
पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नुकतीच मर्दनगडाच्या ठिकाणी भेट दिली, अन् मर्दनगडाचे संवर्धन करणार, अशी घोषणा केली. शिवप्रेमी सुभाष फळदेसाईंच्या घोषणेचे शिवप्रेमी, इतिहासप्रेमींकडून स्वागत होते आहे. मर्दनगडाचे संवर्धन करणार म्हणजे नेमके काय करणार, असा प्रश्न अनेक सुज्ञांना पडला आहे. किल्ल्याची पुन्हा उभारणी करणार का, असाही सवाल शिवप्रेमींकडून विचारला जात आहे, तसे झाले तर आनंदच आहे. मंत्री फळदेसाईंनी घोषणा प्रत्यक्षात आणावीच! ∙∙∙
मडगाव फातोर्ड्यांतील भंगार अड्डे हलवून ते सां जुझे द आरियाल येथे आणू नयेत, असे आमदार क्रुझ सिल्वा यांना वाटते. त्याच्या म्हणण्यानुसार मडगाव औद्योगिक वसाहत असे नाव असले तरी ती प्रत्यक्षात त्यांच्या मतदारसंघात येते. आधीच भंगार अड्ड्यांनी तेथे घडणाऱ्या घटनांमुळे किंवा अवैध तथा गैरकृत्यांमुळे राज्यात सगळ्यांनाच डोकेदुखी निर्माण केली आहे. पूनर्वसनाच्या नावाखाली आणखीन भंगार अड्डे आले तर सगळ्यांनाच जगणे कठीण होईल. त्यामुळे शुक्रवारी भंगारअड्ड्यांचा विषय चर्चेला आला तेव्हा आपल्या भावना मांडण्यापासून सिल्वा स्वतःला आवरू शकले नाहीत. ∙∙∙
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त. त्यांच्या निवासस्थानी भेट दिलेल्याला याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही. शुक्रवारी विधानसभेत दाजी साळकर यांनी मर्दनगडाविषयी मुद्दा मांडला आणि फळदेसाईंना स्फूरण चढले. साळकर यांनी मुद्दे मांडण्याआधीच मराठीत फळदेसाई यांनी गर्जना करणे सुरू केले. मर्दनगड राहिला बाजूला त्यांनी मराठ्यांचा गोव्याशी असलेला संबंध स्पष्ट करत त्वेषाने भाषण केले. त्यामुळे वीजमंत्री सुदिन ढवळीकरांवर ज्येष्ठतेच्या नावाने आमदाराने आपले बोलणे पूर्ण केल्यावर पूर्ण चर्चा होऊ द्यायची असते आणि शेवटी मंत्र्याने उत्तर द्यायचे असते, असे सांगण्याची वेळ आली. ∙∙∙
अलिकडे कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वा चाव्यामुळे त्रस्त झालेल्यांच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. पणजी-ताळगाव रस्त्यावरील तांबडी माती, मधुबन सर्कल परिसरात कुत्र्यांचे कळप बसलेले असतात. तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिवसा सहसा त्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जाणवत नाही, मात्र रात्र होते, तशी कुत्र्यांचे कळप जमू लागतात. तिथे कुत्र्यांनी कुणाचा चावा घेतल्याची घटना जरी घडली नसली तरी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वा वाहनांच्या मागे लागल्यामुळे अनेकांना दवाखान्याचे तोंड बघावे लागले आहे. ही दहशत इतकी वाढलीय की काहीजणांनी आपला रस्ताच बदलला आहे. इतकेच काय त्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पंचायतीकडे किंवा मनपाकडेही साकडे घातलेय, पण त्यांनीही या कुत्र्यांच्या दहशतीमुळे तिकडे फिरकणे बंद केलेय की काय, अशी विचारणा होऊ लागलीय! ∙∙∙
अनमोड घाटातील राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग कोसळून रस्ता ‘अर्धा’ झाला असला तरी, धोका मात्र ‘पूर्ण’ आहे. वळणावळणाच्या रस्त्यावरून धडधडत्या गाड्या जात असताना बाजूला थेट दरीचे दर्शन — पर्यटन विकास की स्टंट शो, असा प्रश्न चालकांना पडतोय. रोजचा जीव मुठीत घेऊन जाणारे वाहनचालक आणि प्रवासी पीडब्ल्यूडीला आर्जव करतायत की हा ‘लाईव्ह अॅडव्हेंचर पार्क’ तातडीने बंद करून रस्ता दुरुस्त करावा; नाहीतर पुढच्या वेळी ‘रस्ता कोसळला’ ऐवजी ‘कोण कोसळले’ अशी चर्चा सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ∙∙∙
मोपा येथील विमानतळावरील पार्किंग शुल्कात आता वाढ होणार आहे. त्यामुळे तेथे टॅक्सी व्यावसायिकांकडून आंदोलन होणार हे ठरून गेलेले आहे. वर्षभरातील ही चौथी दरवाढ आहे. त्यामुळे त्याची चर्चा तर होणारच. सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारलेल्या या प्रकल्पाच्या दरावर सरकारचे नियंत्रण नसेल तर असेच होणार आहे. विमानतळावर टॅक्सी आता ठेवायचा नाहीत तर ठेवायच्या कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ॲपवर आधारीत टॅक्सी व्यवसायाने पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांसमोर आव्हान उभे केले असतानाच हे नवे संकट घोंगावू लागल्याने कमाई केवळ पार्किंग शुल्क देण्यातच घालवावी का अशी विचारणा टॅक्सी व्यावसायिकांकडून होऊ लागली आहे. ∙∙∙
भाजपचे प्रदेश समितीवर माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार विनय तेंडुलकर यांना कसलेही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे तेंडुलकर यांना भाजपने बाजूला टाकले आहे की काय, अशी एक भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी यासंदर्भात खुलासा करताना, तेंडुलकर हे गोव्यातील भाजपचे एक ज्येष्ठ नेते असून त्यांना आपल्या हाताखाली प्रदेश समितीत स्थान देणे हे योग्य वाटण्यासारखे नाही, म्हणूनच त्यांना प्रदेश समितीवर स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, त्यांना लगेच त्यापेक्षाही माेठे स्थान दिले जाईल, असे स्पष्ट केले आहे. विनयभाईंना नेमके कुठले स्थान मिळेल आणि त्यांना कुठले पद मिळेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. विशेषत: विनयभाईंच्या कार्यकर्त्यांना त्याची अधिकच उत्सुकता लागून राहिलेली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.