Goa Tourism: ‘लडकी नही तो आन्टी भी है...’; गोव्यात दलालांचा विळखा, 'दैनिक गोमन्तक'च्या प्रतिनिधीचा Ground Report

Goa Tourist Issue: गेल्या काही दिवसांत पर्यटन ‘बदनामी’च्या खाईत लोटले जात आहे. त्‍याची कारणे न तपासल्‍यास भविष्‍यात त्‍याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
Goa Tourism Ground Report, Goa Touts
Goa Tourism Ground ReportDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourist Problems

पणजी: ‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ असे आपल्या संस्कृतीत म्हटले जाते. गोव्यातील मुख्य व्यवसाय पर्यटन असल्याने पर्यटकाला ‘देव’रूपी मानून त्यांचे आदरातिथ्य केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत हेच पर्यटन ‘बदनामी’च्या खाईत लोटले जात आहे. त्‍याची कारणे न तपासल्‍यास भविष्‍यात त्‍याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

महाराष्ट्रातील काही पर्यटकांसोबत ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीने मिरामार, कळंगुट, बागा व इतर ठिकाणांचा दौरा केला होता. तेव्‍हा काही आक्षेपार्ह मुद्दे समोर आले. अशा प्रकारांची दखल घेतली जाणे आवश्‍‍यक आहे. पंढरपूर (महाराष्ट्र) येथील महेश जाधव यांनी आपला अनुभव कथन केला. ते म्हणाले, दोनापावल येथून आम्ही मिरामार बीचवर आलो.

पर्यटकांची गर्दी असल्यामुळे आमची गाडी कुठे पार्क करावी, असा प्रश्न पडला होता. मात्र, मुख्य चौकातच ‘ओपन स्पेस’ असल्यामुळे गाडी पार्क करू लागलो. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एक-दोन तरुणांनी, तुमची टेम्पो ट्रॅव्हलर याठिकाणी पार्क करता येणार नाही. त्यासाठी दुसरी जागा शोधा, असे म्हणत गाडी काढण्यास सांगितले.

वास्तविक पाहता, त्याठिकाणी अनेक गाड्या पार्क होत्या. मित्राने अशी काही नियमावली आहे का? असा सवाल संबंधित तरुणांना केला. जे तरुण आमच्याशी संवाद साधत होते ते स्थानिक एजंट असल्याचे जाणवत होते. आमचा प्रश्न ऐकून त्यातील एकाने आमच्याशी शाब्दिक वादावादी करायला सुरुवात केली. याठिकाणी गाडी लावाच, मग काय होते ते पहा, अशा प्रकारची उद्धट भाषा ते वापरत होते.

शेवटी आम्ही त्याठिकाणी असलेल्या पोलिस मदत केंद्राकडे (मे आय हेल्‍प यू?) गेलो. मात्र, त्याठिकाणीही पोलिस उपस्थित नव्हते. पोलिसांची भाषा करताच त्या तरुणांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली आणि आम्हाला गाडी पार्क करायला परवानगी दिली. या प्रकारामुळे आमच्यासोबत जो परिवार होता, तो मात्र खूपच घाबरला. ज्या पद्घतीने गोव्यातील बीचवर पर्यटन अनुभवत असताना स्थानिक तरुणांची भाषा असते, त्याला कुठेतरी शिस्त लावण्याची आवश्यकता आहे, असे मला आलेल्या अनुभवावरून वाटते.

शॅकमध्ये असाही डान्स; अरेरावीसुद्धा!

कळंगुटमधील एका शॅकमध्ये मोठ्या आवाजातील संगीतावर युवक-युवती डान्स करीत होते. अनेकांच्या हातात बिअरच्या बाटल्या होत्या. बेधुंद झालेले हे तरुण तरुणींच्या गळ्यात पडत होते. काही तरुणी स्टेजच्या उजव्या बाजूला उभे राहून खाली असलेल्या पर्यटकांना शॅकमध्ये येण्यासाठी प्रेरीत करीत होत्या. कदाचित ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी शॅकमालकाने लढवलेली ही शक्कल असावी. काही तरुणी मादक इशारेही करीत होत्या. एकंदरीत हे शॅक नव्हे, तर ओपन पब असल्याचे भासत होते. यासंबंधी आम्ही पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांकडून या तरुणींचा शोध घेण्यात आला. मात्र. त्या सापडल्या नाहीत.

‘लडकी नही तो आन्टी भी है...’

सोमवारी (ता.१३) रात्री १० वाजताची वेळ. नागपूर येथील एका ७४ वर्षीय महादेवराव निवल यांना कळंगुटमध्ये तीन दलालांनी घेरले. अश्लील इशारे करीत ‘अन्कल कहा से हो...’असे विचारत संवाद सुरू झाला. ‘आपको लडकी चाहिए क्या?’ असे विचारल्यानंतर मात्र या ज्येष्ठ नागरिकाला धक्का बसला. काही तरी गोंधळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांना बोलावले. मित्रांसमोरही या तिन्ही दलालांनी या ज्येष्ठ नागरिकाला विचारणा करणे सुरूच ठेवले. ‘आपको लडकी नही चाहिए, तो हमारे पास आन्टी भी है...’ असेही ते बोलू लागले. हा प्रसंग पहिल्यांदाच गोव्यात आलेल्या या ज्येष्ठाच्या मनाला धक्का देणारा ठरला.

Goa Tourism Ground Report, Goa Touts
Goa Paragliding: पायलट हवेत कसरती करतात, त्याच अंगलट येतात; केरीतील दुर्घटनेनंतर व्यावसायिकाचा दावा

बिनधास्त बोटिंग; पर्यटकांचा जीवही धोक्यात

मिरामार समुद्रकिनारी सध्या बोटिंगची व्यवस्था आहे. येथे हजारो पर्यटक बोटिंगचा आनंद घेतात. पर्यटकांसाठी ही चांगली सुविधा असली तरी ते कायद्याच्या आणि सुरक्षिततेच्या चौकटीत बसणारे आहे की नाही, याचाही विचार सरकारने करावा. एजंट आपल्या पद्धतीने पर्यटकांना दर सांगतात. दरावरून एजंटांमध्ये हमरीतुमरी होते. वाद विकोपाला जातो. अनेकदा जीवरक्षक जॅकेटविना पर्यटकांना या बोटीत बसविले जाते. दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास जबाबदारी कुणाची?

Goa Tourism Ground Report, Goa Touts
Goa Tourism: दोन जीव गमावल्यानंतर गोवा पर्यटन खात्याला जाग; म्हणे, 'केरी पठारावरील पॅराग्लायडिंग अवैध'

‘शॅकमध्ये ‘डान्स झोन’ला परवानगी नाही’

कळंगुटमध्ये काही शॅकमध्ये ‘डान्स झोन’ तयार केले आहेत, त्यास परवानगी आहे का, असे गोवा शॅक असोसिएशनचे सचिव जॉन लोबो यांना विचारले असता ते म्हणाले, शॅकमध्ये अशा ‘डान्स झोन’ला परवानगी नाही. हे अनधिकृत आहे. जर शॅकमध्ये असे चालत असेल तर ते चुकीचे आहे. पोलिसांनी संबंधित शॅकवर कारवाई करायला हवी. पोलिसांच्या उपस्थितीत हे प्रकार चालत असतील तर हे शंकास्पद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com