
कुडचडे-काकोड्याचा रस्ता सध्या चक्क म्हशींच्या मालकीचा झाला आहे. दिवस मावळला की या रस्त्यावर गाड्यांचे नव्हे तर गुरांचे राज्य असतं. रात्रीचे आठ वाजले की म्हशींची मिरवणूक सुरू होते – एखाद्या विजयी उमेदवाराच्या रोड शोला लाजवेल अशी गर्दी! चालकांची अवस्था पाहिली, तर एखाद्या अंधारातल्या जुगाराच्या खेळासारखी – समोर मोकाट म्हैस कधी उभी ठाकेल याचा नेम नाही. हेडलाईट्स लावले तरी ‘ब्लॅक अँड व्हाईट’ मध्ये फक्त ‘ब्लॅक’च दिसतो. काहींना वाटतं की हे अपघात नव्हे तर ‘भटकंती जनावरांसोबत’ अनुभवलेली साहसी यात्रा असावी! स्थानिक नागरिक मात्र संतप्त आहेत. “नगरपालिकेचे लक्ष आहे कुठे?” असा प्रश्न ते विचारतात, पण पालिकेच्या उत्तरात केवळ ‘हम्म...’ इतकंच येतं. गायींना गोशाळा असते, पण म्हशींसाठी ‘रस्ता-शाळा’ का? काही जण म्हणतात,‘पालिकेने रस्त्यावर गायींचा देखील कायदा आणावा – हेल्मेट नसलेली म्हैस पकडली, तर दंड!’ तर काहींनी सुचवलं, ‘रात्रीच्या वेळी म्हशींना फ्लोरेसंट जाकीट घालावं, निदान दिसतील तरी!’ सारांश असा की, कुडचडे काकोड्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न ‘हलवायाच्या घरातच काळंबेरं’ झालाय. नगरपालिकेने जर लक्ष दिलं नाही, तर पुढच्या निवडणुकीत जनतेपेक्षा म्हशींचाच मतदानावर प्रभाव राहील, आणि तेव्हाच म्हणतील – ‘हे आमच्या गोरक्षण धोरणाचे यश आहे!’ ∙∙∙
ज्यावेळी विजय सरदेसाई हे काँग्रेस पक्षात होते त्यावेळी काँग्रेस पक्षातील त्यांचे सर्वांत मोठे विरोधक कोण असतील तर ते होते गिरीश चोडणकर हे. असे म्हणतात, २०१२ च्या निवडणुकीत विजयला फातोर्डातील काँग्रेस उमेदवारी मिळू नये यासाठी दिल्लीत फिल्डींग लावणाऱ्यांमध्ये गिरीश चोडणकर यांचाही समावेश होता. मात्र आता साळ नदीतून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. बदलत्या राजकीय प्रवाहात गिरीश आणि विजयने एकमेकांशी जुळवून घेतले असावे, असे वाटते. कारण, विजय यांच्या वाढदिनी गिरीश चोडणकर यांनी घातलेली पोस्ट. गिरीशने विजयला शुभेच्छा देताना, या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आपल्यालाही सहभागी होण्याची मनातून इच्छा होती. पण दुसऱ्या एका कामात व्यग्र असल्यामुळे आपण तिथे पोचलो नाही, असे म्हटले आहे. यातील महत्वाची गाेष्ट म्हणजे, गिरीशच्या फेसबुकवरील पोस्टवर राजकीय विश्लेषक असलेले राधाराव ग्रासियस यांनी कमेन्ट करताना, विजय आणि गिरीश एकत्र येणे ही चांगलीच गोष्ट, असे म्हटले आहे. ∙∙∙
‘पाण्याचा प्रवाह रोखू नका, नाहीतर आम्ही तुमचा प्रवाह रोखू!’ — असं ठणकावत अासगावचे स्थानिक लोक साकवाचे काम थेट बंद करण्याची मागणी करत आहेत. पावसाळ्यात उगाचच नवा पूल बांधून गावाला जलप्रलयात ढकलायचे सरकारचे हे ''नियोजन'' फारच दूरदृष्टीचे आहे असे गावकऱ्यांना आता समजले आहे. तिथे पूर येतो, दलदल होते, हे सगळं माहिती असूनही ‘काम चालूच राहील’ या सरकारी हट्टाला गावकऱ्यांनी ‘ना’ म्हणत खो घातला आहे. आता हे अधिकारी आणि कंत्राटदार स्वतः त्या स्लॅबवर बसून पाणी अडवणार की गावकऱ्यांचा रोष, हे पाहावे लागेल. "पूर येणार नाही, तुमचे काही बिघडणार नाही," असे सांगणारे अधिकारी आता काय करतील. गावकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे – ''स्लॅब'' नको, पाणी वाहू द्या आणि आम्हालाही जगू द्या! ∙∙∙
मडगाव-पणजी कुठ्ठाळीमार्गे रस्त्याचे तर सहापदरीकरण झाले. पण त्यावरही स्थानिक विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे ते पाहता या रुंदीकरणाचा उपयोग तो काय असा सवाल केला जाऊ लागलाय. वेर्णा येथे अशा विक्रेत्यांना खास जागा सरकारने उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे वाहन बाजूला घेऊन खरेदी करता येते. पण या विक्रेत्यांनी तेथे मार्केटांतील पध्दत सुरू करून मागे जागा सोडून पुढे येऊन माल विकण्याचे सत्र आरंभलेय. त्यामुळे या जागेचा मूळ हेतू बाजूला पडत आहे. पुढे शिरदोणच्या पठारावर तर विक्रेते चक्क रस्त्याच्या कठड्यावर माल विकत असून दुर्घटनेची भीती आहे. ∙∙∙
आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनी पुन्हा एकदा जनतेच्या मनातले बोल मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले आहेत. टॅक्सीच्या प्रश्नावरून त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि ‘ट्रान्सपोर्ट अॅग्रीगेटर गाईडलाईन्स २०२५’ या नव्या प्रस्तावाला सरळ सरळ ‘ना बाबा ना!’ अशी ठाम भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, ‘गोव्याचे पर्यटन हे आमचं जीवन आणि आमचा अभिमान आहे, पण त्यात गोंधळाचा अॅग्रीगेटर नको. त्याऐवजी त्यांनी एक साधा, सरळ आणि सगळ्यांच्या हिताचा पर्याय सुचवला, किनारी पट्ट्यातील आमदारांनी आणि स्थानिक हितधारकांनी मिळून गॅझेटेड टॅक्सी दर डिजिटल पद्धतीने उपलब्ध करावेत. एकाच दर प्रणालीने पारदर्शकता वाढेल, पर्यटक सुखी – स्थानिक समाधानी, आणि सगळ्यांचे हित जपले जाईल, हे त्यांचे म्हणणे. वरून दिसतेय, की ‘एक राज्य, एक टॅक्सी दर’ हीच त्यांची भूमिका! व्हिएगश यांच्या या ‘डिजिटल पण स्थानिक’ योजनेने मुख्यमंत्रीही कदाचित विचारात पडले असतील, कारण एकीकडे डिजिटल गोवा, आणि दुसरीकडे स्थानिकांचा विसर… हे समीकरण फार काळ तग धरू शकत नाही! आता पाहायचं, वेन्झींच्या ‘गाडी’ला सरकारकडून हिरवा कंदील मिळतो का? ∙∙∙
खेळ आणि राजकारण वेगळे असू शकते का? तसे पाहिले तर खेळात राजकारण असते आणि राजकारण हा खरे म्हणजे खेळच! नाही का?सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळ देसाई यांच्या अर्धांगिनी अलका देसाई सांगे तालुका चेस ( बुद्धिबळ) संघटनेच्या प्रमुख बनल्या आहेत. सांगेतील दुर्गम भागात बुद्धिबळाचा खेळ पोहचवण्याचा चंग मॅडम अलका यांनी बांधला आहे. एवढेच नव्हे सांगे तालुक्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा मॅडमनी केली आहे. आता पाहूया प्यादे कसे हलतात व कोण कोणाला चेकमेट देतो. ∙∙∙
विजय सरदेसाई यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आपण मडगावातही घुसणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे दिगंबर कामत समर्थकांची यावर काय प्रतिक्रिया असेल असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र दिगंबर कामत यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यानंतर मडगाव मतदारसंघातील त्यांचा संचार मात्र वाढला. भाजपची सध्या ‘विकसित संकल्प पत्र’ मोहीम चालू असून मागच्या ११ वर्षात भाजपने कशी कामगिरी केली याची माहिती आमदारांमार्फत लोकांपर्यंत पोचवली जाते. सध्या दिगंबर कामत या मोहिमेत व्यग्र असून त्यांच्यासह त्यांचे सुपुत्र योगिराज कामत हेही फिरत असतात. कोणीही कसलीही घोषणा करो, जोपर्यंत माझे मतदार माझ्याबरोबर आहेत, ताेपर्यंत कोणीही माझे वाकडे करू शकत नाही. हेच जणू कामत यांना यातून सुचवायचे तर नाही ना? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.