Bicholim News: नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ‘गोमंतक पालक परिषद’ या मंचतर्फे राज्यभर व्यापक जागृती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या जागृती अभियानची डिचोलीतून सुरूवात करण्यात येईल. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक तयार करण्याच्या हेतूने डिचोलीत एक कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय गोमंतक पालक परिषदतर्फे घेण्यात आला आहे.
‘मुलं आणि मोबाईल’ या विषयावरील ही कार्यशाळा येथील दीनदयाळ सभागृहात २४ जून रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदचे निमंत्रक तथा शिक्षणतज्ज्ञ प्रा. दिलीप बेतकीकर यांनी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मोबाईलचा विधायक कार्यासाठी वापर आवश्यक असला, तरी आज मोबाईलचा वापर विध्वंसक कार्यासाठी अधिक होत आहे, अशी खंत प्रा. बेतकीकर यांनी व्यक्त करुन त्यातून मुलांना बाहेर काढण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेस शिक्षणतज्ञ आणि निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र गर्दे, प्रा. राजेश कळंगुटकर, भैरव झोरे आणि कालिदास कवळेकर उपस्थित होते.रामचंद्र गर्दे यांनी पालक परिषद स्थापन करण्यामागील हेतू सांगून, सद्य:स्थितीत पालकांची भूमिका याविषयी विवेचन केले. प्रा. राजेश कळंगुटकर यांनीही आपले विचार मांडले.
पालकांची भूमिका असेल महत्त्वपूर्ण
प्रत्येक शाळेत पालक-शिक्षक संघ कार्यरत असले, तरी शाळांमध्ये पालकांची भूमिका मर्यादित असते. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाचे यश किंवा सफलता पूर्णपणे पालकांवर अवलंबून असणार आहे. त्यासाठी पालकांना मार्गदर्शन आणि त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.
गोमंतक पालक परिषद त्यासाठी पुढाकार घेणार असून सामाजिक, सांस्कृतिक क्लब, पंचायत, नगरपालिका आदी संस्थांचे सहकार्यही घेण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाबाबत पालकांना आकलन व्हावे, त्यासाठी भविष्यात प्रत्येक शाळांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संक्षिप्त माहितीचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे, असे प्रा. दिलीप बेतकीकर यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पालकांना जागृत आणि मार्गदर्शन करण्याकरिता ‘गोमंतक पालक परिषद’ हा मंच स्थापन करण्यात आला आहे. या चळवळीच्या माध्यमातून पालकांना संघटित करुन त्यांच्या कर्तव्याबाबत वेळोवेळी जागृती करण्यात येईल.
- प्रा. दिलीप बेतकीकर, शिक्षणतज्ज्ञ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.