

म्हापसा: कांदोळी समुद्रकिनारी सोमवारी सकाळी समुद्रस्नान करताना सोलापूर येथील प्रसिद्ध कंत्राटदार व व्यावसायिक सतीश उद्धव भोसले (५४, रा. जानकीनगर-जुळे) यांचा बुडून मृत्यू झाला. गोव्यात कुटुंबासोबत पर्यटनासाठी आले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले कुटुंब २८ मे रोजी गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ते कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नाश्ता केल्यानंतर हे कुटुंबीय समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेले. त्यावेळी सतीश भोसले हे आपल्या १६ वर्षीय मुलीसह समुद्रस्नानासाठी पाण्यात उतरले होते, तर इतर कुटुंबीय किनाऱ्यावर थांबले होते.
समुद्रस्नान सुरू असताना अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेने बाप-लेकीला समुद्राच्या आत ओढले. मुलगी प्रसंगावधान राखत कशीबशी किनाऱ्यावर पोहोचली. मात्र, वडील दिसत नसल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली. तिचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि जीवरक्षक घटनास्थळी धावले.
जीवरक्षकांनी तत्काळ समुद्रात शोधमोहीम राबवून सतीश भोसले यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अधिक तपास सुरू आहे.
क्षणात दुर्घटना
समुद्र तुलनेने शांत दिसत असला तरी अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मुलगी सुरक्षितपणे बाहेर आली; मात्र वडील सतीश भोसले यांना लाटेने समुद्राच्या आत ओढले. गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबाच्या आनंददायी सहलीचे काही क्षणांत दुःखद घटनेत रूपांतर झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.