Goa Politics: खरी कुजबुज; पणजी नव्हे, फातोर्डा ‘स्मार्ट सिटी’

Khari Kujbuj Political Satire: पणजीत पावसामुळे पुन्हा रस्त्यांची स्थिती दयनीय झाली. शहराला ‘स्मार्ट सिटी’ करण्याचा सरकारचा चाललेला खटाटोप रस्त्यांच्या स्थितीवरून दिसून येतो.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political Satire:Dainik Gomantak
Published on
Updated on

रस्ते दुरुस्तीचे पितळ उघडे

पणजीत पावसामुळे पुन्हा रस्त्यांची स्थिती दयनीय झाली. शहराला ‘स्मार्ट सिटी’ करण्याचा सरकारचा चाललेला खटाटोप रस्त्यांच्या स्थितीवरून दिसून येतो. आधीच स्मार्ट सिटीची कामे संपवण्याबाबत ‘तारीख पे तारीख’चा खेळ झाला आहे. त्यातही घाईघाईत कामे चालल्याचेही दिसून येते. सांतिनेज चर्च जवळ सितारा फार्मसी समोरच्या रस्ता काही महिन्यांपूर्वीच दुरूस्त करून डांबरीकरण केले होते. मात्र, डागडुजी केलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांनी पुन्हा घर केले आहे, त्यामुळे पणजीतील रस्ते डागडुजीचे पितळ उघडे पडू लागलेय, अशी चर्चा शहरात रंगतेय.

पणजी नव्हे, फातोर्डा ‘स्मार्ट सिटी’

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचा वाढदिन सोहळा दणक्यात साजरा झाला. सबंध गोव्यातील विविध मतदारसंघातील राजकीय नेत्यांनी या वाढदिन सोहळ्याला उपस्थिती लावली. राज्यात भाजपाला खाली खेचण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित यावे, असा सूरही यावेळी व्यक्त करण्यात आला. या सोहळ्याला इतर राजकीय पक्षांबरोबरच काँग्रेस पक्षाची नेतेमंडळी होती. त्यात फोंड्यातील काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर यांनी छान भाषण केले. पणजी स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आतापर्यंत हजारो करोडो रुपये खर्च करण्यात आले पण अजून काही पणजी स्मार्ट सिटी म्हणून अस्तित्वात येत नाही, मात्र विरोधात असूनही विजय सरदेसाई यांनी फातोर्ड्याला ‘स्मार्ट सिटी’ केली आहे, असे उद्गार काढताच उपस्थितांकडून टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. शेवटी सत्ता असो वा नसो माणसाचे ‘व्हिजन’ पाहिजे हेच यातून दिसून आले. ∙∙∙

विजयला काँग्रेसचे आमंत्रण?

गोवा फॉरवर्डचे ‘फायरब्रँड’ नेते विजय सरदेसाई हे आता काँग्रेसमध्‍ये प्रवेश करणार का, अशा आशयाची चर्चा त्‍यांच्‍या ५५व्‍या वाढदिवस समारंभानंतर जोर धरू लागली आहे. याचे कारण म्‍हणजे, कर्नाटकचे उपमुख्‍यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विजयला पाठविलेला शुभेच्‍छेचा व्‍हिडिओ. वाढदिवसानिमित्त सरदेसाई यांना शुभेच्‍छा देताना शिवकुमार यांनी काँग्रेस पक्षाबरोबर यापुढे तुमची भरभराट होवो अशा आशयाचे विधान केल्‍यामुळे काँग्रेसकडून विजयला आलेले हे आमंत्रण का? अशी चर्चा सुरू झाली आहे. विजयला दिग्‍विजय सिंग यांनीही अशाच व्‍हिडिओद्वारे वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या होत्‍या आणि विजयनेही आपल्‍या भाषणात गोव्‍याच्‍या भल्‍यासाठी मी कुठलाही पर्याय स्‍वीकारण्‍यास तयार आहे, असे म्‍हटल्‍याने विजय आता लवकरच काँग्रेसमध्‍ये जाणार, असे लोक म्‍हणू लागलेत. यावर काँग्रेसचे स्‍थानिक नेते काय म्‍हणतात, ते पहावे लागेल. ∙∙∙

योजना सुधारा, बंद करू नका!

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, आपण मोफत पाणी दिलं, तर लोक त्याचा गैरवापर करतात, म्हणून आता ते मोफत सेवा बंद करणार म्हणे! आता नळ जोडण्यांची त्यांची अंमलबजावणी ‘सुधारण्याऐवजी’ सरळ योजनाच बंद करणार म्हणजे, ‘आजारावर उपचार करण्याऐवजी रुग्णालाच संपवू’ असं काहीतरी नव्हे का, अशी विचारणा लोक करताहेत. पण चूक आपली नाही, तर विभागाच्या अंमलबजावणीची आहे. जी सुधारण्याऐवजी ‘बंद’ करणं सोपं असं मुख्यमंत्र्यांना वाटतं. त्‍यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करून योजना बंद न करता चूक सुधारावी ना, अशी अपेक्षा लोकांनी बाळगली तर काय चुकले!. ∙∙∙

बाबूचा पुढाकार !

माजी आमदार बाबू कवळेकर यांनी अजूनही मतदारसंघात आपली पत कायम राखली आहे. एल्टन डिकॉस्ता यांनी केपेत कवळेकर यांना पराभूत करून धक्का दिला असला तरी त्यांनी तो पराभव फारसा मनावर घेतलेला नाही. लोकसंपर्क, तसेच घरी येणाऱ्या लोकांची कामे करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. आमदारपद नसले तरी लोकांना हवी ती मदत करण्याबाबत ते कुचराई करत नाहीत. बेतुलच्या स्मशानभूमीचा सध्या विषय चांगलाच गाजत आहे. ओएनजीसीने दिलेल्या जागेत पंचायतीची इमारत ज्या ठिकाणी उभारली आहे, त्याच्या समोरच सुमारे शंभर मीटरवर जागा स्मशानभूमीसाठी ठेवली गेल्याचा विषय. स्मशानभूमी हा विषय लोकांच्या जिव्हाळ्याचा. त्यामुळे ही समस्या घेऊन बेतुलचे नागरीक सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पणजीत आले होते. ज्याठिकाणी मुख्यमंत्र्यांची सायंकाळी पत्रकार परिषद होणार आहे, त्याठिकाणीच हे लोक मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आपली समस्या सांगितली. या भेटीसाठी कवळेकरांनी पुढाकार घेतला होता, या भेटीत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन दिल्याने ही समस्या सुटेल, अशी आशा घेऊन बेतुलवासीय परतले. यावरून लोक अजूनही कवळेकरांकडे या-ना त्या कारणाने संपर्कात आहेत, हे दिसून येते. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; कळंगुटची बदनामी कोण थांबवणार?

म्हापशातील असेही वनीकरण

म्हापशातील उड्डाण पुलावर झुडूपे उगवलीत हे पाहून एक शंका निर्माण होते – हे उड्डाणपूल आहे की वनविभागाचा प्रयोगशाळा प्रकल्प? शासनाच्या देखभाल-दुरुस्तीच्या ‘उड्डाण’ कल्पना किती जमिनीवर उतरल्या आहेत, हे या झुडपांनी स्पष्टपणे दाखवून दिलं आहे. झाडे लावण्याच्या मोहिमा सरकारी फलकांपुरत्या उरतात आणि इथे पुलावर झाडे आपोआप उगवतायत, म्हणजेच निसर्गाला पर्यावरण संतुलन राखण्याचं कामही आता सरकारी हलगर्जीपणामुळे करावे लागते आहे. कधी याला नगरपालिकेची चूक, कधी महामार्ग विभागाची चूक, आता यातून कुणाला दोष द्यायचा आणि कुणाला राजकारणाचं खतपाणी घालायचं, यावर आरोप-प्रत्यारोपांचे नवीन झाडं फुलायला लागले आहेत. काही झाले तरी, या झुडपांना पाहून इतकेच म्हणावेसे वाटते – झाडे तिथे उगवतात, जिथे प्रशासन झोपलेले असते! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: मंत्रिमंडळ बदलाची दिल्लीत तयारी! PM मोदींच्या कोर्टात चेंडू; 3 मंत्र्यांना मिळू शकतो नारळ

...पण ‘भेट’ नेमकी कशाची?

मायकल लोबो यांचा वाढदिवस दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव हा ठरलेलाच! पण या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट कार्यकर्त्यांना अस्वस्थ करतेय – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती आणि... त्यांची भाषणे! मुख्यमंत्री साहेब नेहमीप्रमाणे ‘माझे स्नेही मायकल लोबो यांनी विकासकामांत भरीव योगदान दिलंय’ असं काहीतरी साचेबद्ध बोलतील का? की यावेळी काही वेगळं बोलतील? राजकारणात वाढदिवस हे साजरे होण्याच्या अगदी उलट हेतूने ‘साजरे’ केले जातात. भेटवस्तूपेक्षा कोणाच्या डोक्यावर हात ठेवला जातो, कोणाला उमेदवारीचा दिलासा दिला जातो किंवा कोणाला डावललं जातं, यावरच पुढचं समीकरण ठरतं. त्यामुळे लोबो यांच्या घरी भेटवस्तू कोण घेऊन येतो यापेक्षा भेट कोणाला दिली जाते हे पाहणं अधिक रोचक ठरेल! मुख्यमंत्र्यांचं भाषण हे केवळ वाढदिवसाचं औपचारिक ठरेल, की एखादी अप्रत्यक्ष घोषणा असेल? आणि सगळ्यात महत्त्वाचे – लोबो यांच्या ‘भविष्यातल्या भूमिकेवर’ एक आश्वासक भेट दिली जाईल का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com