Goa Tourism: दोन जीव गमावल्यानंतर गोवा पर्यटन खात्याला जाग; म्हणे, 'केरी पठारावरील पॅराग्लायडिंग अवैध'

Querim Paragliding Accident Death: मांद्रे पोलिसांनी पॅराग्लायडर ऑपरेटर शेखर रायजादा याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, शेखरकडे कोणत्याही प्रकारचे पॅराग्लायडिंग परवाने नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Goa Paragliding Accident Death
Paragliding accident GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Paragliding Accident Woman Tourist Death Operator Arrested

पणजी: केरी पठारावरून उड्डाण घेतल्यानंतर पॅराग्लायडिंगचा दोर तुटून समुद्र किनाऱ्यावरील खडकाळ भागावर आपटल्याने नागपूर येथील युवती आणि तिच्यासोबतच्या पायलटचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. त्यामुळे केरी पठारावर पॅराग्लायडिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, रविवारी (१९ जानेवारी) सर्व व्यावसायिक भूमिगत झाल्याचे दिसून आले.

याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी पॅराग्लायडर ऑपरेटर शेखर रायजादा याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, शेखरकडे कोणत्याही प्रकारचे पॅराग्लायडिंग परवाने नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मात्र, या दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून समुद्रकिनारी विविध जलक्रीडा व ॲडव्हेंचर्स व्यावसायिकांच्या परवान्यांची तपासणी पोलिसांनी सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे पर्यटनाशी निगडित विविध व्यवसायातील अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर आल्याने यातील बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालण्याचे आव्हान पर्यटन खात्यापुढे येऊन ठेपले आहे.

पुणे येथून आलेले काही पर्यटक केरी येथील पठारावर शनिवारी पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पर्यटक युवती शिवानी दाभाळे आणि पायलट सुमन नेपाळी यांच्या पॅराग्लायडरचा दोर तुटला आणि ते दोघे खडकावर आपटले. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. संबंधित पॅराग्लायडिंग व्यवसाय हा बेकायदेशीर असल्याचे दिसून आले.

काही दिवसांपूर्वी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्याने पर्यटक बोट बुडाली होती. त्यात महाराष्ट्रातील युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पर्यटन खात्याने बेकायदेशीर जलक्रीडा व्यावसायिकांविरुद्ध मोहीम छेडली होती; परंतु ही कारवाई केवळ वरवरची असल्याचे शनिवारच्या घटनेमुळे दिसून आले आहे.

दोषींवर कारवाई करा; सरपंच

केरी गावात शनिवारी जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे अत्यंत वाईट वाटत असून सरकारने जे कोण बेकायदेशीरपणे पॅराग्लायडिंग करून पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केरीच्या सरपंच धरती नागोजी यांनी केली आहे.

कोस्टल पोलिस ॲक्टिव्ह; पर्यटन व्यावसायिकांची चौकशी

केरी डोंगरमाथ्यावरील पॅराग्लायडिंग अपघातानंतर सावध झालेल्या कोस्टल पोलिसांनी कळंगुट आणि परिसरातील जलक्रीडा तसेच इतर पर्यटनविषयक व्यावसायिकांची कसून चौकशी केली. यात कळंगुटचे पोलिस तसेच पर्यटक पोलिसही सहभागी झाले होते. रविवारी दुपारी पणजी कोस्टल पोलिस पथकाने किनारी भागात पर्यटन व्यावसयिकांची चौकशी केली आणि त्यांना नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना दिल्या.

लाचखोरीचाही आरोप

शनिवारची घटना घडल्यानंतर पॅराग्लायडिंग व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण गतवर्षी याच केरी-पेडणे येथे पॅराग्लायडिंग करणाऱ्यांकडून लाच मागण्याचा प्रकार तेरेखोल पोलिस स्थानकातील पोलिसांच्या अंगलट आला होता. त्यात पोलिस निरीक्षक आणि दोन हवालदारांना भ्रष्टाचार विरोधी पथकाने अटक केली होती. त्यामुळे पॅराग्लायडिंग व्यवसायाआडून सरकारी यंत्रणेतील कोण-कोण हात धुवून घेतात, हे दिसून आले आहे.

युवतीच्या मित्राला धक्का

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली शिवानी दाबाळे ही युवती पुण्याला कामाला होती. ती मूळची नागपूरची. तिच्यासोबत गोव्यात आलेल्या तिच्या मित्राला जबर धक्का बसला असून अद्याप तो सावरलेला नाही. तो सध्या जबानी देण्याच्या मन:स्थितीत नाही. दाबाळे तसेच या तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. युवतीचे नातेवाईक उद्या, २० रोजी गोव्यात येणार आहेत. तिचा मृतदेह गोमेकॉतील शवागारात ठेवला आहे. नातेवाईक आल्यानंतरच शवचिकित्सा केली जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली.

दुर्घटनेचे वृत्त व्हायरल

शनिवारच्या दुर्घटनेमुळे बेकायदेशीर जलक्रीडा व इतर पर्यटनविषयक ॲडव्हेंचर्समधील बेकायदेशीरपणा समोर आला. पर्यटक युवतीच्या मृत्यूचे वृत्त समाजमाध्यमात गतीने व्हायरल झाले आणि पर्यटन खात्यावर नेटकऱ्यांनी प्रश्नही उपस्थित केले. या सर्व पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याशी ‘गोमन्तक’ने संपर्क साधून खात्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Goa Paragliding Accident Death
Goa Paragliding: पॅराग्लायडिंग दुर्घटनेनंतर एका व्यक्तीवर गुन्हा दाखल; दुर्दैवी प्रकार टळला असता? पंचायतीच्या याचिकेकडे दुर्लक्ष

व्यावसायिक ‘नॉट रिचेबल’

शनिवारी ही दुर्घटना घडल्यानंतर रविवारी केरी, हरमल, पालये पठारावर एकही पॅराग्लायडिंग व्यावसायिक फिरकला नव्हता. सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. तसेच संबंधित व्यावसायिकांनी आपले मोबाईल फोनही बंद ठेवले होते.

Goa Paragliding Accident Death
Goa Paragliding: पॅराग्लायडिंग करताना दोरी तुटून दोघे कोसळले दरीत, पुण्यातील पर्यटक युवतीसह पायलट ठार

पॅराग्लायडिंगला परवानगी नव्हती

1. केरी पठारावर पॅराग्लायडिंगसाठी पर्यटन विभागाने कोणतीही परवानगी किंवा मान्यता दिली नव्हती. ही कृती बेकायदेशीर होती, असे पर्यटन खात्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

2. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी केवळ परवानाधारक आणि अधिकृत सेवांचा वापर करण्याचे आवाहन पर्यटक व ऑपरेटरना करण्यात येत आहे.

3. राज्यातील उपक्रम सुरक्षा नियम आणि परवाना नियमांचे काटेकोरपणे पालन करतील याची खात्री करण्यासाठी खात्यातर्फे लवकरच यासंदर्भात पावले उचलली जातील, असे खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com