Goa Politics: खरी कुजबुज; ‘रो-रो फेरी’ की खो-खो?

Khari Kujbuj: वीज खात्याने मध्यंतरी वीजखांबांवर विनापरवाना टाकलेल्या इंटरनेट व केबलवाल्यांच्या केबली हटविल्या पण नंतर काय झाले कोणास ठाऊक परत नव्याने केबली टाकल्या गेल्या.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

वाहतूक पोलिस काय करतात?

राज्यात रस्ते अपघात थांबण्याचे नाव घेत नाही, असे दिसते. कुर्टी-बेतोडा येथे गुरुवारी घडलेल्या अपघातातून युवक काय बोध घेणार आहेत, हे त्यांनाच माहीत. ज्याप्रकारे अपघात घडत आहेत, त्यातून जीवन किती कवडीमोल झाले आहे, असेच दिसते. बेतोडा येथील अपघात घडल्यानंतर वाहतूक पोलिस तात्काळ सिग्नल यंत्रणा सुरू करते, यावरून वाहतूक पोलिस खात्याला खरोखरच वाहनधारकांच्या जीवाचे काहीच पडलेले नाही, असा सर्वंकष निष्कर्ष काढता येतो. सध्या पर्वरी येथील उड्डाण पुलाचे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी २५ ते ३० डंपर कामाला लागलेले आहेत. पावसामुळे व मातीची उचल होत असल्यामुळे डंपरचा मागील भाग पूर्णपणे धुळीने माखलेला असतो. त्यामुळे डंपरच्या मागील बाजूच्या नंबर प्लेट दिसत नाहीत. परवा गिरी येथे दुचाकीस्वाराला ठोकरल्यानंतर ती बस होती म्हणून सापडली, अन्यथा डंपरवगैरे असता तर मागून क्रमांकही कळाला नसता. एखादी घटना घडल्यानंतर सरकारला जाग येते, असे न करता वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांच्या मागील नंबरप्लेट सतत दिसायला हवी म्हणून डंपर किंवा ट्रकचालकांना सक्ती करणे आवश्यक आहे. ∙∙∙

स्वतःला असुरक्षित वाटणारे कोण?

आपले कॉंग्रेसबरोबर संबंध दृढ आहेत. आपल्या पक्षाची कॉंग्रेसशी युती आहे व ही युती २०२७ पर्यंत टिकणार आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजयबाब सरदेसाई यांनी सांगितले. मात्र, काही जणांना स्वतःला असुरक्षित वाटते. त्यामुळे ते युती तुटली किंवा आणखी काही तरी अशी अफवा पसरवतात,असेही ते म्हणाले. मात्र, विजयबाबने स्वतःला असुरक्षित वाटणारे कोण, हे स्पष्ट केले नाही. या मध्ये कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले आमदार आहेत, की कॉंग्रेसमधीलच उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडणारे आहेत, याबद्दल आता चर्चा सुरू झालीय. ∙∙∙

‘रो-रो फेरी’ की खो-खो?

रोरो फेरी सोमवारपासून सुरू होणार आहे, असे आता सांगण्यात येतेय. याआधी अनेकदा लवकरच सुरू होणार म्हणून तारीखही जाहीर केली. पण जेव्हा तारीख जवळ आली तेव्हा मात्र सरकारने तारीख पुढे ढकलली. सरकार ‘रोरो फेरी’च्या नावाने आमच्याशी खो–खो खेळत आहे, असे प्रवासी म्हणताहेत. सरकार रोरो सुरू होणार म्हणते आणि आम्ही फेरी पकडायला गेलो तर ती फेरीच गायब असते. नंतर कानावर पडते ती बातमी, रोरो फेरी काही दिवसांनी सुरू होईल. त्यामुळे आताची तारीख निश्चित आहे की, अजून मुहूर्त सापडायचा आहे, अशी मिश्किल चर्चा सुरू आहे. ∙∙∙

काँग्रेस का निष्क्रिय ?

काल फोंडा येथे काँग्रेसचा संविधान बचाव कार्यक्रम झाला. त्यावेळी एका युवकाने फोंड्यातील काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांना एक प्रश्न केला की २०१७ पासून फोंड्याचा ओडीपी तीनवेळा बदलला पण तुमच्या बांधकाम प्रकल्पांना कुणीच कसे रोखले नाही. या प्रश्‍नात गर्भित अर्थ असल्याने वेरेकर यांनी त्याला उत्तर दिले नाही, ही गोष्ट वेगळी. त्या युवकाने त्याचवेळी आणखी एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे मागच्या निवडणुकीत आपण डॉ. केतन भाटीकर यांच्या विरोधात काम केले पण आपल्या घरचा एक व्यक्ती आजारी पडला, त्यावेळी ‘गोमेकॉ’त भाटीकरच धावून आले. जर फोंड्यात भाटीकर एवढे ‘ॲक्टिव्ह’ आहेत तर काँग्रेस नेते का नाहीत ? या प्रश्नांतून भाटीकर यांचा ‘फोंडा कनेक्ट’ किती जबरदस्त आहे, ते कळलेच आणि बाकीचे कसे वागतात तेही ! ∙∙∙

तोडलेल्या केबल्सची समस्या

वीज खात्याने मध्यंतरी वीजखांबांवर विनापरवाना टाकलेल्या इंटरनेट व केबलवाल्यांच्या केबली हटविल्या पण नंतर काय झाले कोणास ठाऊक परत नव्याने केबली टाकल्या गेल्या व सदर मोहिमेसाठींच्या नोडल अधिकाऱ्याचीही उचलबांगडी झाली. त्यामुळे कोणाचे भले झाले ते मात्र उघड झाले नाही. पण मुद्दा तो नाही तर या कापून टाकलेल्या केबल आता नवीच समस्या करत आहेत. काही ठिकाणी कापून टाकलेल्या या केबल रस्त्याकडेच्या गटारांत पडून तेथील पाण्याचा निचरा होण्यात अडथळा करत आहेत तर अन्यत्र त्या खांबांवर लोंबकळत असून रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. अनेक ठिकाणी त्या कापून तशाच टाकलेल्या आहेत व त्या रस्त्यावरही पडलेल्या आहेत. संबंधित लोकांनी परत खांबांवर नव्याने नव्या केबल टाकल्या मग या कापून टाकलेल्या केबल हटविणार कोण, अशी विचारणा होऊं लागलेली आहे. खरे म्हणजे ज्या लोकांनी त्या टाकल्या होत्या, त्यांनाच ती सक्ती का करू नये, अशीही विचारणा होऊ लागलीय. ∙∙∙

भाजपच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांतला फरक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील विकासपत्राचे वाटप करण्याची जबाबदारी भाजपच्या सर्व आमदार, कार्यकर्त्यांवर आहे. काही ठिकाणी विकासपत्राचे वाटप पूर्ण केले, तर काही ठिकाणी विकासपत्राचे वाटप एक दिवस एकाच प्रभागात करून नंतर वाटप करण्याची जबाबदारी काही आमदारांनी कार्यकर्त्यांवर सोपवली. जे कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये आले आहेत, त्यांच्या मतदारसंघात वाटप रखडले आहे. हे सर्व नवीन कार्यकर्ते कॉंग्रेसमधून आलेले आहेत. त्यांना काम करण्याची सवय नाही. जर जुने कार्यकर्ते असते तर त्यांनी एव्हाना विकासपत्राचे वाटप केले असते, अशी चर्चाही सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना या आमदारांना आठवण करून द्यावी लागत आहे. कारण भाजपच्या प्रत्येक कामाचा अहवाल पक्षश्रेष्ठींना नवी दिल्लीत पाठवायचा असतो. त्यानंतर काही आमदारांनी आपल्या मतदारसंघातील इतर प्रभागात विकासपत्रे वाटणे सुरू केले. पण हे करताना आपल्या कुटुंबीयांनाही बरोबर घेतले. आज विजयबाबनेही ‘कुटुंबीयांना घेऊन फिरले म्हणून मते मिळत नसतात’, असा टोला हाणला. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; निबंधकांचा आदेश आणि गोविंदरावांचा जावईशोध!

वाढदिवस अन्‌ आत्मविश्‍वास

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून खरेच उमेदवारी मिळणार का? अशा तऱ्हेची संभ्रमित अशी राजकीय परिस्‍थिती निर्माण झालेली असतानाच गुरुवारी नीलेश काब्राल यांनी आपला ५३ वा वाढदिवस कुडचडेच्‍या रवींद्र भवनात साजरा केला. सकाळी १० वाजता त्‍यांनी रवींद्र भवनात शुभेच्‍छा स्‍वीकारण्‍यासाठी कार्यक्रम ठेवला हाेता, तो रात्री १० वाजेपर्यंत चालू हाेता. त्‍यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्‍छा देण्‍यासाठी सकाळपासून त्‍यांच्‍या चाहत्‍यांची रांग लागली होती. सायंकाळी मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनीही त्‍यांच्‍या वाढदिवसाला हजेरी लावली. मी लोकांचा उमेदवार आणि मला राजकारणातून निवृत्त करायचे असेल तर हे लोकच मला निवृत्त करतील, असा विश्‍वास काब्राल यांनी कित्‍येकदा बोलून दाखविला आहे. शुक्रवारी त्‍यांच्‍या वाढदिवस कार्यक्रमाची गर्दी पाहिल्‍यास त्‍यांचा आत्‍मविश्‍वास हा वृथा नाही, हेही दिसून आले. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; निबंधकांचा आदेश आणि गोविंदरावांचा जावईशोध!

केवळ श्रेयासाठी

मांद्रेतील लोकांना सार्वजनिक स्मशानभूमी हवी होती आणि ही मागणी कित्येक वर्षांपासून प्रलंबित होती. गेल्यावर्षी जुलैमध्ये जेव्हा स्थानिकांनी ग्रामसभेत जोरदार मागणी लावून धरली, तेव्हा पंचायतीला स्मशानभूमीसाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू करावेच लागले. अखेर पंचायतीने महसूल विभागाला पत्र लिहिले आणि ती जमीन पंचायत संचालनालयाला अखेर आता देण्यात आली. त्यामुळे आता लवकरच ती जमीन मांद्रे पंचायतीला मिळणार असल्याने लोक सुखावलेत. मात्र चर्चा रंगते ती म्हणजे याचे ‘श्रेय’ काण घेणार याची. आमदार म्हणतात आपण केले. पण महसूल खात्याने आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या एकाही पत्रव्यवहारात आमदारांच्या पत्राचा उल्लेख देखील नाही. उल्लेख आहे तो पंचायतीचा. त्यामुळे हे काम पंचायतीने केले आणि त्याचे श्रेय लोकांना म्हणजेच आम्हाला द्या, असे चक्क आता स्थानिक ओरडून सांगताहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com