकारीतील पाण्याला रंग दिला तर अजूनच गंमत येते.

Singnificance of Holi
Subhash Phaldesai : आदिवासी आणि इतर समाजातील दरी भरून काढा

वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या सूचना देण्याची क्षमता असते. मंगलतेचे प्रतीक म्हणून केशरिया किंवा गुलाबी रंग असतात आणि त्यावरून वसंतोत्सवाच्या स्वागताची जणू निसर्ग तयारी करत असतो. या सर्व प्रथा पाहिल्या तर भारतीय संस्कृती, संस्कार, परंपरा, आयुर्वेद व आरोग्य यांचा कसा उत्तम संगम घातलेला आहे हे लक्षात येते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com