Goa Politics: खरी कुजबुज; कळंगुटची बदनामी कोण थांबवणार?

Khari Kujbuj Political Satire: सध्या कृषी मंत्री असलेले फोंड्याचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना गोव्याच्या राजकारणातील ‘दीपस्तंभ’ म्हणून ओळखले जाते.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुटची बदनामी कोण थांबवणार?

जर राजाच हताश आणि निराश बनून वाचवा हो म्हणायला लागला तर आम जनतेने कोणाच्या तोंडाकडे पहावे? कलंगुट समुद्र किनाऱ्याला लाखो देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. पर्यटनामुळे कलंगुट बदनाम होत असून कलंगुटात अनेक. अनैतिक प्रकार घडत असल्याचा आरोप खुद्द या मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांनीच केल्यामुळे आम जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत.कळंगुट रात्रीच्या वेळी बुधवारपेट बनते इथे वेशा व्यवसाय चालतो.स्पा व मसाज पार्लर च्या आड अनैतिक धंदे चालतात असा आरोप आम्ही.नव्हे आमदार लोबो यांनी केला आहे.आमदारांनी सर्व गैरउद्योग बंद करण्याची मागणी केली आहे. मायकल बाब आमदार आपण, आपली पत्नी आमदार, तुमच्या पक्षाचे सरपंच मग आपण गैर उद्योग बंद करण्याची मागणी करता कुणाकडे? मायकलबाब जर खरेच गैर उद्योग चालत असतील तर आपलेच दात व आपलेच ओठ म्हणून गप्प बसू नका ! ∙∙∙

रवी नाईक ‘विकास पुरुष’

सध्या कृषी मंत्री असलेले फोंड्याचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना गोव्याच्या राजकारणातील ‘दीपस्तंभ’ म्हणून ओळखले जाते. सध्या तर त्यांनी फोंड्यात विकास कामांचा धडाकाच लावला आहे. भाजप सरकारला केंद्रात अकरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कार्यालयात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या आजच्या मेळाव्यात माजी खासदार तथा माजी मंत्री विनय तेंडुलकर यांनीही आपल्या भाषणात या गोष्टीचा उल्लेख केला. पण तशी रवींना ही गोष्ट नवीन नाही म्हणा. फोंड्यात आतापर्यंत जी विकास कामे झाली आहेत त्यातील बहुतेक कामे ही रवीच्या कारकीर्दीतच झाली आहेत, यात शंकाच नाही. पक्ष कोणताही असो त्यांचे कार्य सुरूच असते. आज जमलेल्या फोंड्यातील भाजप कार्यकर्त्यांतही हीच चर्चा सुरू होती. उगाच नाही त्यांना ‘विकास पुरुष’ संबोधले जाते ते. ∙∙∙

फोंड्यात काँग्रेसला ‘अच्छे दिन’?

फोंड्यात येत्या विधानसभा निवडणुकीत मगो, भाजप आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांत जबरदस्त रस्सीखेच होणार आहे. यावेळेला कदाचित महाराष्ट्रवादी गोमंतक - भारतीय जनता पक्ष यांच्यात युती झाली तर या दोन्ही पक्षांच्या युतीला काँग्रेस पक्ष जबरदस्त टक्कर देईल हे नक्की. कारण वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून फोंडावासीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे फोंड्यातील नेते राजेश वेरेकर यांचे नियोजनबद्धरित्या काम सुरू आहे. कुठेही खळखळ नाही की, आततायीपणा नाही. म्हणूनच तर काँग्रेसला यापुढील काळात फोंड्यात तरी कदाचित ‘अच्छे दिन’ येतील, अशी शक्यता आहे, अशा आशयाची चर्चा सध्या फोंडा आणि परिसरात राजकीय वर्तुळात सुरू आहे.∙∙∙

दयानंद मांद्रेकर ‘गोवा फॉरवर्ड’च्या वाटेवर?

शनिवारी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपला वाढदिवस दणक्यात साजरा केला. त्याच्या वाढदिवस समारंभाला विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. कुणी कुणाच्या वाढदिवसाला जावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र शिवोलीचे भाजपचे नेते व चार वेळेचे आमदार व माजी मंत्री दयानंद मांद्रेकर शनिवारी विजय यांच्या वाढदिनी व्यासपीठावर दिसले, त्यांनी भाषण ठोकले, विजय यांचे गुणगान गायले हे पाहून कोणालाही आश्र्चर्य वाटल्याविना राहणार नाही. पण राजकीय विश्‍लेषकांच्या मते ही कदाचित त्यांची राजकीय चालही असू शकते. सध्या २०२२ च्या निवडणुकीत दिलायला लोबोने त्यांना १७२७ मतांनी पराभूत केले. त्या आता भाजपवासीही झाल्या आहेत. त्यामुळे २०२७ मध्ये कदाचित मांद्रेकर यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळणे कठीणच आहे. त्यामुळे त्यांनी ‘गोवा फॉरवर्ड’ च्या चिन्हावर निवडणूक लढवली, तर आश्चर्य वाटू नये, अशी चर्चा उपस्थितांत सुरू झाली. ∙∙∙

सुभाष भाऊ आणि मुख्यमंत्रिपद

सध्या जलस्त्रोत मंत्री असलेले शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर हे तसे राज्यातील ज्येष्ठ नेते. तब्बल आठ वेळा निवडून आलेल्या सुभाष भाऊंचा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे नंतर निवडून येण्याबाबत दुसरा क्रमांक लागतो. पण तरीही ते मुख्यमंत्री काही होऊ शकले नाहीत. याचा उल्लेख मिलिंद म्हाडगुत यांनी लिहिलेल्या ‘गोमंतकीय राजकारणातील बदलते प्रवाह’या पुस्तकात केला आहे. नुकतीच जेव्हा या पुस्तकाची एक हजारावी प्रत भाऊंना देण्यात आली, तेव्हा त्यांनी यावर बोलताना आपल्याला मुख्यमंत्रिपदाची कधीच आशा नव्हती, असा दावा केला. नसेलही पण जनतेचे काय? शिरोड्यातील मतदारांचे काय? त्यांना भाऊ मुख्यमंत्री व्हायला हवेत, असे नक्कीच वाटत असणार. तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून तसा सूर ऐकू येत होता हे नक्की. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; जीव धोक्यात, अनुभव थराराचा!

२१ जूनचा योग, २२ जूनपासून विसर!

आंतरराष्ट्रीय योग दिन जवळ आला, की अचानक राज्यभर योगाचं ‘भान’ येतं. त्यानंतर काही दिवस सगळ्यांना आठवतं की आपण ‘योगप्रिय’ देशात जन्मलोय. कोणी मोकळ्या मैदानात चटई टाकून फोटो काढतो, कोणी शाळांमध्ये मुलांना ओढून नेतो – ‘बाळा, आज योग शिकवणार!’ तर कोणी सरळ व्हॉट्सॲपवर ‘योग करा – निरोगी राहा’ अशी फॉरवर्डस पाठवतो. या एक दिवसापुरत्या अंगवळणी पडलेल्या आसनांमध्ये ‘सेल्फी मुद्रा’ ही सर्वात लोकप्रिय. प्रशासकीय अधिकारी, राजकारणी, शाळा-कॉलेजवाले सगळे मिळून जणू ‘योगदिनाचे नाटक’ रंगवतात. योग म्हणजे शरीर आणि मनाचं एकरूप साधणं,आणि इथे आपल्या लोकांचं लक्ष्य फक्त ‘कॅमेऱ्यात चांगलं दिसणं!’या एका दिवसानंतर मात्र चटई कोपऱ्यात जाते, मन पुन्हा मोबाईलमध्ये हरवतं, शरीर पुन्हा निद्राधीन होतं आणि ‘योग’ हा शब्द वर्षभरासाठी विस्मरणात जातो. योग दिन म्हणजे आत्मपरीक्षणाचा दिवस असायला हवा, पण तो ‘फोटोसेशन’चा उत्सव झालाय. २१ जूनला दिसेल..! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: मंत्रिमंडळ बदलाची दिल्लीत तयारी! PM मोदींच्या कोर्टात चेंडू; 3 मंत्र्यांना मिळू शकतो नारळ

कंत्राटदारांची गत; उन्हाने करपले, पावसाने झोडपले!

मान्सूनपूर्व पावसाच्या दणक्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण रखडले. काही ठिकाणी तर हे काम सुरू असताना अचानक धो धो पाऊस बरसला परिणामी रस्ताकामात अडथळा निर्माण झाला. मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला तो थांबलाच नाही, त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांची स्थिती दयनीय होण्याचा धोका आहे. गेल्या वर्षी खराब झालेल्या रस्त्यांसाठी संबंधित कंत्राटदारांना दोषी धरले होते. आताही मान्सूनपूर्व जोरदार सरींमुळे कदाचित कंत्राटदारांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कंत्राटदारांची स्थिती पावसाने झोडपले आणि उन्हाने करपले, अशी आहे. पाहुया काय होते ते...! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com