HC on Goa Mine Auction: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने खाणीबाहेरील डंप खनिजाचा ई-लिलाव सुरू केला आहे. मात्र, न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदा खनिज मालाची विक्री केली असून सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे गुंतले असल्याचा आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे नेते मनोज परब यांनी आज केला. मात्र, पाटकर यांनी या आरोपांना कडाडून विरोध केला.
परब हे गोवेकरांची दिशाभूल करत असून मी कायदेशीरपणे व्यवसाय करत आहे. नाहक बदनामी केल्याबद्दल परब यांच्याविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती पाटकर यांनी दिली.
खनिज व्यवसायातील अनियमिततेवरून सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व लिजेस रद्द करत यापुढे सर्व खनिज मालाचा ई-लिलाव करा, असे निर्देश सरकारला दिले होते.
त्यानुसार खाणीबाहेर असलेले डंप सरकारने ताब्यात घेऊन त्याचा ई-लिलाव करण्यास सांगितले होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 29 ई-लिलाव झाले आहेत.
22 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या 22 व्या लिलावात ‘डीएमजीटीआरओ-95’ बोली जयभावा आलुरी कंपनीला मिळाली होती.
पिसुर्ले खाणीशेजारील 38 हजार मेट्रिक टन खनिजाचा हा लिलाव होता. 2019 साली ही प्रक्रिया झाल्यानंतर 2021 साली संबंधित कंपनीला विक्री परवाना मिळाला. 2023 मध्ये हा खनिज माल अमित पाटकर यांच्या अमित अर्थमूव्हर्स कंपनीकडून विकला गेला.
मग हा माल पिसुर्ले खाणीशेजारून अल्कॉन जेटीवर कसा आला? या खनिजाची वाहतूक कशा केली? माल उच्च दर्जाचा कसा बनला, असे प्रश्न निर्माण होत असून यात करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे.
यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अमित पाटकर यांचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे काँग्रेसच विद्यमान भाजपला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असल्याचा आरोप परब यांनी केला. यासाठी सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करून संपूर्ण प्रकाराची माहिती द्यावी.
न्यायालयाने ''स्युमोटो'' याचिका दाखल करून घेऊन या प्रकरणाची खरी माहिती लोकांपुढे मांडावी, अशी मागणी परब यांनी केली.
परब यांनी लोकांना खोटी माहिती देत माझ्यावर नाहक आरोप केले आहेत. खनिज व्यवसायातील आमची तिसरी पिढी असून पोर्तुगीज काळापासून कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करतो. मात्र, सरकारच तो करू देत नाही.
त्यामुळे न्यायालयाकडून मदत घेऊन आम्ही हा व्यवसाय करत आहोत. मनोज परब यांनी माझी बदनामी केल्याने पोलिसांत तक्रार देऊन न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती अमित पाटकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.