हिमालयही असुरक्षित

हिमालयासारखी दुर्गम ठिकाणेही जगाच्या सर्व प्रकारच्या थेरांना बळी पडली आहेत. गोव्याचेही तेच झाले आहे.
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

हिमालयासारखी दुर्गम ठिकाणेही जगाच्या सर्व प्रकारच्या थेरांना बळी पडली आहेत. गोव्याचेही तेच झाले आहे. सर्व विलासी धनिकांसाठी गोवा विकायला काढला आहे. हल्ली गाजत असलेली भू-माफियांची अवैध विक्री प्रकरणे, हे या भूमीवरील थेट आक्रमण आहे, हे होणारच होते.

Goa
Goa Politics: नाकर्तेपणाचा कळस!

‘मानवाचे सृष्टीवरील आक्रमण थोपवायलाच हवे’ हा माझा गेल्या बुधवारचा लेख. हे आक्रमण पृथ्वीच्या आरोग्यावर, म्हणजे सृष्टीच्या धारणशक्तीवर होत आहे. ही शक्ती रोडावत चालली आहे. एकेक जीव समूळ नष्ट होत चालला आहे. त्या यादीत माणसाचे नाव वरच्या भागातच आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जे जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक होते, त्यांनी म्हटले आहे की, ‘‘या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी असलेली आजची पिढी ही शेवटची आहे.’’ जेथून मागे वळता येणार नाही (पॉईंट ऑफ नो रिटर्न) हा टप्पा नजीक येऊन ठेपला आहे. तो टप्पा ओलांडल्यानंतर काहीही करता येणार नाही.

‘हत्ती-घोडे माल-खजिना, कोणाची मंझिल-माडी

शेवटी जाईल, काय न राहील, काय धरोनी याची गोडी

समय कठीण जेव्हा काळ येऊनी रगडी’

या दशकभरात सृष्टी विनाशवाऱ्याचे काही नमुने पेश केले आहेत. सृष्टीचे हे आगाऊ इशारे आहेत. कोविड-१९ हा जीव नव्हे-निर्जीव नव्हे, असा विषाणू (व्हायरस). त्याने जगभर थैमान घातले. बहुरूप्याप्रमाणे मधूनमधून रूप बदलत वैज्ञानिकांना चकवित राहिला. गेल्या उन्हाळ्याच्या लाटेने समशीतोष्ण कटिबंधातील युरोपमधील राष्ट्रांना येथील विदर्भीय उन्हाळ्याचा ४० अंश तापमानाचा झटका दिला. ढगफुटीचे, महापुराचे तडाखे राजस्‍थानलाही जाणवले. हिमालयातील रूद्रतांडवाच्या व्हिडिओत तर काही मिनिटांतच गावेच्या गावे, चार-पाच मजली कॉंक्रिटच्या इमारती, डोंगरकडे, रस्ते-पूल कोसळून गाड्या, बसेस यांसह अनेक वाहने वाहून जाताना पाहावी लागली.

‘बोल हिमालय क्या देखा?

यमुना का तांडवप्रलय देखा!

थरथरती भू देखी!

देवभूमी का रौद्ररूप देखा!

मृत्यू देखा, यमदूत देखा!’

दशकापूर्वी केदारनाथाने हिमालयाच्या भूमीवरील मानवी आक्रमणाविरुद्ध इशारा दिला होता. त्यांची लोकांनी, सरकारने दखल घेतली नाही. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिमला, कुल्लू शहर, सिक्कीममधील १२ हजार कोटींचे तिस्ता धरण, ज्याच्याविषयी भारतीय विज्ञान संस्थेने आगाऊ इशारा दिला होता, ते नेस्तनाबूत झाले. जोशीमठ येथेही आज खचलेल्या इमारती खाली कराव्या लागल्या आहेत. तेथील वस्ती उभी राहात असतानाच काहींनी इशारे दिले होते. त्याकडे लक्ष न दिल्याचा हा परिणाम आहे. सृष्टीचे क्रूद्ध उद्‍गार त्याच कवीच्या शब्दांत -

‘जो सीना चीरके मिलता है

वह टुरिझम नही चाहिये पहाडोंको’

पर्वतांच्या उरावर शस्त्राघात करून मनुष्यरंजनासाठी खुपसलेल्या टुरिझमच्या सोई क्रूद्ध सृष्टीने उचकटून फेकून दिल्या आहेत. पूर्वीही हिमालयात तीर्थाटन व्हायचे. मोजकेच यात्री श्रद्धेने त्या ठिकाणी डोंगर-दऱ्यांतून प्रतिकूल हवामानातही विविध प्रकारचे धोके पत्करून, शारीरिक कष्ट सोसत यात्रा करायचे. आज तेथे ठायी ठायी विखुरलेला कचरा वेचला तर आजच्या या पर्यटकांच्या छंदीफंदीपणाची प्रचीती येते. त्यांच्या सोयीसाठी तेथील नाजूक सृष्टिरचनेचा बळी दिला जात आहे.

गोव्यात काही ठिकाणी पावसाळ्यात कोसळणारे सुंदर, छोटे धबधबे आहेत. काही गावांतील लोकांनी त्यांच्याकडे जाणाऱ्या वाटा आता बंद केल्या आहेत; कारण दुसऱ्या गावातील असेच छंदीफंदी तरुणांचे गट येतात, बिअर-दारूच्या बाटल्या, काचा, कचरा टाकून निघून जातात. सौंदर्यवतीचे सौंदर्य लांबूनच सात्त्विकपणे न्‍याहाळावे. आज बलात्कारी वासनेने ही दृष्टी प्रदूषित झाली आहे. गोव्याचे सृष्टिसौंदर्य अशाच वासनेचे बळी ठरले आहे. पर्यटनाचा विकास म्हणजे बाई-बाटली-जुगार यांच्या दलालांचा सुळसुळाट, त्याबरोबर आलेली हिंसा-बलात्कार! ज्यांनी या दुराचारांपासून या सुंदर देवभूमीचे रक्षण करायचे, तेच कसायांचे जणू भागीदार बनल्यासारखे वागत आहेत, ज्याला त्यांनी ‘विकास’ हे गोंडस नाव दिले आहे, तो परिणामतः विनाश आहे. अतिजलद व अतिप्रमाण (Too Fast and too much) हा विकासाचा आजचा महामंत्र. त्यातून जीवघेण्या स्पर्धेचा चढता कैफ.

गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक व सामाजिक आयोगाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षात भारतातील रस्त्यांवरील अपघातांत १ लाख ६८ हजार लोक मृत्युमुखी पडले. त्यातील ७१ टक्के मृत्यू वाहनांच्या अतिवेगामुळे, त्याच्या निम्मे वाहन चालू असताना मोबाईल वापरल्याने, दारू पिऊन किंवा सिग्नल न पाळल्याने! मोबाईलवर रिंग आल्यावर गाडी थांबवून फोन घेण्यास उसंत नाही. सिग्नलने वाट देईपर्यंत थांबण्याची सोशिकता नाही. यातून स्पष्ट दिसते की, किमान सव्वालाख मृत्यू हे ‘गती’च्या

Goa
54th IFFI: ‘नवा रंग नवा साज’

बलिवेदीवर गेलेले बळी! तेही फक्त वाहन या विषयात. गतिमान जीवनातील लक्ष्ये न गाठता आल्याने येणारा तणाव, अस्वस्थता, उच्च रक्तदाब, त्यातून आलेली मानसिक व शारीरिक आजारांची मालिका, असहिष्णूता, त्यातून दुरावलेले मानवी संबंध अशी दीर्घ अनिष्ट परंपरा आहेच. जीवनव्यवस्थेचा ढाचाच सदोष बनल्यामुळे या सर्व प्रकारच्या अनर्थ परंपरा त्यातून उगम पावतात. निसर्गाने ठरवून दिलेल्या ढाच्याप्रमाणे इतर प्राणी आपला जीवनक्रम चालवितात. त्यांना लक्षावधी वर्षांत काहीच दोष आढळला नाही. आता माणसाने बिघाड केल्यामुळे पडला तेवढाच. हा सृष्टिनिर्मित ढाचाच सुस्थिर आहे. मानवनिर्मित ढाचा हा अस्थिर व डुगडुगणारा असल्याचे सोबतच्या ग्राफिक चित्रातून जाणवते.

जीवसृष्टीची रचना रुंद बैठकीची पिरॅमिडच्या आकाराची, त्यामुळे ती सुस्थिर आहे. ती सर्वसाधारण धक्के सहज पचवू शकते. मानवनिर्मित ढाचा जराशा धक्क्याने कोलमडणारा आहे. जगात कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की, इथला शेअर बाजार कोसळतो, महागाई वाढते. ॲमेझॉनच्या जंगलाला प्रचंड मोठी आग लागली किंवा लावली गेली, म्हणून इथल्या वनक्षेत्रातील प्राणीमात्रांना काहीच फरक पडत नाही. जागतिकीकरणाने बांधिव, विकेंद्रित मानवगटांचे खासगीपणाचे कवच (प्रायव्हसी) आणि सुरक्षितपणा दोन्ही लयाला गेली आहेत. हिमालयासारखी दुर्गम ठिकाणेही जगाच्या सर्व प्रकारच्या थेरांना बळी पडली आहेत.

गोव्याचेही तेच झाले आहे. सर्व विलासी धनिकांसाठी गोवा विकायला काढला आहे. हल्ली गाजत असलेली भू-माफियांची अवैध विक्री, हे या भूमीवरील थेट आक्रमण आहे, हे होणारच होते. वर्षांपूर्वी मी एका विचारवंताचे वाक्य उद्‍धृत केले होते- ‘जे आपल्या भूमीवरील अन्न खात नाहीत, त्यांच्याकडे ती भूमी राहात नाही? आम्ही आमच्या जमिनी ओस पडू दिल्या. दुसऱ्यांना बळकवायला संधी मिळाली. आता कहर झाला, तेव्हा कुठे आपण जागे होत आहोत. निम्मा गोवा आधीच गिळला आहे. प्राणीसुद्धा आपल्या अधिवासाचे रक्षण करतात.

वाघ आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघाला येऊ देत नाही. कुत्रीसुद्धा आपल्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीतील कुत्र्याला हाकलून लावतात. आपल्याला परिसरातील साधनसामग्रीतून आपले जीवनाधार सुदृढ करणे व त्या शाश्‍वत आणि सुदृढ जीवनपध्दती अधिष्ठीत करणे हेच हितकारी असते, हे एक सर्वकालीन सत्य आहे. निसर्गाने डिझाईन केलेला जीवधारणेचा स्थिर, सुदृढ पिरॅमिड कसा असतो, हे वर पाहिले आहे. त्याचबरोबर आजच्या जीवनशैलीतून घडलेला डुगडुगता पिरॅमिडही सोबत दाखविलेला आहे. आपल्याला सृष्टीला घट्ट पकडून राहिलेला स्थिर, शाश्‍वत जीवनपद्धतीचा पिरॅमिड बांधायचा आहे, याची मांडणी पुढील लेखात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com