
पणजी: 'गोव्यात ४५० वर्षे पोर्तुगिजांचे राज्य नव्हते. केवळ तीनच तालुक्यांवर पोर्तुगिजांची ४५० वर्षे राजवट होती आणि इतर तालुक्यांवर शिवरायांची शिवशाही होती. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच गोव्यातील धर्मांतरणाला चाप बसला', असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिवजंयतीच्या निमित्ताने केले. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलेला हा इतिहास खोटा असून इतिहासाशी हेळसांड केल्याचा आरोप कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांनी आहे.
उदय भेंब्रे यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देणारा एक सविस्तर व्हिडिओ त्यांच्या युट्युब चॅनेलवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून भेंब्रे यांनी मुख्यमंत्री सावंत यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने केलेल्या भाषणात केलेले विविध दावे खोडून काढले आहेत. भेंब्रे यांनी मुख्यमंत्री यांच्या भाषणातील प्रामुख्याने दोन मुद्यांवर सविस्तर भाष्य केले आहे. गोव्यात शिवशाही होती का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील धर्मांतरण खरचं थांबले का? यावर भेंब्रे यांनी इतिहासातील संदर्भ देत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
गोव्यात शिवशाही होती का?
याबाबत बोलताना भेंब्रे यांनी, "गोव्यात १५१० साली पोर्तुगिजांनी सुरुवातीला तिसवाडी तालुका ताब्यात घेतला. त्यानंतर १५३० पर्यंत बार्देश आणि साष्ट (सासष्टी) हे तालुके ताब्यात घेतले. त्यानंतर सुमारे दोनशे वर्षानंतर पोर्तुगिजांनी लढाई करुन १७६३ रोजी फोंडा तालुका जिंकून घेतला. पेडणे, डिचोली आणि सत्तरी हे तालुके सावंतवाडीच्या सावंत भोसले यांच्याकडे होते. दरम्यान, सावंत भोसले आणि कोल्हापूरचा राजा यांच्यात वाद सुरु होता त्यामुळे हे तालुके सावंत भोसले यांनी पोर्तुगिजांकडे सोपवले", असे भेंब्रे यांनी म्हटले आहे.
"तसेच, दक्षिणेतील केपे, काणकोण आणि सांगे तालुके सौंदेकार यांच्याकडे होते. पण सौंदेकार आणि हैदरअली यांच्यात वाद सुरु असल्याने सौंदेकार राजाने हे तालुके तीन तालुके पोर्तुगिजांना संभाळण्यासाठी दिले. अशाप्रकारे हे सहा तालुके १७८१ ते १७८८ या काळात पोर्तुगिजांकडे आले. सहा तालुके पोर्तुगिजांकडे युद्ध न करता आले त्यामुळे त्यांना काबिज केले असे म्हणणे चुकीचे असल्याचे भेंब्रे यांनी म्हटले आहे. १६३० ते १६८० या काळात असलेल्या शिवाजी महाराजांचा या तालुक्यांशी काहीच संबंध नाही. पण, या विचार करण्याचे कष्ट मुख्यमंत्री सावंत यांनी घेतले नाही", असे उदय भेंब्रे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणतात तसे शिवशाही होते असे मानले तरी याची इतिहासात नोंद सापडत नाही. शिवशाहीतील तालुके संभाळण्याची जबाबदारी कोणाकडे होती, याबाबत देखील इतिहासात सबळ पुरावे नाहीत, असे भेंब्रे यांनी स्पष्ट केले. इतिहासात नाहीच ते दाखवण्याचा प्रयत्न का केला जातोय? असा सवाल देखील भेंब्रे यांनी उपस्थित केला.
धर्मांतरण शिवरायांमुळे थांबले नाही!
"गोव्यात धर्मांतरण १५४० रोजी सुरु झाले. ते देखील केवळ तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या तालुक्यांमध्ये सुरु झाले. या तालुक्यांत त्यावेळची लोकसंख्या दीड ते दोन लाखांच्या जवळपास होती. येथे धर्मांतरणासाठी पोर्तुगिजांना चार पिढ्या लागल्या असे समजले तरी शंभर वर्षे होतात. म्हणजेच १६४० रोजी धर्मांतरण थांबले."
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १६३० रोजी झाला, म्हणजे १६४० रोजी शिवरायांचे वय १० वर्ष होते. या वयात असताना शिवरायांनी गोव्यात सुरु असलेले धर्मांतरण कसे रोखले? असा सवाल भेंब्रे यांनी व्हिडिओतून उपस्थित केला आहे. धर्मांतरण शिवाजी महाराजांमुळे थांबले नाही. याची कारणे वेगळी आहेत. चार तालुक्यांत सुरु असलेले धर्मांतरण हळू हळू बंद झाले, असे भेंब्रे यांनी म्हटले आहे. धर्मांतरण रोखण्यासाठी शिवाजी महाराज यांच्याकडे तेवढी शक्ती देखील नव्हती असा दावा देखील भेंब्रे यांनी केला आहे.
येथे पाहा उदय भेंब्रे यांचा पूर्ण व्हिडिओ
पोर्तुगीज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध होते, अशी माहिती भेंब्रे यांनी पांडुरंग पिसुर्लेकर यांच्या पुस्तकांचा संदर्भ देताना दिली आहे. तसेच, नैदल उभारण्यासाठी शिवरायांनी पोर्तुगीजांची मदत घेतल्याचे भेंब्रे यांनी व्हिडिओत म्हटले आहे. भेंब्रे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यावर केलेल्या आक्रमणाचा देखील दाखला देत संत फ्रान्सिस झेवियर गोंयचो सायब कसा झाला हे देखील सांगितले आहे. दरम्यान, भेंब्रे यांनी मुख्यमंत्री सावंत यांचा दावा खोडून काढल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.