Goa Politics: कॉंग्रेसचे राज्य प्रभारी मणिक्कम टागोर यांना नेत्यांमधील वाद मिटवण्यात अपयश आले आणि ते परत जातात न जातात, तोच भाजपने आपल्या लोकसभा विस्तारकांना राज्यात आमंत्रित केले आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी लागणारे राजकीय नेपथ्य भाजप तयार करत असून त्यात मंत्रिमंडळ बदलासह, पक्षांतर्गत जबाबदारीतील बदलाचाही समावेश आहे.
विधानसभा निवडणूक निकालावर राज्यातील राजकीय हालचाली बऱ्यापैकी अवलंबून आहेत. भाजपला अपेक्षित यश या निवडणुकीत लाभले नाही तर राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणे ठरून गेले आहे. लोकसभा विस्तारक सुनील कर्जतकर यांनी पणजीत भाजप कार्यालयात बैठका घेत लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीतील निकालाविषयी धाकधूक निर्माण झाली असतानाही भाजपने त्या वातावरणाचा परिणाम लोकसभा निवडणूक तयारीवर होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.
बैठकीत केवळ लोकसभा तयारीचाच विषय चर्चेला येईल याची काळजी घेतली गेली होती. विधानसभा निवडणुकीतील निकाल काहीही असला तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश केंद्रीय पातळीवरून आल्याने राज्यातील भाजपने पक्ष संघटनांच्या बैठका घेत वातावरण निर्मिती करणे सुरू केले आहे.
समाजघटकांशी साधणार संवाद
केंद्रीय पातळीवरून दर पंधरवड्याला या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याची जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गाभा समितीच्या बैठकीत जनतेसमोर मांडायच्या विषयांची सूची तयार केली जाणार आहे. त्यानंतर या बैठकांना सुरवात होईल.
...तर प्रदेश भाजपवर धुरा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली जाण्याचा विचार भाजपने वरिष्ठ पातळीवर चालवलेला आहे. केरळ, तेलंगण आणि झारखंडमधील लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विचार सुरू आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसे झाले तर लोकसभेच्या दोन्ही जागांवरील निवडणूक लढवण्याची जबाबदारी केवळ प्रदेश भाजपवर येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.