

फोंडा: येथील जनता दरबारात पालकमंत्री तथा जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. पालिका क्षेत्रासह मतदारसंघातील नागरिकांनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या. त्यात प्रामुख्याने पाणी, रस्ते, मलनिस्सारण जोडणी तसेच विजेसंबंधी तक्रारी होत्या.
शिरोडकर यांनी या समस्या ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना केल्या. बुधवारी झालेल्या या जनता दरबारात विशेषतः नगरसेवक तसेच पंचसदस्यांनीही आपापल्या समस्या मांडल्या.
यावेळी नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, नगरसेवक तथा राजीव गांधी कलामंदिरचे अध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक विश्वनाथ दळवी आदी उपस्थित होते.
फोंड्यात सध्या पाण्याचा प्रश्न सतावत आहे. अनेक ठिकाणी पुरेसे पाणी मिळत नसल्याने लोकांचे अतिशय हाल होत असून, यासंबंधी नागरिकांच्या प्रामुख्याने तक्रारी होत्या. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शुद्धीकरण केलेले पाणी संबंधित टाकीत वेळेत पोहोचणे आवश्यक असून, पुरेसे पाणी सर्वांना उपलब्ध व्हावे, अशी सूचना सुभाष शिरोडकर यांनी केली.
मलनिस्सारण जोडणीसंबंधीही अनेकांनी आपल्या तक्रारी मांडताना त्यात सुलभता यावी, असे सुचवले. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. भूमिगत वीजवाहिनी घालताना रस्ते खोदण्यात आले होते. ते आता दुरुस्त करण्यात येणार असून, त्यासंबंधीच्या सूचना अधिकाऱ्यांना देताना विजेसंबंधी तशा समस्या नसल्याचे सुभाष शिरोडकर यांनी नमूद केले. यावेळी रितेश नाईक, विश्वनाथ दळवी, रूपक देसाई, शौनक बोरकर तसेच इतर नगरसेवकांसह पंचसदस्यांनीही आपापल्या समस्या मांडल्या.
गांजे पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करणार!
गांजे येथील पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असून, चोवीस तास पाणी शुद्धीकरण करण्याबरोबरच मुख्य टाकीपर्यंत जलवाहिनी नेण्यासाठी येणारा अडथळा दूर करण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पातून केवळ २.५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत असून, तो २५ एमएलडीपर्यंत नेण्याचा निर्णय यावेळी झाला. येत्या पंधरा दिवसांत योग्य कार्यवाही होणार असून, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सुभाष शिरोडकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.