

ख्रिसमसच्या काळात गोव्यात येशू जन्माचे देखावे वेगवेगळेकडे केले जातात. गोव्यात त्यांना गोठा म्हणतात. नाताळच्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी युवक एकत्र येऊन सार्वजनिक गोठे तयार करतात. आणि त्यांना राजकारण्यांकडून त्यासाठी ‘स्पॉन्सरशिप’ही मिळते. यावेळी बाणावलीत जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे गोठे करणाऱ्या युवकांना ‘आप’कडून म्हणे २० ते २५ हजार रुपयांपर्यंत ‘स्पॉन्सरशिप’ मिळाली होती. हे पैसे दिल्यावर युवक ‘आप’ला मतदान करतील, अशी अपेक्षा होती, असे म्हणतात. पण प्रत्यक्षात बाणावलीमध्ये आम आदमी पक्षाचा उमेदवार निवडून आलाच नाही. त्यामुळे गोठ्याला दिलेले पैसे पाण्यात गेले, असे म्हटले तर अतिशयाेक्ती ठरेल का? ∙∙∙
गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ निवडणूकीत १६ डिसेंबर रोजी होणार होती, परंतु जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आली... त्यानंतर अनेक घटना घडल्या... विद्यार्थ्यांनी विरोधही केला. परंतु मंगळवारी झालेल्या निवडणुकीत एनएसयूआय आणि गोवा फॉरवर्ड विद्यार्थी संघटनांनी यश मिळवत तब्बल १५ वर्षांनी सत्तापालट घडवून आणला. या विद्यार्थी प्रतिनिधींना ‘एनएसयूआय आणि गोवा फॉरवर्ड’ विरोधात मतदान करण्यासाठी काही भाजप आमदारांनी फोन करून म्हणे सरकारी नोकऱ्यांची ऑफर दिली. अनेक आमिषे दाखवली पंरतु त्या आमदारांचे प्रयत्न फोल ठरल्याने निकाल पालटल्याचे बोलले जात आहे. काहीजण तर चालून आलेली सरकारी नोकरी सोडल्याने त्या विद्यार्थी प्रतिनिधींना वेड्यात काढत आहेत... ∙∙∙
गोवा विद्यापीठात तब्बल पंधरा वर्षांनी एनएसयूआय आणि गोवा फॉरवर्डने मिळून सत्तापालट घडविला. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या पाठीवरून कौतुकाचा हात फिरविण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर चक्क विद्यापीठ आवारात गेले. तसे राजकीय नेते कमीच जातात म्हणा... परंतु यावेळी गेले त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी तेथे संवाद साधला एकंदरीत विद्यार्थ्यांचा उत्साह आणि विजयाचा माहोल पाहून २०२७ च्या विधानसभेची अनेक स्वप्नेही त्यांनी पाहिली आणि विद्यार्थ्यांसमोर ती बोलूनही दाखवली... ∙∙∙
धनुष्यातून सुटलेला बाण, पिस्तुलातून झाडलेली गोळी व मुखातून उच्चारलेला शब्द कधी परत घेता येतो का? जर असे करता आले असते तर कित्येकांचे प्राण वाचले असते, एकमेकांमधील दुरावा नष्ट झाला असता. पण मनोजबाब नेमके हेच कसे विसरले बुवा. निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांना नको ते बोलून गेले. निवडणुकीच्या निकालानंतर व पश्र्चाताप करण्याची पाळी आल्यावर ते आता ठाकरेसाहेबांना जे बोलले त्यासाठी खेद व्यक्त केला आहे, आपण ते शब्द मागे घेतो, असे ते म्हणतात. पण शब्द कधीही मागे घेता येतात का? जे शब्द हृदयाला भिडले ते मागे घेऊन कसे भागेल? आता खेद व्यक्त केल्याने निवडणुकीतील पराभव विजयात रुपांतरित होणार का? काँग्रेसशी जवळीक साधण्याचा तर त्यांचा विचार नाही ना? ∙∙∙
विनोदकुमार शुक्ल काल गेले. ज्ञानपीठकार महान हिंदी कादंबरीकार. ज्या गतीने वेगाने जीवन धावत पळत आहे त्या प्रमाणात आपली साहित्य निर्मिती होत नाही, ही खंत त्यांनी जीवनभर बाळगली. आकाशाला गवसणी घालणारी नवतंत्र सादर करणारी त्यांची कथानके घनगर्भ आहेत. आमच्या लेखकांनी त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप आहे. इच्छा हवी. हिंदी असल्याने त्यांची पांच पुस्तके वाचावी. साहित्याची खोली कशी असते, समजेल. काही लेखक आपली एकूण पांच पुस्तके विविध भाषात अऩुवादित करून सोहळे करून कसली धन्यता मिळवतात, हे कळायला मार्ग नाही. कोण हे विनोदकुमार शुक्ल असे विचारणारेही काही महाभाग आहेत- लेखक, प्राध्यापक वगैरे वगैरे.... ∙∙∙
१६ डिसेंबर रोजी गोवा विद्यापीठ निवडणूक पुढे ढकलण्यात आली, त्यावेळी ‘अभाविप’ संघटनेने विद्यार्थी कल्याण संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. त्यांनी विजयाची सर्व काही तयारी केली होती. आपल्या मतदात्यांना बसमधून आणले होते, परंतु अचानक निवडणूक तारीख रद्द झाल्याने त्याचा लाभ एनएसयूआय-गोवा फॉरवर्ड युतीला झाला आणि अवघ्या सहा मतांच्या गणिताने ‘अभाविप’चा विजयरथ अडला... राजकीय समीकरण बदलायला आणि
घौडदौड रोखायला एखादी घटनाही मारक ठरू शकते याची प्रचिती आज ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांना आली असेल. परंतु आता दत्तराज माशेलकर हा एकमेव ‘अभाविप’चा प्रतिनिधी निवडून आल्याने त्याच्यावर जबाबदारी अधिक आहे. ∙∙∙
बेतकी-खांडोळ्यात प्रचारात आरोप-प्रत्यारोप झाले, मानायपासून गद्दारापर्यंत शब्द वापरले गेले. हे शब्द सुनील जल्मी समर्थकांच्या मनाला लागले. त्यामुळे रणांगणात बरीच रंगत वाढली. आम्ही ‘मानाय, गद्दार नव्हे, तर आम्ही सच्चे मावळे आहोत, तेही प्रत्यक्षात लढणारे, असा नारा देऊन जल्मी समर्थक लढले आणि विजय निश्चित झाला. गावडेसमर्थकांचा समतोल ढळल्यामुळे मावळ्यांनी शांत, संयमासह नेटाने अपक्ष उमेदवाराच्या पारड्यात मतदान केले. अशी ही मावळ्यांची करामत खांडोळा पंचक्रोशीतील बाजारात, बस्थानाकासह मासेमार्केटात चर्चेत होती. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.