
अन्यथा विजय पत्रकार झाले असते!
गोव्यात सरकारी महसूल बुडविणाऱ्या कॅसिनाेंचा स्टींग ऑपरेशन करून दोन दिवसांपूर्वी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी पदार्फाश केला. काल विधानसभा अधिवेशनाच्यावेळी विधानसभेच्या बाहेर याबद्दल पत्रकारांनी त्यांना छेडले असता, मी आमदार झालो नसतो तर कदाचित पत्रकार झालो असतो, असे सरदेसाई म्हणाले. सरदेसाई यांचे वाचन भरपूर असून त्यांची लिहिण्याची स्टाईलही खास अशी असते. विजय हे जर पत्रकार झाले असते तर त्यांनी पत्रकारितेचे क्षेत्रही गाजविले असते, असे त्यांची स्टाईल पाहून वाटतेच. दुसऱ्या बाजूला जे नेते होऊ शकले नाहीत, ते चांगले पत्रकार झाले, हेही तेवढेच खरे आहे. अशी कित्येक उदाहरणे आपण पाहतोच की!
अखेर गोविंद गावडेंना ‘जाग’?
गेली साडे तीन वर्षे फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिराला समिती नाही. त्यामुळे ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी या कला मंदिराची अवस्था सध्या झाली आहे. गोविंद गावडे कला संस्कृती मंत्री असताना खरे तर या समितीची नियुक्ती व्हायला हवी होती. पण ते हे कार्य करू शकले नाहीत, एवढे खरे. आता याचे खापर ते मुख्यमंत्र्यांवर फोडतात. परवा विधानसभेत त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला. आणि आता मुख्यमंत्रीच कला संस्कृती मंत्री असल्यामुळे त्यांनी या समितीची नियुक्ती लवकर करावी, अशी मागणीही केली. या त्यांच्या मागणीमुळे उशिरा का होईना पण गोविंद गावडेंना जाग आली, असे लोक बोलू लागलेत. आता बघूया गोविंदरावांची ही मागणी मुख्यमंत्री किती मनावर घेतात ते. शेवटी कोणाच्या तरी आरवण्याने का होईना, पहाट झाली की झाली. नाही का...?
साकाेर्ड्यातील पंचाचे अजब कारनामे
साकाेर्डा येथील एका पंच सदस्याने या पंचायत क्षेत्रात येणाऱ्या ४० हजार चौ.मी. सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले असून सध्या हा संपूर्ण पंचायत क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. बुडबुड बाबा या नावाने सु (की कु?) प्रसिद्ध असलेल्या या पंचसदस्याचे अनेक कारनामे चर्चेत असून त्यामुळे हा ‘बुडबुड बाबा’ चर्चेत येऊ लागला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करूनही त्याची अजून कुणीही चौकशी केली नाही. ही चाैकशी का बरी केली जात नाही, यासंदर्भात सगळेच आता आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत.
म्हापसेकरांच्या रस्त्यावर पाणीच पाणी!
पावसाळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरी भागात मान्सूनपूर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून आणि पालिका प्रशासनाकडून राबवल्या जातात. म्हापसाही त्याला अपवाद नाही. पण मान्सूनपूर्व कामे कशा तऱ्हेने झालीत, याचा प्रत्यय पावसाने संततधार वा जोरधार हजेरी लावली की येतोच. म्हापशात या आधी सखल भागात पाणी साचायचे, किंवा नदी किनारी राहणाऱ्या लोकांना पूरस्थितीचा सामना करावा लागायचा. पण सध्या उलटेच घडतेय. बुधवारी तीन तास बरसलेल्या पावसामुळे अगदी समतल भागातील रस्त्यालाच नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. गटार व्यवस्था किंवा पावसाळी पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था मरणपंथी लागल्याचे दिसत होते. मेमध्ये झालेल्या जोरदार पावसात तर रस्त्यावरून एक दुचाकीस्वार दुचाकीसह वाहून जातानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. निदान पुढील वर्षी तरी अशी स्थिती उद्भवू नये, म्हणजे मिळवली!
पोलिसांचे गुड मॉर्निंग...!
गोवा पोलिस खात्यामध्ये अनेक सुपर पोलिस आहेत, ज्यांचे सुरस किस्से अधूनमधून गाजतात. अशातच, विधानसभेत हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी पर्वरी पोलिस स्थानकातील एका कॉन्स्टेबलच्या पराक्रमाचा पाढाच वाचला. आता या कॉन्स्टेबलचा गॉड फादर कोण? हे समोर आले पाहिजे. कारण वरदहस्ताशिवाय कॉन्स्टेबल पदावरील व्यक्ती इतके डेअरिंग करत नसते. आणि अवैध मार्गाने पैशांचे कलेक्शन करत असल्यास हे पैसे त्याच्या खिशांत जातात की हफ्ता इतर कोणाला पुरवला जातो? याची सखोल चौकशी होणे तितकेच गरजेचे. आमदारांकडून जेव्हा असे आरोप होतात, तेव्हा निःष्पक्ष चौकशी होणे अनिवार्य असते. कारण, सध्या पोलिस खात्यात काही अधिकारी व पोलिस कर्मचारी आले आहेत, ज्यांना फक्त शॉर्टकट मार्गाने केवळ माया कमविण्याची सवय लागली आहे! त्यांचा ‘गुड मॉर्निंग’ केल्याशिवाय दिवस जात नाही! अलिकडेच अशाचप्रकारे उत्तरेतील एका टॉप पोलिस अधिकाऱ्याने आपल्या मर्जीतील ऑफिसर्सना दक्षिणेत पाठवून आपल्यासाठी मोठा हफ्ता वसूल केला होता, अशी खमंग चर्चा पोलिसांमध्ये सुरू आहे.
नॉर्थ गाेवा आणि ‘सॉर्त गोवा...’
सध्या दक्षिण गोव्यात दोनच गोष्टी जास्त चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, दक्षिण गोव्यात येऊ घातलेला तिसरा नवा जिल्हा आणि २ बीएचके फ्लॅटसह महागड्या गाड्यांची बक्षिसे ठेवलेली सांगे गणेशोत्सव आणि केपे गणेशोत्सव मंडळाची लॉटरी कुपने. यावरुन सध्या समाज माध्यमांवर वेगवेगळे पोस्ट येऊ लागले आहेत. त्यातलाच एक लक्ष वेधणारा पोस्ट म्हणजे, तिसर्या जिल्ह्याचे नाव ठरविणारा पोस्ट. उदय आमोणकर या नेटकऱ्याने यावर सूचक अशी मल्लिनाथी करताना, तिसऱ्या जिल्ह्यांचे नाव ठरले अशी पाेस्ट टाकली आहे, एक नॉर्थ गाेवा, दुसरा साऊथ गोवा तर तिसरा ‘सॉर्त गोवा’ असे म्हटले आहे. दक्षिण गोव्यातील लोकांच्या मानसिकतेवर नेमकेपणाने बोट ठेवले असून लॉटरी तिकिटे मिळवण्यासाठी अनेक तास रांगेत उभे राहणाऱ्यांचा हा जिल्हा आहे, असे ते मार्मिक विवेचन आहे.
‘गोड’ स्वप्नप्रपंच!
धारबांदोड्यातील संजीवनी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार नाही, याची खूणगाठ ऊस बागायतदार शेतकऱ्यांनी याआधीच मनाशी बांधली आहे. असे असले तरी सरकार कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आता पुन्हा एकदा निविदा काढण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून संजीवनीचा गोड काळ, कडवट वास्तवात बदलला आहे. कधी पुनरुज्जीवन योजना, कधी लीजवर देण्याचे प्रयोग, कधी शेतकऱ्यांना आश्वासने – पण प्रत्यक्षात कारखान्याची चाके हलतच नाहीत. आणि आता सरकार पुन्हा एकदा खासगी गुंतवणूकदाराच्या शोधात, जणू संजीवनी नाही, तर हरवलेला खजिनाच! हा कारखाना केवळ उद्योग नाही, तर शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे. पण दरवेळी ‘गोड बातम्या’ देणारे सरकार शेवटी पुन्हा नव्या घोषणा, नव्या प्रक्रिया आणि नव्या विलंबातच अडकते. एकंदरीत, संजीवनीचा हा ‘पुनरुज्जीवन नाट्यपट’ अजूनही संपण्याच्या मार्गावर नाही.
भुंकल्याची ‘शस्त्रक्रिया’!
विधानसभेत बुधवारी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी भटक्या कुत्र्यांकडून माणसाला चावे घेण्याचे प्रकार वाढल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यांनी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणानंतरही कुत्र्यांची संख्या कशी वाढते अशी गुगली सरकारला टाकली. ही चर्चा सुरु असतानाच वास्कोत मात्र विपरीत घडले. तिथे एका कुत्र्याने भुंकल्यामुळे चिडलेल्या महिलेने थेट सुरी हातात घेतली आणि त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्यावर अमानुष हल्ला चढवला! या हल्ल्यात कुत्र्याला गंभीर जखमा झाल्या असून तो अत्यवस्थ अवस्थेत आहे. भुंकणं हा कुत्र्याचा सहजभाव आहे, पण त्यावर प्रतिक्रिया म्हणून सुरी चालवणं ही क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी विकृती आहे. समाजात अशा हिंसक मनोवृत्तीला थारा नसावा, अशीच भावना आता ऐकू येऊ लागली आहे.
सभापतींचा असाही विक्रम
विधानसभेतील कामकाज नेमके कसे चालते. विरोधी आमदार आणि सत्ताधारी पक्ष एखाद्या मुद्द्यावरून कशा प्रकारे भिडतात. जनतेच्या कोणत्या प्रश्नांवर विधानसभेत चर्चा होते याबाबत सर्वसामान्यांत, विद्यार्थ्यांत कुतूहल असते... त्यामुळे राज्यातील अनेक नागरिक तसेच शाळा विधानसभा कामकाज पाहण्यासाठी सभापतींकडे अर्ज करतात. यंदा पावसाळी अधिवेशनात सत्तरीपासून कोणकोणपर्यंतच्या सर्व तालुक्यांतील बहुतांश शाळांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज पाहिले आहे. प्रत्येक शाळेला एकेक तासाचा कालावधी देण्यात येत आहे, नागरिकही मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. त्यामुळे विधानसभा कामकाजावेळी सर्व गॅलरी अतिशय भरगच्च भरलेली असते. त्यामुळे विधानसभेची शोभा देखील वाढत आहे... एकंदर अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यातील शाळा आणि नागरिकांनी भेट देण्याचा विक्रम होत असून सभापती रमेश तवडकर यांच्या कार्यकाळात ही घटना घडल्याची नोंद पुढेही राहील एवढे नक्की.
साळगावात ‘विकासाची गंगा’
साळगावमध्ये विकासाची गंगा अवतरली असल्याची चर्चा गेले काही दिवस ऐकू येत आहे. आता सांगोल्डा साळगाव परिसरातून कधी नव्हे, ती म्हापशाला बससेवाही सुरू झाली आहे. बुधवारी सकाळी रस्ते गायब झाले आणि त्यावर पाणीच पाणी सगळ्यांना दिसून आले. ‘विकासाची गंगा’ एवढी सर्वत्र पसरेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती, म्हणून कामावर निघालेल्यांना नदीरुपी रस्त्यातून मार्ग शोधताना नाकीनऊ आले. रात्री झालेल्या मुसळधार पावसानं गावातील रस्त्यांचं अक्षरशः तळं केलं! नाले ओसंडून वाहू लागले, आणि गाड्या नव्हे तर बोटी चालवाव्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. या जलक्रीडेच्या दृश्यामागचं मूळ कारण – रहिवाशांनी नाल्यांत टाकलेला कचरा! ग्रामपंचायतीने वेळोवेळी सूचना करूनही काही रहिवासी अजूनही घरपोच कचरा संकलन सेवा असूनसुद्धा कचरा थेट नाल्यात फेकतात. परिणामी, पावसाचं पाणी वाहून नेणारे नाले कचऱ्यामुळे अडतात आणि थेट रस्त्यावरून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. पाऊस संपून श्रावण सुरु झाला असतानाही ही जल दु:खीस्थिती निर्माण झाली असल्याने, येत्या दिवसांत स्वच्छता, नाला सफाई आणि जनजागृतीच्या मोहिमा अधिक तीव्रतेने राबवाव्या लागतील. त्याला ‘विकासाची गंगा’ समजले जाईल, अशी चर्चा यानिमित्ताने ऐकू येऊ लागली आहे.
कारवाई की ‘चिरीमिरी’?
विरोधी आमदाराने विधानसभेत कॅसिनोविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या कॅसिनोवर छापेमारी केली. आमदाराने तक्रार करिस्तोवर पोलिस काय करीत होते, असा सवाल उपस्थित होत असून पोलिस स्वतःचे काम विसरले वाटते की ‘चिरीमिरी’ चा प्रकार आहे, अशा उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.