Goa Politics: राजकारण पोचले कॉलेजमध्ये?

म्हापशातील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शनिवारी ‘अभाविप’च्या सदस्यांनी धुडगूस घातला.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: म्हापशातील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शनिवारी ‘अभाविप’च्या सदस्यांनी धुडगूस घातला. या सदस्यांनी कॉलेजमध्ये जाऊन चालू वर्गात हस्तक्षेप करीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संपूर्ण कॉलेज कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अखेर पोलिस तसेच प्रशासकीय यंत्रणेस हस्तक्षेप करीत कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये, याची दक्षता घ्यावी लागली. मुळात विद्यार्थ्यांचा विषय किंवा प्रश्न असल्यास ते इतर व्यवस्थित मार्गाने सोडवता येऊ शकतात. कॉलेज दखल घेत नसल्यास संबंधितांकडे तक्रार केली जाऊ शकते.

मात्र अशा हिंसक पद्धतीने चालू वर्गातील क्लास बंद पाडण्याचा प्रयत्न हे अशोभनीय व निषेधार्ह! तसेच प्रशासकीय यंत्रणेला यावर नियंत्रण मिळविण्यास झालेला विलंब अनेक प्रश्न उपस्थित करतो. कारण हा संपूर्ण प्रकार तब्बल चार तास चाललेला. चार तासानंतर या राजकीय ड्रामावर पडदा पडला हेही तितकेच विशेष!

Goa Politics
Goa News: ‘झेवियर्स’ आंदोलनात बाह्यशक्तींचा हात असल्याचा व्यवस्थापनाचा दावा

रेजिनाल्डबाब शांत का?

‘पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसीबीलीटी’ असे इंग्रजीत म्हटले जाते. राजकारण आदर्शांवर चालत नाही, तर फायदा-नुकसान या गणितावर चालते. कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड नेहमीच विधानसभेत आवाज उठवायचे. कोणत्याही विषयावर सखोल अभ्यास करून रेजिनाल्ड भारदस्त आवाजात विधानसभा गाजवायचे.

आता मात्र रेजिनाल्डचा आवाज बंद झाला आहे. गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेजिनाल्डचा आवाज घुमला नाही. रेजिनाल्डबाब आपल्यालाही ध्वनी बंदीची बाधा झाली आहे काय? असा प्रश्न समाज माध्यमातून रेजिनाल्डला विचारत आहेत. ‘वारो येता तशें सूप धरप’ हे रेजिनाल्ड जाणतात असेच म्हणावे लागेल.

रोहन खंवटेंचे अपयश!

रोहन खंवटे हे आपण राजकारणात कसा आलो आणि का आलो, हे इतरांना समजावे, यासाठी चक्क एक पुस्तक लिहिणार होते. त्यांनी एकदा ट्राय देखील मारली.

परंतु त्यांना काही ते जमले नाही, त्यावेळी त्यांना समजले पुस्तक लिहणे हे तेवढे सोप्पे नाही. कदाचित ते मनात पुटपुटले असतील की पुस्तक लिहिणे हे राजकारणाएवढे सोप्पे नाही.

दिगंबर कामत यांचा उत्तराधिकारी!

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या बरोबर त्यांचे पुत्र योगिराज दिसणे, ही आता नित्याची बाब बनली आहे. एरव्ही योगिराज वडिलांच्या राजकारणापासून दोन हात दूरच होते, पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडिलांना मदत करण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून ते आपल्या वडिलांबरोबर सावलीसारखे फिरत आहेत.

अगदी गटारांची पाहणी असली तरी ते आपल्या वडिलांबरोबर दिसतात. या दिवसात आमदार कामत हे आजारी असल्याने सार्वजनिक ठिकाणी येण्याचे त्यांनी जरा बंद केले आहे. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत योगिराजने काम चालूच ठेवले आहे.

दोन दिवसांपूर्वी आपल्या वडिलांच्या गैरहजेरीत लाडली लक्ष्मीच्या धनादेशांचे वितरणही त्यांनीच केले. बाबांचा उत्तराधिकारी म्हणून आता त्यांच्याकडे पाहू लागले आहेत.

Goa Politics
Goa Politics: ‘आदर्श संसद ग्राम’च्या बैठकीला आमदार, खासदारांना डावलले!

कुर्टीतील बेकायदा गाड्यांचे प्रकरण

कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रात बेकायदा गाड्यांचे प्रस्थ बरेच वाढले आहे. या बेकायदा गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच गंभीर अपघातही घडत असल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या बेकायदा गाड्यांविरुद्ध आवाजही उठवला होता. त्यामुळे नूतन पंचायत मंडळाने हे गाडे हटवण्याची मोहीम सुरू केली.

पंचायत मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुकही करण्यात आले, पण नंतर ही मोहीम थंडावली आणि एकही गाडा जागेवरून हलला नाही. कारण काय माहीत आहे... ग्रामसभेत यासंबंधीचा ठराव संमत करण्याची गरज असल्याचे पंचायत मंडळाच्या लक्षात आल्यामुळे ही मोहीम थंडावली असल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे ग्रामसभेत या विषयावर चर्चा होईल का!

खुल्लम खुल्ला मटका!

सरकार व प्रशासन जेव्हा कान असून बहिरे बनते, तोंड असून मुके बनते व डोळे असून आंधळे बनते. तेव्हा प्रजेचे पतन होणे अनिवार्य बनते. आपल्या राज्याची ओळख देशात व विदेशात ‘गेम्बलिंग डेस्टिनेश’ म्हणजे जुगारी स्थळ म्हणून होत आहे, हे आपण जाणतो.

सरकार तसेच प्रशासनही जाणते. मात्र वळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. राज्यात कोपऱ्या कोपऱ्यावर मटका बुकी खुल्लम खुल्ला मटका बिट घेताना दिसतात. शाळा-महाविद्यालयाजवळ असू किंवा मंदिर, चर्च असो, एवढेच काय पोलिस स्थानकाला टेकूनही मटका घेतला जातो.

कहर झाला, तो बांबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाकडे असलेल्या पार्किंग लॉटवर. गाड्या पार्क करणाऱ्या जागेवर, गाड्या उभ्या करून गाडीतच मटका बीट घेतले जाते. इस्पितळात येणाऱ्या लोकांना आरोग्य खात्याने मटक्याची ही सोय करून दिली म्हणावी की! साहेब हे कमळाचे राज्य आहे, इकडे ‘सब मुमकीन है।’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com