Goa Politics: खरी कुजबुज; हा शिमगा की नरकासुर स्पर्धा

Khari Kujbuj Political Satire: काही आमदारांना विरोधी पक्षात जरी असले तरी आपली कामे सरकारकडून कशी करून घ्‍यावीत याची चांगली कला अवगत असते.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

हा शिमगा की नरकासुर स्पर्धा

प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत झाला की ते त्या कलेसाठी घातक बनते हे आपण उत्सवात सादर केल्या जाणाऱ्या मराठी नाटकांबाबत अनुभवले आहे. राज्यात सध्या पर्यटन खात्यातर्फे आयोजित शिमगोत्सवाची धूम आहे. मात्र, योग्य नियोजन नसल्यामुळे हा शिमगोत्सव प्रेक्षकांसाठी व स्पर्धा परीक्षांसाठी डोकेदुखी बनायला लागला आहे. परवा मडगावला शिमगोत्सव सुरू झाला रात्री नऊ वाजता आणि संपला सकाळी सहा वाजता. याला कारण नियोजनाचा अभाव. प्रत्येक रोमटामेळ जर अर्धा अर्धा तास ढोल बडवत राहिले तर असेच होणार. स्पर्धकांना वेळेचे बंधन नाही. आयोजक केवळ फेटे बांधून मिरवण्यात व्यस्त आणि म्हणूनच आता शिमगोत्सव मिरवणुकीला नरकासुराचे स्वरूप यायला लागले आहे असे आम्ही नव्हे जनता म्हणते. ∙∙∙

एल्‍टन भाजपच्‍या प्रेमात?

काही आमदारांना विरोधी पक्षात जरी असले तरी आपली कामे सरकारकडून कशी करून घ्‍यावीत याची चांगली कला अवगत असते. दिगंबर कामत हे काँग्रेसमध्‍ये असताना भाजप सरकारकडून अशाचप्रकारे आपली कामे करून घ्‍यायचे. केपेचे आमदार एल्‍टन डिकॉस्टा हेही आता त्‍याच पठडीत चालत आहेत असे वाटते. रविवारी बेतूल येथील नवीन पंचायत घराचे उद्‍घाटनप्रसंगी एल्‍टन यांनी जे भाषण केले ते पाहिल्‍यास, मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांना ते बरेच जवळ गेल्‍याचे जाणवले. आपल्‍या भाषणात एल्‍टन म्‍हणाले, मुख्‍यमंत्र्यांनी त्‍यावेळी मलाही बोलावले होते, पण त्‍यावेळी मी गेलो नाही. सध्‍या विरोधी पक्षात असताना मी मुख्‍यमंत्र्यांच्‍या साहाय्‍याने एवढी विकासकामे करून घेतो. सत्ताधारी पक्षात असतो, तर कदाचित यापेक्षाही अधिक चांगली कामे झाली असती असे ते म्‍हणाले. एवढेच म्‍हणून ते थांबले नाहीत, तर भविष्‍यात तसे काही होते का पाहुया असे ते म्‍हणाले. त्‍यामुळे आता एल्‍टनही भाजपच्‍या मार्गावर आहेत का या नव्‍या चर्चेने केपेत जोर धरला आहे. काहीजण म्‍हणतात, बाबूपेक्षाही आपण मुख्‍यमंत्र्यांना जवळचे हे लोकांच्‍या मनात ठसविण्‍यासाठीच एल्‍टनने ही भूमिका घेतली. ∙∙∙

चोरट्याच्‍या हाती किल्‍ल्‍या!

सध्‍या गोवा विद्यापीठातील एका प्राध्‍यापकाचा किस्‍सा चर्चेत असतानाच शैक्षणिक क्षेत्रात दक्षिण गोव्‍यातील एका सरकारी उच्‍च माध्‍यमिक शाळेच्‍या प्राचार्यावर एका शिक्षिकेने दाखल केलेली लैंगिक छळाची तक्रारही अशीच चर्चेत आलेली आहे. अशी तक्रार केल्‍यानंतर खात्‍याअंतर्गत चौकशी केली जाते. त्‍यासाठी समिती नेमली जाते. ही समिती गठीत करण्‍याचे अधिकार त्‍या शाळेच्‍या प्रमुखांना असते. त्‍यानुसार आता या तक्रारीची चौकशी करण्‍यासाठी समितीही नेमली आहे. मात्र, ज्‍यांच्‍यावर ही तक्रार केलेली आहे तेच शाळा प्रमुख असल्‍यामुळे समितीही त्‍यांनीच गठीत केली आहे. म्‍हणजे एकाअर्थी ज्‍यांच्‍यावर तक्रार त्‍यांचीच समिती. चोराच्‍या हातात चाव्‍या देणे अशी एक म्‍हण आहे. येथे ही म्‍हण तंतोतंत लागू होत नाही का? ∙∙∙

नाटकाचा प्रभाव

संगीत गायन वा वादन यात मींड नावाचा प्रकार असतो. नाट्यकृतीतसुध्दा कलेची ही सलगता, वेग, गती साधली नाही तर आचके, गचके खायला सुरवात होते. रेंगाळणे कधी सुरू झाले कळतच नाही. हे टाळण्यासाठी दिग्दर्शनाचं कौशल्य व कल्पकता पणाला लागते ती इथे. चित्रात स्वच्छ रेषा व रेखाटन असते, रंगसंगती असते तशी मंचावर पात्रांची हालचाल, प्रकाशमानता व प्रकाशरंग - प्रकाशखेळ, ध्वनी, संगीत आणि बोलकं, नेमकं, नेटकं, नेपथ्य हवं. मेक अप व वेषही तसाच समरूप हवा. कोकणी स्पर्धेत फारच थोडी नाटके अशा सर्वोत्तम दर्जाची होती. आपणच लिहायचं वा अनुवाद करायचा व दिग्दर्शन व मुख्य भूमिकाही आपणच करायची यात गैर काही नाही, पण मंचनाचं जे प्राणतत्त्व आहे त्याला या विनाकारण आमंत्रित केलेल्या ओझ्यामुळे मार बसतो. समजून कोण घेतो? ∙∙∙

उशिरा आलेले स्पर्धक आणि...

फोंड्यातील राज्यस्तरीय शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या उत्सवाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते कृषिमंत्री रवी नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत झाले. कधी नव्हे ती तोबा गर्दी या शिमगोत्सवाला झाली होती. त्यामुळे आयोजकांवर बराच ताण आला. तसे पाहिले तर राज्यातील सर्वांत पहिला शिमगोत्सव हा फोंड्यात होतो. त्यामुळे विविध स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना पहिलटकरणीची काय व्यथा असते त्याचा अनुभव येतो. त्यामुळे साहजिकच स्पर्धेला उशीर होतो. आपले कामधंदे सांभाळून स्पर्धक उशिरा स्पर्धास्थळी येतात. आयोजक बिचारे ओरडून ओरडून सांगत होते, वेळेचे भान राखण्याचे आवाहन करीत होते, पण ऐकतो कोण..! असो, आयोजकांनी त्याही स्थितीत आयोजन चांगले केले अशा प्रतिक्रिया ऐकू आल्या. आता काहीजणांनी आयोजकांना दूषणेही दिले, पण जावे त्यांच्या गावा हा प्रत्यय आला तरच आयोजकांचे दुखणे त्यांना कळेल, एवढे मात्र नक्की. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; एल्टनच्या कार्यक्रमास चक्क मुख्यमंत्री!

सॉरी डॉक्टर, ‘याला आळा घाला’!

‘उद्धवा, अजब तुझे सरकार! लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार...’ गोव्यात आम जनता सध्या हे जुने गाणे गुणगुणायला लागली आहे. राज्यातील शासन व्यवस्था व कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. कोणाचा पायपोस कुणाला नाही. दिवसाढवळ्या राज्यात खून होत आहेत. अनेक घोटाळे गाजत आहेत. कधी कॅश फॉर जॉब प्रकरण तर कधी जमीन घोटाळा प्रकरण, तर कधी मार्क्स स्कँडल... आपले अबकारी निरीक्षकच दारू स्मगलिंग करण्यात व्यस्त आहेत. प्राध्यापक पेपर लीक करीत आहेत तर आपले पोलिस महिला सुरक्षा करण्याचे सोडून रस्त्यावर शिमगोत्सवात ड्युटी बजावण्यात व्यस्त आहेत. कोण कोणाला घाबरत नाही, कोण कोणाची परवा करीत नाही. डॉक्टर साहेब आपल्या ‘भिवपाची गरज ना’ याचा भलताच अर्थ काहीजणांनी घेतला असावा. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: काँग्रेसचा आमदार पक्षाला रामराम ठोकणार? 'हात' सोडून 'कमळ' घेणार हाती?

मनमानी करावी, पण किती?

राज्यात दर रविवारी कोणत्या ना कोणत्या पंचायतींच्या ग्रामसभा होतात. राज्यघटनेने स्वायत्त संस्थांना दिलेला हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यातूनच लोकशाही मजबूत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या ग्रामसभा या त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना पंचायत मंडळांना चुकले असेल तर जाब विचारण्याचा आणि चांगले काम केले असेल, तर अभिनंदनाचा ठराव मांडण्याचाही अधिकार असतो. आता सांताक्रूझ मतदारसंघात आमदार भाजपचा आहे, पण तेथे पंचायतीची सत्ता एकाच कुटुंबाच्या ताब्यात असल्यासारखे वाटते. रविवारी जी सभा झाली तीही वादग्रस्तच. त्यामुळे मंडळालाही तत्काळ सभा गुंडाळण्याची संधी मिळाली. विशेष बाब म्हणजे सभा संपल्यानंतर लोकांनी पंचायतीच्या सचिवांना घेराव घालत जाब विचारला. विरोधातील पंच सदस्यांनी आम्हाला ग्रामसभेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला. घरपट्टी व थकीत करावर आक्षेप नोंदले, पण त्याकडे पंचायत मंडळाने दुर्लक्ष केले, यावरून सांताक्रूझ पंचायतीत नक्की चाललेय तरी काय? नक्की येथे मनमानी कोणाची आहे? असे प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com