

मडगाव: गोव्यात जो नवीन राजकीय पक्ष स्थापन होऊ पाहत आहे त्याचा गोवा फॉरवर्डशी काहीच संबंध नाही. मात्र, काँग्रेस पक्षातील काही असंतुष्ट जर नवीन पक्ष स्थापन करू पाहत आहेत, तर काँग्रेस पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे विभागलेले काम लवकरच मार्गी लागो, एवढीच मी देवाकडे प्रार्थना करेन, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
गोव्यात नवीन गोवा काँग्रेस पक्ष स्थापन होत आहे यावर सरदेसाई यांची प्रतिक्रिया विचारली असता, या घटनेशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे या घटनेशी आमचे काहीही देणेघेणे नाही; पण अशा प्रसंगावर लवकर तोडगा निघेल तर ते चांगले आहे, असे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस पक्षाची युती होणार का, याबद्दल त्यांचे मत विचारले असता ५ जुलै रोजी यासंबंधी बोलणी करूया, असा व्हॉट्सॲप संदेश मला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पाठवला होता.
याव्यतिरिक्त आणखी पुढे काहीच झालेले नाही. वास्तविक हे सर्व करण्यासाठीची वेळ केव्हाच निघून गेली आहे. मात्र, तरीही काँग्रेसला हे सर्व करण्यासाठी अजूनही वेळ बाकी आहे असे वाटत असेल तर आमचीही वाट पाहण्याची तयारी आहे; पण फक्त बोलणी झाली याचा अर्थ अंतिम निर्णय झाला असे नाही. आमचे काम आम्ही चालूच ठेवणार, असे सरदेसाई यांनी सांगितले.
पुढचे १५ दिवस गोव्याबाहेर!
मी उद्यापासून पुढचे १५ दिवस गोव्यात असणार नाही. त्यामुळे गोव्यात परत आल्यावरच आमची बोलणी होतील; पण त्यादरम्यान काँग्रेस पक्षातील स्थिती सुधारलेली असेल अशी मी अपेक्षा बाळगतो. कारण त्यानंतरच व्यवस्थित बोलणी हाेतील, असे सरदेसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.