
मडगाव: लेखक उदय भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गोव्यात वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इतिहास म्हणत केलेला दावा खोटा असल्याचे मत भेंब्रे यांनी नोंदवले आहे.
यावरुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) रात्री भेंब्रे यांच्या घराबाहेर गर्दी करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावरुन आता उदय भेंब्रे यांच्या समर्थनात साहित्यिक आणि राजकीय नेते मैदानात उतरले आहेत.
अॅड. भेंब्रे यांनी गोव्यात शिवशाही होती, आणि शिवरायांमुळे धर्मांतरणाला चाप बसला या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांचे खंडन करत तो इतिहास खोटा असल्याचे म्हटले होते. यावरुन संतप्त बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री भेंब्रे यांच्या घराबाहेर गर्दी करत निदर्शने केली. बजरंग दलाचे राज्य संयोजक विराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भेंब्रे यांच्या घराबाहेर निदर्शने केली. तसेच, भेंब्रे यांनी माफी मागावी अशी मागणी केली. रात्री उशीरा घडलेल्या प्रकारानंतर राज्यातील साहित्यिक आणि नेत्यांनी भेंब्रे यांची भेट घेत त्यांना समर्थन दिले.
दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, माजी खासदार लुईझिन फालेरो, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, काँग्रेस नेते एल्विस गोम्स, मोहनदास लोलयेकर, संदेश प्रभूदेसाई, दत्ता नाईक यांनी शनिवारी सकाळी उदय भेंब्रे यांच्या बोर्डा येथील घरी भेट घेऊन त्यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले.
"ज्येष्ठ नागरिकाला अशा प्रकारे त्रास देणे चुकीचे आहे. उदय भेंब्रे यांनी मांडलेली मते अभ्यासपूर्वक मांडली आहेत. अशा गोष्टींचा निषेध करायलाच हवा. सरकार कारवाई करत नाही याचा अर्थ त्यांचे देखील याला समर्थन आहे का काय? असा संशय येतो", असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक भाई मावजो म्हणाले.
"छत्रपती शिवाजी महाराजांऐवढेच उदय भेंब्रे देखील आमच्यासाठी वंदनीय आहेत. शिवरायांची स्वराज्याची संकल्पना आणि भेंब्रे गोव्यासाठी जसे झगडले त्यामुळे ते आमच्यासाठी वंदनीय आहेत. एवढेच नव्हे तर शिवरायांमध्ये जेवढे गुण होते त्याचप्रकारचे गुण भेंब्रे यांच्यात दिसतात. समता, सयंम असणारे भेंब्रे जाणते व्यक्ती आहेत. झुंडशाहीचा प्रकार रात्री घडला तो शिवशाहीला शोभणारा नाही", असे संदेश प्रभूदेसाई म्हणाले.
आजी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावू नये, असे म्हणत विचारवंत दत्ता नाईक यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनाचा निषेध केला.
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी देखील या घटनेचा निषेध करताना गोव्याचा उत्तर प्रदेश करु पाहतायेत असा आरोप केला. "छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मांना सोबत घेऊन लढणारे महान योद्धे होते पण, रात्री घडलेला प्रकार निंदनीय आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वप्रथम येऊन भेंब्रे यांना भेटायला हवं. माजी आमदार, लेखक आणि विचारवंत भेंब्रे यांच्यासोबत हा प्रकार घडू शकतो तर उद्या कोणासोबतही अशी घटना घडू शकते", असे सरदेसाई म्हणाले.
तसेच, खासदार विरियातो फर्नांडिस यांनी देखील घडलेल्या प्रकाराचा निषेध करत भेंब्रे यांना समर्थन दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.