Goa Assembly Session 2026: विजयचा चिमटा; सभापतींचा पारा

Vijay Sardesai Goa Assembly Remark: विधानसभा अधिवेशनात सोमवारच्‍या पहिल्‍या दिवसाचे पहिले सत्र विरोधी आमदारांनी गदारोळ माजवून संपवले होते.
Vijay Sardesai Goa Assembly Remark
Goa Assembly Session 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

विधानसभा अधिवेशनात सोमवारच्‍या पहिल्‍या दिवसाचे पहिले सत्र विरोधी आमदारांनी गदारोळ माजवून संपवले होते. त्‍यानंतरचे कामकाज सुरळीतपणे पार पडले होते. अधिवेशनाचे केवळ दोन दिवस शिल्लक असताना दुसऱ्या दिवशी अधिकाधिक प्रश्‍‍नांवर शांतपणे चर्चा करून आमदार आपापले मतदारसंघ आणि राज्‍यातील जनतेच्‍या प्रश्‍‍नांवर मंत्र्यांकडून तोडगा काढून घेतील, अशी अपेक्षा सभापती गणेश गावकर यांची होती. पण, घडले भलतेच.

सोमवारप्रमाणेच आज मंगळवारीही पहिल्‍या सत्राच्‍यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वीरेश बोरकर आणि व्‍हेंझी व्‍हिएगस यांनी कायदा-सुव्‍यवस्‍थेच्‍या प्रश्‍‍नावरून गोंधळ माजवण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला. त्‍यामुळे सभापती त्‍यांच्‍यावर ज्‍या पद्धतीने भडकले, ते पाहून इतर विरोधी आमदारांनी गप्‍प बसणेच पसंत केले.

Vijay Sardesai Goa Assembly Remark
Goa Cyber Crime: गोव्यात गुन्हेगारी वाढली, पोलिस करतात काय? विरोधकांचा खडा सवाल, सायबर गुन्ह्यांत 272 टक्के वाढीचा दावा

प्रश्‍‍नोत्तराच्‍या तासाला आमदार वीरेश बोरकर यांनी राज्‍यातील कायदा-सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍‍न उपस्‍थित करत, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यावर प्रश्‍‍नांचा भडिमार सुरू केला. राज्‍यातील गुन्‍हेगारीत कशा पद्धतीने वाढ झालेली आहे, आरोपींना पकडण्‍यात पोलिस कसे अपयशी ठरत आहेत, याचा पाढाच त्‍यांनी वाचला. त्‍यांनी जे प्रश्‍‍न विचारले होते, त्‍यास गृहमंत्री या नात्‍याने मुख्‍यमंत्री सावंत शांतपणे उत्तरे देत त्‍यांचे समाधान करण्‍याचा प्रयत्‍न करत होते.

त्‍यातच युरींनी मध्‍ये तोंड घातले आणि मुख्‍यमंत्र्यांना घेरण्‍याचा प्रयत्‍न केला. मुख्‍यमंत्र्यांचे ऐकून न घेताच युरी चढ्या आवाजात बोलत राहिल्‍याने शेवटी सभापती गावकर यांनी हस्‍तक्षेप केला. आपल्‍या आसनावर उभे राहून त्‍यांनी युरींना खाली बसण्‍याच्‍या सूचना केली. शिवाय मुख्‍यमंत्र्यांचे उत्तर संपल्‍यानंतरच दुसरा प्रश्‍‍न विचारण्‍याचा सल्ला शांतपणे दिला. तरीही युरी ऐकण्‍यास तयार न झाल्‍याने सभापतींचा पारा चढला. ‘‘यापुढे एकटा बोलत असताना, दुसरा उभा राहिल्‍यास आपण पहिल्‍याला अजिबात बोलू देणार नाही.

Vijay Sardesai Goa Assembly Remark
Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

सभापती आपल्‍या आसनावर उभे राहतात, त्‍यावेळी आमदारांनी आपापल्‍या आसनावर बसावे. आमदारांनी सभागृहात भाषण न करता केवळ प्रश्‍‍न विचारून मंत्र्यांकडून उत्तरे मिळवावीत’’, अशा कडक शब्‍दांत त्‍यांनी युरींना सुनावले. त्‍यानंतर शून्‍य प्रहरास सुरुवात होण्‍याआधीही, शून्‍य प्रहर हा केवळ विषय मांडण्‍यासाठी असतो. त्‍यामुळे आमदारांनी केवळ तेवढेच करावे, असे निवेदनही सभापतींनी आक्रमक होतच केले. एकंदरीत सभापतींचे मंगळवारचे रुप पाहता बुधवारीही ते विरोधी आमदारांना ‘सैल’ सोडणार नाहीत, यावर शिक्‍कामोर्तब झाले.

सभागृहात बोलत असताना आमदार विजय सरदेसाईंचा हजरजबाबीपणा कधी जागा होईल, हे सांगता येत नाही. त्‍याचा प्रत्‍यय शून्‍य प्रहारावेळी आला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्‍याबाबतचा प्रश्‍‍न त्‍यांनी मांडला होता. पण, प्रश्‍‍नाला हात घालताना, केंद्र सरकारने एसटी समाजाला आरक्षण देण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्‍ये उडी मारलेल्‍या एकाचे अवघड होऊन बसले आहे. हे लक्षात घेऊन एका पक्षाच्‍या उमेदवारीवर निवडून आलेल्‍या आमदारांनी दुसऱ्या पक्षात जाऊ नये, असा सल्ला द्यायला ते विसरले नाहीत. यावेळी विजयनी कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु, हा ‘चिमटा’ त्‍यांनी बाबू कवळेकर यांना काढल्‍याचे लक्षात येताच सभागृहात हास्‍याचे फवारे उडाले.

प्रत्‍येक अधिवेशनात युरी आलेमाव आणि आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस यांची, ‘‘सभापती सत्ताधाऱ्यांना बोलू देतात, पण आम्‍हांला नाहीत’’ अशी तक्रार असते. मंगळवारी शून्‍य प्रहराला भाजप आमदार उल्‍हास तुयेकर बोलत असताना व्‍हेंझी आणि युरींनी हीच तक्रार पुढे रेटण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, सभापतींनी त्‍यांना आपल्‍या ‘स्‍टाईल’ने गप्‍प बसवले.

Vijay Sardesai Goa Assembly Remark
Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

बुधवारी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्‍यामुळे विरोधी आमदार राज्‍यातील अधिकाधिक प्रलंबित विषय चर्चेला आणण्‍याचा प्रयत्‍न करतील. त्‍यावरून सरकारला घेरून जनतेच्‍या मनात स्‍थान निर्माण करणे आणि येत्‍या विधानसभा निवडणुकीत पुन्‍हा निवडून येणे हेच त्‍यांचे स्‍वप्‍न आहे. परंतु, सभापतींची भूमिका पाहता त्‍यात ते कितपत यशस्‍वी ठरतील, हे बुधवारीच दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com