Goa Congress: तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो काल नवी दिल्ली येथे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटल्याचे वृत्त आहे. फालेरो लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
तृणमूल काँग्रेस सध्या लुईझिन फालेरो यांच्यापासून दूर गेली आहे. फालेरो यांनी वचनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ ‘तृणमूल’च्या नेत्यांनी त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न चालवले असून, त्यांच्याकडून राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा मागितला जात आहे. ममतांनी त्यांना भेटीची वेळ दिलेली नाही.
लुईझिन फालेरो हे गेले काही महिने काँग्रेसला निकट जाण्याचा प्रयत्न करत आहेत. संसद भवनामध्ये काही महिन्यांपूर्वी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा आपला मनोदय बोलून दाखवला आहे. दक्षिण गोव्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्यास फालेरो उत्सुक आहेत.
निवडणूक खर्च: तृणमूलने भाजपलाही टाकले मागे
फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील खर्चाचा तपशील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यात तृणमूल काँग्रेसने सर्वाधिक 47.54 कोटी रुपये, तर भाजपचे 17 कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. विधानसभेत एकही जागा पदरी न पडलेल्या ‘तृणमूल’ने खर्चात मात्र सर्वोच्च स्थान मिळवले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने गोव्यात 3.5 कोटी खर्च केले. या पक्षाने सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत दोन जागांवर विजय मिळवला. भाजपला सत्तेपासून दूर करण्याची आशा बाळगून रिंगणात उतरलेल्या काँग्रेसने अंदाजे 12 कोटी रुपये खर्च केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने 11 उमेदवारांना प्रत्येकी 25 लाख रुपये दिले. त्याशिवाय पक्षाच्या केंद्रीय निधीतून प्रचारावर खर्च केला गेला. दहा उमेदवार उभे करणाऱ्या शिवसेनेने सुमारे 92 लाख रुपये खर्च केले आहेत.
तृणमूल काँग्रेसने गोव्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा सल्ला घेतला. पक्षाने 23 उमेदवार उभे केले; तर त्यांचा मित्रपक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने 13 जागांवर उमेदवार दिले. मगोपला दोन जागा जिंकण्यात यश आले. आम आदमी पक्षाने 39 जागा लढवल्या व दोन जागा जिंकून आपले खाते उघडण्यात यश मिळविले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.