CM Arvind Kejriwal Case: दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना उद्या गुरुवारी न्यायालयात सुनावणीवेळी प्रत्यक्षात हजर राहण्यास सूट देण्यात आली. अॅड. सुरेल तिळवे यांनी न्यायालयात केजरीवालांची बाजू मांडली.
दरम्यान, न्यायालयाने केजरीवाल यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देत, 5 जानेवारी 2024 पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. म्हापसा प्रथमवर्ग न्यायाधीश शिल्पा पंडित यांनी या 2017 च्या गोवा विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी केजरीवाल यांना समन्स जारी केले होते.
आजच्या सुनावणीविषयी माहिती देताना अॅड. सुरेल तिळवे यांनी माध्यमांना सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना मंगळवारी सायंकाळी उशिरा समन्स मिळाले. इतक्या कमी वेळेत ते गोव्यात पोहोचणे शक्य नव्हते.
त्यामुळे आजच्या सुनावणीला उपस्थित राहण्यास आपल्याला सूट द्यावी, असा अर्ज केजरीवाल यांनी न्यायालयासमोर केला. त्यानुसार न्यायाधीशांनी ही सुनावणी आता 5 जानेवारी सकाळपर्यंत तहकूब केली. त्या दिवशी न्यायालयाने केजरीवाल यांना वैयक्तिक बाँड व स्थानिक हमी देण्यास सांगितली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी केजरीवालनी वादग्रस्त विधान केले होते.
‘आप’च्या नेत्यांची सतावणूक : वाल्मिकी नाईक
गेल्या पाच वर्षांपासून हे प्रकरण पुढेच सरकत नाहीय. मुळात आमच्या राष्ट्रीय नेत्याविरोधात हा गुन्हा का दाखल केलाय, हा प्रश्न पडतो. केजरीवाल हे ‘आप’चे स्टार प्रचारक असून देशभरात ते प्रचार करतात.
प्रचारवेळी ते सांगतात की, इतर पक्ष कशा प्रकारे पैसे खर्च करून निवडून येण्याचा प्रयत्न करतात. परंतु, भ्रष्टाचारमुक्त सरकार हवे असल्यास मतदान ‘आप’ला करा, असे ते आवाहन करतात. अशा प्रकारचे विधान केजरीवाल यांनी देशात इतरत्रही केले असून त्यांच्याविरोधात याच धर्तीवर गुन्हे दाखल झाले आहेत.
हे प्रकरण जुने असून, सध्या ‘आप’च्या नेत्यांना अकारण अटक करून त्यांना त्रास दिला जातोय. तसाच त्रास केजरीवाल यांना देण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप ‘आप’चे नेते वाल्मिकी नाईक यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.