
पणजी: गोव्याचा अर्थसंकल्प पर्यटक तसेच स्वच्छ व हरित गोवा केंद्रित आहे. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा पर्यटकाला पाहिल्यावर त्याची पारख करता यायला हवी.
जनजागृती व जबाबदारी ही पोलिसांची असते, कारण ते बाहेर फिरत असतात. गोवा हे किनारपट्टी राज्य असल्याने पोलिस हे अधिक दक्ष असायला हवेत. आपल्या कामाव्यतिरिक्त अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन कामे करण्याची तयारी ठेवा, अशा कानपिचक्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दिल्या. गोवा सुरक्षेच्या व उपकरणांच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आल्तिनो-पणजी येथील पोलिस कार्यालयात वाहतूक पोलिसांना ५० दुचाकींचे वितरण तसेच बॉम्ब विल्हेवाट व शोध पथकासाठी दोन वाहने तर श्वान कक्षासाठी एका वाहनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तीन नवीन श्वान पोलिस श्वान पथकामध्ये सामील करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस महासंचालक आलोक कुमार, अतिरिक्त पोलिस महासंचालक ओमवीर सिंग बिष्णोई, पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, उपमहानिरीक्षक अजय शर्मा, अधीक्षक धर्मेश आंगले, वाहतूक अधीक्षक प्रबोध शिरवईकर तसेच इतर पोलिस अधिकारी व वाहतूक पोलिस उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीने उपकरणांच्या बाबतीत स्वतंत्र होणे, ही काळाची गरज आहे. सुरक्षेसाठी लागणारी उपकरणे व वाहने असणे महत्त्वाचे आहे, ती गोव्याने खरेदी केली आहेत. यापूर्वी ती शेजारील राज्यातून तात्पुरती आणावी लागत होती, ती आता लागत नाही. त्यामुळे गोवा हे सुरक्षा यंत्रणेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे, असे ते म्हणाले.
पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. सुरक्षेसाठी आवश्यक असलेला ‘जॅमर’ मंजूर करण्यात आला आहे. पोलिस नियंत्रण वाहनाचे अपघात किंवा घटनास्थळी पोचण्याचा वेळ ८ मिनिटापेक्षा कमी आहे. सायबर कक्षाने अनेक प्रकरणांचा पर्दाफाश केला, असे अधीक्षक शिरवईकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.