Bicholim News : डिचोलीतील ‘आमठाणे’ धरणातील जलसाठा घटला असला, तरी साळ बंधाऱ्यातील पाणी या धरणात सोडून धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यात येत आहे. गेल्या मे महिन्याच्या तुलनेत धरणातील पाण्याच्या पातळीत जवळपास एक मीटरने घट झाली आहे. सध्या धरणातील जलसाठ्याची पातळी 45.7 मीटर इतकी आहे. गेल्या मे महिन्यात धरणातील पाण्याची पातळी 46.5 मीटर एवढी होती.
गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून हवामानात बदल होताना उष्णतेने कहर केला असला, तरी धरणातील जलसाठ्यात मोठी घट झालेली नाही. गेल्यावर्षी चांगला मोसमी पाऊस पडल्यानंतर आमठाणे धरणातील जलसाठ्याची पातळी समाधानकारक होती. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे धरण दोन वेळा तुडुंब भरले होते. दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात धरणातील जलसाठ्यात घट होऊन सभोवतालचे पात्र कोरडे पडत असते.
मेणकुरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र 582 हेक्टर मीटर एवढे आहे. तर पाण्याची पातळी 50 मीटर एवढी आहे. या धरणातील जलसाठ्याची सध्याची पातळी 45.7 मीटर एवढी आहे, अशी माहिती मिळाली आहे. या धरणातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते.
धरणातील जलसाठ्यात घट होऊ लागली, की जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी साळ येथील शापोरा नदीवरील बंधाऱ्यातील पाणी मोठ्या जलवाहिनीद्वारे या धरणात सोडण्यात येते. मोसमी पाऊस सुरू होईपर्यंत धरणातील जलसाठ्यावर मोठासा परिणाम होणार नाही, असा जलस्रोत खात्याचा दावा आहे.
साळ बंधाऱ्यातील पाण्याचा पुरवठा करून आमठाणे धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यात येत आहे. 15 जुलैपर्यंत पुरेल इतका जलसाठा राज्यात उपलब्ध आहे, असा दावा जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केला आहे. त्यामुळे पाऊस लांबला, तरी पाण्यासाठी मारामारी होणार नाही. डिचोली तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा आणि पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या देखभालीचे काम करण्यात आले आहे.
- डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.