पणजी : गोमंतकीयांनी कला, साहित्य, संशोधन क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले असून प्राचीन वास्तू-शिल्पशास्त्रातील खजिना सर्वप्रथम जयवंत फोंडू धोंड ऊर्फ ‘जबन’ यांनी मराठीत उपलब्ध केला आहे. प्रचंड परिश्रम व चिकाटीने संशोधक वृत्तीने धोंड यांनी संस्कृत भाषेतील खजिना सरळ, सोप्या पद्धतीने मराठीत अनुवादित केला आहे.
त्यांनी मानसार (तीन खंड) मयमतम्, विश्वकर्मप्रकाश, अपराजितपृच्छा, मनुष्यालयचन्द्रिका, व्हिट्रुव्हियस, वास्तू जागर या ग्रंथांचे लेखन केले आहे. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद इतर देशी, विदेशी भाषांतून झाला; पण मराठीत करण्याचे धाडस कोणीच केले नव्हते.
ते शिवधनुष्य एका गोमंतकीयाने गेल्या पंधरा वर्षांत व्रतस्थपणे पेलले असून, वयाच्या 75 व्या वर्षी ‘जबन’ हे ''मानसार’ची सविस्तर आवृत्ती मे 2023 मध्येच प्रकाशित करीत आहेत. ‘मानसार’मध्ये भारतीय स्थापत्य व शिल्पकलांचा वेध घेण्यात आला आहे. मानसार मुनींनी रचलेले हे शास्त्र ‘मानसार’ नावाने प्रसिद्ध आहे.
मानसार म्हणजे मापण्याचा सारगर्भ आणि तिसरा मथितार्थ म्हणजे वास्तू आणि शिल्पशास्त्रातील सिद्धांत व मापांचे वर्णन आहे. या विस्तारित ग्रंथात एकूण 70 अध्याय असून, सुमारे 5250 श्लोक आहेत. पहिल्या चाळीस अध्यायांत भवननिवेश व नगरांची रचना कशी करावी याचे सविस्तर वर्णन आहे. पुढील दहा अध्यायांत रजांचे राजमुकुट, रथ, पलंग, सिंहासन इत्यादींचे वर्णन व उरलेल्या वीस अध्यायांमध्ये वैष्णव, बौद्ध, जैन, मुनी यांच्या मूर्तीची मापे इत्यादींचे विस्तृत वर्णन केले आहे.
प्राचीन वास्तुशास्त्रावरील संस्कृत ग्रंथ हे फ्रेंच, जर्मन, इंग्रजी व इतर दक्षिणेकडील भाषांमध्ये उपलब्ध झाले; पण मराठीत ते कोणीही केले नव्हते. ती उणीव जयवंत धोंड यांनी भरून काढली. धोंड यांच्या पुस्तकांच्या अभ्यासानंतरच वास्तुशास्त्रात पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.
साडेतीन दशकांचा प्रदीर्घ अभ्यास, चिकाटी व ध्यास अशा अनेक पैलूंमुळे त्यांच्याकडून या बहुमोल ग्रंथांची मराठीत निर्मिती घडली. त्यामध्ये नगररचनेपासून ते राजवाड्यांच्या रचनेपर्यंत आणि एक मजल्यापासून अनेक मजल्यापर्यंतच्या बांधकामांबाबत माहिती दिली आहे. प्राचीन काळातसुद्धा बहुमजली इमारतींची रचना कशी नेमकेपणाने मांडली होती, याची दाखले या पुस्तकात आहेत.
‘पीएचडी’साठी उपयुक्त ग्रंथ
गृहविज्ञान, वास्तूशास्त्र, शिल्पशास्त्रात पीएचडी करणाऱ्यासाठी मानसार ग्रंथाची सतत मागणी होती. त्यामुळे संशोधनात्मक आराखड्यानुसार या ग्रंथाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती लेखकांनी दिली.
ग्रंथात सूत्रबद्ध व सुरेख 143 कोष्टके व 194 सुबक आकृत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्रंथांत 1300 हून अधिक संस्कृत -मराठी शब्दाचा वास्तू शब्दकोश आहे.
मुख्य म्हणजे हा केवळ शब्दार्थकोश नसून त्यांत वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन ते शब्द कोणत्या अध्यायात आढळतात, त्यांचा उल्लेखही सूचित केला आहे. विस्तारित ग्रंथातील पृष्ठांची संख्या सुमारे 800 हून अधिक आहे.
देदीप्यमान वाटचाल अशी...
‘मानसार’ हा दाक्षिणात्य पद्धतीचा वास्तुशास्त्रावरील अग्रगण्य व पायाभूत ग्रंथ आहे. या ग्रंथाचा यापूर्वी इंग्रजी अनुवाद डॉ. प्रसन्न कुमार आचार्य यांनी केला. पण, मराठीत कोणीही अनुवाद केला नव्हता. त्यामुळे जयवंत धोंड यांनी (२००८-२०११ दरम्यान) तीन खंडात स्वयंस्थपति या नावाने प्रसिद्ध केला.
हिंदू स्थापत्य शास्राचा सखोल आणि सविस्तर संशोधन इतिहास या पुस्तकात मिळतो. मानसार व व्हिट्रुव्हियस यांतील साम्य जवळजवळ शतकापूर्वी प्रसन्न कुमार आचार्य यांनी मांडले.
त्याच्यानंतर सुमारे पाऊण शतकाने त्रिवेंद्रमच्या मयॉनिक टेक्नॉलॉजीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात तशा तऱ्हेचे साम्य मोड्युलर सिस्टिमच्या आधारे हेलिसिंकीमधील आर्किटेक्ट हेन्री शील्ड यांनी विशद केले.
‘स्थापत्य शास्त्रावरील दहा पुस्तके’ नावाचे ग्रीक रोमन स्थापत्यशास्त्रावरील अनमोल ग्रंथाचे मराठीत व्हिट्रुव्हियस नावाने प्रकाशन करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.