Coal Transportation: मुरगाव बंदरातील धक्का क्र. 5 व 6 वर कोळसा वाढविण्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेले मंजुरीपत्र त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी ‘गोवा अगेन्स्ट कोल’ या संघटनेने केली आहे. तसेच मुरगाव बंदरातून होणारी कोळसा हाताळणी कायमस्वरुपी बंद करण्यासाठी या तालुक्यातील आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर दबाव आणावा, अशी मागणीही केली आहे.
खारीवाडा-वास्को येथील ओल्ड क्रॉस कार्यालयात आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ‘गोवा अगेन्स्ट कोल’चे निमंत्रक ख्रिस्तोद डिसोझा यांनी, मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी दुपटीने वाढविण्यासाठी केंद्राने दिलेल्या आदेशाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.
ते म्हणाले, 2011 पासून मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी बंद करण्याची मागणी आम्ही करीत आलो आहोत. कोळसा प्रदूषणामुळे मुरगाव, वास्को परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. समुद्रातील जनजीवनावरसुद्धा परिणाम होऊ लागला आहे.
आता तर केंद्राने मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी वाढविण्याची मंजुरी देऊन येथील जनतेला आणखीन त्रासात टाकले आहे. यासाठी मुरगाव व वास्कोच्या आमदाराने त्वरित पर्यावरण मंजुरीला विरोध करावा.
तसेच मुख्यमंत्र्यांकडे मुरगाव बंदरातील कोळसा वाढविण्यास विरोध करून पर्यावरण मंजुरी रद्द करण्याची मागणी करावी.या पत्रकार परिषदेला नझीर खान, संजय रेडकर व इतर पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.
केंद्रासमोर झुकू नका
वालेन्सियो सिमॉईश म्हणाले की, गोवा हे कोळसा हाताळण्यासाठी योग्य ठिकाण नाहीय. केंद्र व राज्य सरकारने मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी कायमची बंद करावी.
तर, कोळसा हाताळणीविरोधात यापूर्वी आंदोलन केलेले कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले की, राज्य सरकारने नियम, कायदे पायदळी तुडवून लोकांच्या जमिनी हस्तगत केल्या आहेत. राज्य सरकारने केंद्रापुढे न झुकता कोळसा पर्यावरण मंजुरीपत्र मागे घेण्यासाठी दबाव आणावा.
आमदाराने भूमिका स्पष्ट करावी
समाजकार्यकर्ते जयेश शेटगावकर यांनी सांगितले की, मुरगाव बंदरातील कोळसा वाहतूक वास्को शहरातून करण्यास विरोध करणे हे एका प्रकारचे नाटक होते. हे सर्व आंदोलन फक्त वाहतुकीचे कंत्राट प्राप्त करण्यासाठी केले होते. मुरगावचे आमदार कोळसा वाहतुकीविरोधात आहेत की कोळसा हाताळणी दुप्पट करण्याच्या बाजूने, ते त्यांनी जनतेपुढे स्पष्ट करावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.