फातोर्डा- जगात स्तन कर्क रोगाचे (breast cancer) सर्वाधिक प्रमाण असल्याचे मणिपाल इस्पितळातील प्रमुख डॉ, शेखर साळकर यानी सांगितले. याचे कारण महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ते न करता महिलांनी नियमीत तपासणी करावी व लवकर निदान करण्यासाठी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला हे उपयुक्त ठरेल असे त्यानी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने मडगावी आयोजित केलेल्या स्तन कर्क रोगावरील शिबिरात ते बोलत होते. या प्रसंगी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार व एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर उपस्थित होते.
या शिबिराचा फायदा 100 पेक्षा जास्त महिलांनी घेतला व आपली तपासणी करुन घेतली. जर एखादी शंका आली तर महिलांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच सरकारने स्तन कर्क रोगावरील उपचार डीडीएसव्हाय या आरोग्य विमा योजनेमध्ये समाविष्ट केल्याने उपचारासाठी जास्त खर्च होणार नाही असेही डॉ. साळकर यानी सांगितले.
मुलींचे विवाह 25 ते 27 वयोमान दरम्यान होणे व पहिले मुल वयाच्या 30 वर्षापुर्वी व्हावे हे महिलांसाठी आरोग्ययदायी ठरणारे आहे. शिवाय महिलांनी कमीत कमी सहा महिने तरी मुलांना स्तनपान करावे. दोन वर्षांपर्यंत स्तनपान हे महिलांसाठी केव्हाही चांगले. जास्त स्तनपान केल्यास स्तन कर्करोग होण्याचे प्रमाणे 30 टक्क्यांनी घटते असेही डॉ. साळकर म्हणाले.
महिलांनी वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शिवाय कौटुंबिक इतिहासावरही कर्क रोग होणे किंवा न होणे हे सुद्धा अवलंबुन असते असेही डॉ. साळकर म्हणाले. स्तन कर्क रोग झाल्यास महिलांनी भिऊ नये, आता वैद्यकीय विज्ञान विकसित झाल्याने कर्क रोगापासुन मुक्ती मिळवणे शक्य झाले आहे असेही डॉ. साळकर यांनी शेवटी सांगितले. 17 सप्टेेंबर या पंतप्रधान मोदी यांचा 71वा वाढदिनापासुन ते 7 ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या राजकीय ्कारकिर्दिला 20 वर्षे पुर्ण होत आहेत, त्यानिमित्त पक्षाने या 21 दिवसांच्या कालावधीत
सेवा आणि समर्पण शिबिरांचे देशभर आयोजन केले आहे. हे आरोग्य शिबिर त्याचाच एक भाग असल्याचे सावईकर यानी सांगितले. विनय तेंडुलकर यानीही आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरात डॉ. युजीन रेंट व डॉ. श्रुती हलगे यानी महिलांची तपासणी केली. कार्यक्रमाला राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस रंजिता पै, पक्षाच्या आरोग्य विभागाच्या डॉ. स्नेहा भागवत, मडगाव मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे, दक्षिण गोवा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष शैला पार्सेकर, सरचिटणीस कुणाली मांद्रेकर व मडगाव, फातोर्डा, नावेली, कुडतरी, बाणावली महिला मोर्चाच्या अध्यक्षा उपस्थित होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.