

मिलिंद म्हाडगुत
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘विरोधकांचा गोंधळ भाजपच्या पथ्यावर’ हा माझा लेख प्रसिद्ध झाला होता. आणि त्या लेखात लिहिल्याप्रमाणेच तंतोतंत घडले. विरोधकांच्या फुटींमुळे भाजपचे परत एकदा ‘बल्ले बल्ले’ झाले आणि विरोधकांचे हवेत उडणारे पतंग जमिनीवर आपटले.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे हे विरोधकांना कळू नये याचे आश्चर्य तर वाटतेच, त्याचबरोबर विषादही वाटायला लागतो. विरोधक भाजपला सोडून एकमेकांवरच दुगाण्या झाडतात हे पाहून तर विषादाची रेषा अधिकच विस्तारित व्हायला लागते.
कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजी व आप हे स्वतःच्या विश्वात मग्न असल्यामुळे त्यांची ही स्थिती झाली आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही. कॉंग्रेसचेच उदाहरण घ्या. या झेडपी निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त १० जागा मिळाल्या आणि त्यातल्या बहुतेक या सासष्टी तालुक्यातील होत्या.
याचा अर्थ आज हा एक तालुका वगळल्यास कॉंग्रेसला राज्यात स्थान नाही असाच होऊ शकतो. आणखी एक उदाहरण फोंड्याचे घेऊ. फोंडा हा रवि नाईक कॉंग्रेसमध्ये असताना कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता.
त्याच कॉंग्रेसला कुर्टी झेडपीत फक्त १,८७८ मते मिळतात, याचा अर्थ काय? सुभाष शिरोडकर कॉंग्रेसमध्ये असताना शिरोडा मतदारसंघातही कॉंग्रेसचा प्रभाव होता. त्याच मतदारसंघातील बोरी जिल्हा पंचायत मतदारसंघात कॉंग्रेसला फक्त १,८३४ मते मिळतात, हे काय दर्शवते? आज गोव्यातील कॉंग्रेसजवळ सक्षम असा नेता नाही आणि त्याचेच पडसाद या झेडपी निवडणुकीत उमटलेले दिसले.
आपची तर बातच और म्हणावी लागेल! गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन जागा मिळाल्यामुळे आपच्या नेत्यांचे विमान हवेत उडायला लागले होते. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असे जाहीरच करून टाकले होते.
एवढेच नव्हे तर या झेडपी निवडणुकीकरता ते स्वतः प्रचारासाठी गोव्यात आले होते. त्यांच्या दुसऱ्या माजी मुख्यमंत्री आतिशी तर गोव्यात डेराच टाकून बसल्या होत्या. पण एवढे करूनही हाती आली ती फक्त एक जागा.
म्हणजे ’खोदा पहाड निकला चुहा’ अशातला प्रकार. केजरीवाल व आतिशी यांना गोमंतकीयांची मानसिकता समजली नसावी किंवा ‘अजब है गोवाके लोग’ हे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वाक्य ऐकले नसावे असेच त्यांच्या या अतिआत्मविश्वासावरून वाटते. बाहेरचा तो मग कितीही मोठा नेता असला तरी त्याचा प्रभाव गोमंतकीयावर पडत नसतो हे बऱ्याच उदाहरणावरून सिद्ध झाले आहे.
२००२साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मला माझा श्रीपाद द्या’ अशी आर्त साद घालून भाजपच्या श्रीपाद नाईकांना फोंड्यातून निवडून देण्याचे आवाहन प्रमोद महाजनांसारख्या राष्ट्रीय नेत्याने करूनसुद्धा श्रीपादना धोबीपछाड देऊन लोकांनी कॉंग्रेसचे रवि नाईक यांना विजयी केले होते हे उदाहरणही हीच गोष्ट सिद्ध करते.
याच करता विजय सरदेसाईसारख्या नेत्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे. वास्तविक सरदेसाई यांनी विरोधक एकत्र यावे म्हणून भरपूर खटाटोप केला होता. पण त्यांच्या खटाटोपाला या झेडपी निवडणुकीत तरी यश मिळू शकले नाही. त्याचाच परिणाम या निवडणुकीच्या निकालात दिसून आला.
सर्व विरोधी पक्षांची युती न झाल्यामुळे विरोधकांना कमीत कमी आठ जागा तरी गमवाव्या लागल्या. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र तथा खोर्ली मतदारसंघाचे सिद्धेश यांचेच उदाहरण घ्या. तिथे आम आदमी व कॉंग्रेस एकत्र आले असते तर सिद्धेश म्हणजे भाजप विजयाच्या जवळपाससुद्धा फिरकू शकले नसते.
खरं म्हणजे या अपयशाचाच विरोधकांनी धडा घ्यायला हवा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले म्हणून यश मिळत नसते हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. त्याचप्रमाणे ‘युती झाली’ अस केवळ म्हटले म्हणून ती होत नाही, प्रत्यक्षात वेळेवर होणेही महत्त्वाचे असते यावरही ध्यान द्यायला हवे.
या झेडपी निवडणुकीत अर्ज भरण्याची तारीख येईपर्यंत युतीची बोलणी सुरू होती. त्यामुळे मग युतीचे घटक असलेल्या कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डला प्रचार करायला वेळच मिळाला नाही याचीही नोंद घ्यायला हवी. आणि गोवा फॉरवर्डला एका जागेवरच समाधान मानावे लागले.
भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी आपला लढा आहे हे विरोधकांनी आधी लक्षात घ्यायला हवे. भाजपचे नियोजन हे लक्षणीय असते हेही विसरता कामा नये. म्हणून ‘प्लॅन ए’बरोबरच त्यांचे ‘प्लॅन बी’, ‘सी’, ‘डी’ हेही तयार असतात.
याउलट विरोधक फक्त हवेत तीर मारताना दिसतात. म्हणूनच तर विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांना आताच २०२७मध्ये कॉंग्रेस ३० जागा जिंकणार अशी स्वप्ने पडायला लागली आहेत. पण त्याकरता जे नियोजन हवे ते मात्र करण्याची त्यांची तयारी दिसत नाही. विरोधी पक्षात अजूनही कॉंग्रेस हा सर्वात बलाढ्य पक्ष असला तरी तो पूर्वीचा कॉंग्रेस पक्ष राहिलेला नाही हेही तेवढेच खरे.
त्याकरता त्यांना इतर पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागणार यातही शंका नाही. त्यामुळे दोन पावले मागे जाण्याची कॉंग्रेसने तयारी ठेवायला हवी. आता झेडपीचा निकाल पाहून आप, आरजी यांची डोळ्यावर लावलेली झापडी उतरली असावी असे वाटते.
कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डवर टीकेच्या तोफा डागणारा आरजी दोन जागांच्या पलीकडे जाऊ शकला नाही हेही इथे नमूद करायला हवे. आता त्यांना जर खरीच वस्तुस्थितीची जाण झाली असेल तर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीकरता युतीच्या रिंगणात उतरायलाच हवे.
सर्व विरोधी पक्षांची युती होणे ही जनतेची इच्छा आहे यावरही लक्ष केंद्रित करायला हवे. फक्त स्वतःचा इगो जोपासून कपाळमोक्षाशिवाय काही साध्य होणार नाही याचेही भान ठेवायला हवे आणि याचा ‘ट्रेलर’ झेडपीच्या निवडणुकीत दिसला आहेच.
एखाद्याला योग्य दिशा दाखवता येते, पण त्या दिशेने जायचे की नाही हे ठरविणे हे त्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या पांथस्थाकडे असते. त्याचप्रमाणे जनतेने झेडपी निवडणुकीत मर्यादित यश देऊन विरोधकांना विधानसभा निवडणुकीकरता योग्य दिशा दाखविली आहे. आता त्या दिशेने जायचे की नाही हे ठरविणे विरोधकांचे काम आहे. पण झेडपी निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या वेळी जर काही विरोधी पक्ष दृष्टीक्षेपात नसलेल्या महत्त्वाकांक्षेला गोंजारत बसले, तर मात्र २०२७सालीही या झेडपी निवडणुकीच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल हे निश्चित!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.