
Viral Post On Goa Taxis: पर्यटकांसाठी प्रसिद्ध असून देखील 'पर्यटकांच्या आवडत्या गोव्यात उबर का नाही?' असा प्रश्न कायम असतो आणि याची अनेकवेळा,अनेकांकडून वेगवेगळी करणं दिली जातात. पण IIM चा माजी विद्यार्थी आणि ॲमेझॉन फॅशनचे जाहिरात प्रमुख, उद्योजक आनंद अहुजा यांनी गोव्यातील ओला - उबर कॅबसेवा का नाही? याचं गणित मांडले आहे.
अहुजा यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात सध्या सुमारे २४,००० टॅक्सी चालक आहेत. यापैकी बहुतेक त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य आहेत, ज्यात सरासरी ४ इतर सदस्य असतात. याचा अर्थ, सुमारे १ लाख लोक थेट या स्थानिक टॅक्सी व्यवसायावर अवलंबून आहेत.
पण, हे चालक केवळ टॅक्सी चालवत नाहीत. ते पर्यटकांना हॉटेल्स, क्रूझ, दुकाने आणि हॉटेल्सचे (शॅक्स) कमिशन एजंट म्हणूनही काम करतात. त्यांची कमाई संपूर्ण स्थानिक पर्यटन साखळीशी जोडलेली आहे. त्यामुळे, अप्रत्यक्षपणे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या सुमारे २ लाखांपर्यंत पोहोचते, म्हणजेच, सुमारे २ लाख लोकांची उपजीविका या व्यवस्थेशी जोडलेली आहे.
अहुजा यांच्या मते, या २ लाख लोकांपैकी सुमारे ७५ टक्के लोकं मतदान करण्यास पात्र आहेत. गोव्यातील एकूण १२ लाख मतदारांमध्ये हे सुमारे १.५ लाख लोकं मत देतात.
याचा अर्थ, राज्यातील प्रत्येक दहापैकी एक मत या अनौपचारिक टॅक्सी नेटवर्कशी संबंधित आहे. कोणतेही राजकीय पक्ष इतक्या मोठ्या मतदारांना दुखावण्याचा धोका पत्करणार नाहीत.
गोव्यातील वाहन मालकीचा दर खूप जास्त आहे. प्रति १००० लोकांमागे ८८२ वाहनं आहेत, जी भारताच्या राष्ट्रीय सरासरीच्या चौपट आहे. याचा अर्थ, गोव्यातील बहुतेक लोक स्वतःची वाहनं चालवतात आणि त्यांना टॅक्सीची फारशी गरज भासत नाही. त्यामुळे, ते 'उबर'सारख्या सेवांची मागणी करत नाहीत.
केवळ पर्यटक! पण पर्यटक मतदान करत नाहीत. त्यामुळे, राजकीय दृष्टीने, १.५ लाख मतं गमावून काहीही फायदा न मिळवण्याचा धोका कोणताही राजकारणी पत्करणार नाही, असे अहुजा यांनी स्पष्ट केलं.
अहुजा यांच्या मते, जोपर्यंत स्थानिक लोकांना पुन्हा टॅक्सीची गरज भासू लागत नाही (उदा. वाढती वृद्धांची संख्या, विभक्त कुटुंब पद्धती) तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही आणि तोपर्यंत, गोव्यात 'उबर'ला प्रवेश मिळणार नाही. गोव्याची 'कॅब वॉर' तसंच राहील असं आनंद अहुजा यांनी नमूद केलंय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.