Goa Politics: खरी कुजबुज; शिक्षकांना हवी सेवानिवृत्ती वयात वाढ!

Khari Kujbuj Political Satire: प्रतिमा कुतिन्हो गोव्यातील राजकीय पटलावरील सर्वश्रुत नाव आहे. वेगवेगळ्या कारणासाठी आंदोलन करणे हा त्यांच्या हातचा मळ आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

शिक्षकांना हवी सेवानिवृत्ती वयात वाढ!

कायदा हा सगळ्यांना समान असायला हवा. एका बाजूने आपण एक देश एक संविधान म्हणतो. एक देश एक निवडणुकीचे तुणतुणे वाजवितो. एक देश एक भाषा, एक देश एक कायदा म्हणतो मग सरकारमान्य शिक्षकांच्या सेवा निवृत्ती वयात फरक का? असा प्रश्न विचारला जात आहे. सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या म्हणजे शिक्षकांचे सेवानिवृत्ती वय बासष्ट केले आहे. राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांचे निवृत्तीचे वय बासष्ट आहे. जर महाविद्यालयीन शिक्षक बासष्ट वर्षापर्यंत शिकवू शकतात, तर मग प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वय ६० का? महाविद्यालयीन शिक्षक व इतर शिक्षकांना कायदा वेगळा का? जर सरकारने बेरोजगारी कमी करण्यासाठी हे केले असेल तर सगळ्यांनाच साठ वर्षांच्या वयात सेवानिवृत्ती द्यावी किंवा सगळ्याच शिक्षकांचे सेवानिवृत्ती वय बासष्ट करावे असा सूर शिक्षकांकडून ऐकू येत आहे. आता बघुया सरकार यावर काय निर्णय घेते. ∙∙∙

प्रतिमांचा नवा राजकीय डाव?

प्रतिमा कुतिन्हो गोव्यातील राजकीय पटलावरील सर्वश्रुत नाव आहे. वेगवेगळ्या कारणासाठी आंदोलन करणे हा त्यांच्या हातचा मळ आहे. त्या मडगावच्या नगरसेवक व उपनगराध्यक्षसुद्धा झाल्या. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस अशा व इतर अनेक पक्षातून त्यांची वाटचाल चालू आहे. सध्या मात्र त्या नेमक्या कुठे आहेत हे त्यांना स्वतःलाच माहीत नसावे. त्या महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्या आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेते त्यांच्यापासून थोडे दूरच राहतात. आमदार होणे ही त्यांची इच्छा आहे. यापूर्वी नावेलीतून त्या विधानसभा निवडणूक लढल्या व अयशस्वी ठरल्या. २०२७ ची विधानसभा निवडणूक लढविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र, कोणत्या पक्षाच्या चिन्हावर हा प्रश्न त्यांच्यासमोर आहेच. कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणे त्यांनी पसंत केले असते, पण जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोज यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून प्रतिमांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे असे लोक सांगतात. शुक्रवारी गोवा फॉरवर्डच्या जनता दरबारात आमदार विजयबरोबर त्या आवर्जून व्यासपीठावर उपस्थित होत्या. गोवा फॉरवर्डच्या तिकिटावर तर निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी नसेल ना? प्रतिमांचा तसा नवा राजकीय डाव तर नसेल ना? पण विजयबाब त्यांना पूर्ण ओळखून आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीच्या भवितव्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

काय गोंधळ घालणार?

पत्रकार जेव्हा मंत्रालयात बातम्यांचा कानोसा घ्यायला जातात, तेव्हा सारे मंत्रिगण विशेषतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत विधानसभेच्या तयारीत गुंतल्याचे जाणवते, परंतु एकेकाळी विधानसभा अधिवेशन म्हटले की मुख्यमंत्री काहीसे तणावाखाली असायचे. सध्या तशी परिस्थिती नाही. सध्या तर ते ‘कूल’ आहेत. परवा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून विरोधकांनी सभात्याग केला, परंतु सत्ताधाऱ्यांच्या बाजूने ३३ व विरोधक केवळ सातजण आहेत. आपल्याला कामकाजात अर्ध्या वेळेचा हिस्सा मिळावा ही विरोधकांची मागणी कशी काय मान्य होऊ शकते? गोवा विधानसभेत तशी पूर्वपीठिकाही नाही. त्यामुळे विरोधकांना वेळ मिळणार नाही आणि त्यांनी आरडाओरड केली तरी त्यांना कसे तोंड द्यायचे ते मुख्यमंत्री ओळखून आहेत. गेल्या साडेसहा वर्षांच्या कारकिर्दीत डॉ. प्रमोद सावंत अगदी तरबेज बनले आहेत. ∙∙∙

दिगंबरको गुस्‍सा क्‍यूं आता है?

वास्‍तविक दिगंबर कामत यांची प्रतिमा कुठलीही गोष्‍ट असो तिचा साधकबाधक विचार करून प्रतिक्रिया देणारे राजकारणी अशा प्रकारची आहे. प्रसार माध्‍यमांशीही त्‍यांचे वागणे कधीही आततायीपणाचे नसते. तरीही कधी कधी कामत प्रसार माध्‍यमांवर रागावू लागले आहेत आणि हल्‍ली असे प्रकार बरेच वाढले आहेत असे वाटते. दोन दिवसांपूर्वीचीच गोष्‍ट घ्‍या. फातोर्डा येथे जलस्रोत खात्‍याकडून एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला दिगंबर कामत हेही उपस्‍थित होते. यावेळी एका पत्रकाराने कामत यांना विचारले की, विजयने मडगावात दरबार घडवून आणला म्‍हणून तुम्‍ही आता फातोर्ड्यात येऊ लागले आहेत का? यावर कामत यांचा पारा काही प्रमाणात चढला. ते म्‍हणाले, तुम्‍ही पत्रकार काय लोकांमध्‍ये भांडणे लावून देण्‍याचे काम करत आहात का? वास्‍तविक अशा प्रश्नांवर चिडण्‍याचे फारसे काही कारण नव्‍हते, पण कित्‍येकवेळा पत्रकार संदर्भहीन प्रश्न करतात. त्‍यामुळे कामत यांचा पारा चढला तर त्‍यांना तरी कसा दोष देता येईल? ∙∙∙

हे संविधान काय रे भाऊ?

गोव्यात सध्या संविधानाच्या नावाने वेगवेगळ्या सभा व मेळावे होत असून त्यात संबंधित मंडळी भाषणे करून तोंडसुख घेताना दिसत आहेत, पण या मंडळींना खरोखरच संविधानाची माहिती आहे का? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागला आहे. प्रथम १९७५ मधील आणीबाणीला पन्नास वर्षे झाल्याबद्दल भाजपवाल्यांनी काळादिन पाळला व काँग्रेसवर आरोप करून तोंडसुख घेतले. आता काँग्रेसवाल्यांना मोदी राजवटीत अघोषित आणीबाणी लागू असल्याचा साक्षात्कार झाला असून ते संविधान बचावासाठी सभा मेळावे घेत आहेत. या एकंदर प्रकारात सर्वसामान्य म्हणजेच आम आदमी मात्र गोंधळून गेला असून तो दुसऱ्याला हे संविधान काय रे भाऊ व ते कुठे पाहायला मिळेल असे विचारत आहे. त्यावरून सर्वसामान्य या एकंदर प्रकरणात अंधारातच असल्याचे दिसून येत आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचा जावई शोध

गोव्यात सरकारी शाळा बंद होत चालल्या आहेत, पण शनिवारी मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थी व शिक्षकांना संबोधताना अशा शाळा बंद पडण्याचे खरे कारण पालकच असल्याचे सांगून सगळ्यांचीच तोंडे बंद केली. प्रत्यक्षात देशी शाळांत मुलांना पाठविण्याची कोणाचीच तयारी नाही व त्यामुळे इंग्रजी शाळा सर्वत्र फोफावल्या ही वस्तुस्थिती आहे, पण अशा शाळांना सरकारच मागणी तसा पुरवठा या न्यायाने मान्यता देते ना! या मुद्याकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात. तेवढ्याने संपत नाही, तर बहुतेक राजकीय नेते, त्यात मग आमदारही आलेच, त्यांनीच अशा शिक्षण संस्था सुरू केलेल्या असून ते शिक्षण महर्षी बनलेले आहेत. त्यामुळेच शिक्षण खात्याचा तर नाइलाज होत नसावा ना? असा प्रश्न येतो. आता मुख्यमंत्र्यांनी जो दावा केला तो अनेकांना रुचणार नाही हे खरे असले तरी ती वस्तुस्थिती आहे असे म्हणतात. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; ‘रो-रो फेरी’ की खो-खो?

आरजीचे नवीन ऑफीस...

आरजी पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांच्या उपस्थितीत थिवी मतदारसंघात आरजीच्या नवीन कार्यालयाचे उद्‍घाटन शनिवारी झाले. गेल्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मनोज परब यांना ५ हजार मते पडली होती. आगामी विधानसभेला काही महिने शिल्लक असताना आरजीचे म्हणजे मनोज परब यांच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण झाले. यातून त्यांनी आगामी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. मागच्या निवडणुकीत जी कमतरता राहिली, ती २०२७ मध्ये पूर्ण करण्याचा त्यांना विडा उचलला आहे, हे त्यांच्या कृतीमधून दिसते. आता ते यशस्वी होतात की नाही, हे मतदार ठरवतील. दुसरीकडे या कार्यालयामुळे मनोज परब हे पुन्हा टार्गेट न झाले म्हणजे मिळवले. कारण मनोज यांना त्यांचे विरोधक ‘स्पॉन्सरशीप’ लक्ष्य करत असतात. त्यामुळे या कार्यालयावरून पुन्हा ते टीकेचे धनी बनल्यास कोणालाच नवल वाटणार नाही ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

मडगावात ‘अल्लादिन का चिराग’!

मडगावच्या राजकारणाने सध्या गती घेतली आहे की काय अशी एकंदर स्थिती आहे. एका बाजूने प्रभव आपली पत्रके काढण्यात मग्न असताना विजयने मडगावात आपला दरबार भरवून या राजकारणात आणखी रंग भरला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे चिराग नायक यांनी मडगाव शहरात जिथे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते बुजवायची मोहीम हाती घेतली आहे. यावर समाज माध्यमांवर एक विलक्षण असा कॉमेंट घालण्यात आला असून मडगावच्या रस्त्यावरील खड्डे अकस्मात नाहीसे होण्यामागे कुणा ‘अल्लादिनचा चिराग’ तर अवतरला नाही ना? चिरागची दखल मडगावकर घेऊ लागले असे म्हणायचे का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com